|| रोहिणी शहा

राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेच्या सामान्य अध्ययनातील सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान घटकातील रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या उपघटकांच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

तांत्रिक सेवा परीक्षेची अर्हता पाहता उमेदवारांनी पदवीपर्यंत सामान्य विज्ञान घटकातील उपघटकांचा वेगवेगळ्या टप्प्यावर सखोल अभ्यास केलेला असणार आहे हे लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची खोली / दर्जा ठरविण्यात येईल हे लक्षात घ्यायला हवे. अभियांत्रिकी उमेदवारांना हे दोन उपघटक त्यातही जास्त सोपे वाटू शकतील. मात्र तरीही पूर्व परीक्षेमध्ये मूलभूत मुद्यांवर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता पाहता याबाबत गाफील राहणे योग्य

ठरणार नाही.

तिन्ही सेवांच्या पूर्व परीक्षेमध्ये यापूर्वी हा घटक समाविष्ट नव्हता. त्यामुळे सर्वच उमेदवारांसाठी हा घटक नवीन आहे आणि त्याची नव्याने तयारी करावी लागणार आहे. या घटकाचा सविस्तर अभ्यासक्रम देण्यात आलेला नाही. त्यामुळे तयारीसाठी आयोगाच्या ज्या परीक्षांमध्ये हे उपघटक समाविष्ट आहेत त्यांचा अभ्यासक्रम पाहून आणि प्रश्नांचे विश्लेषण करून तयारीसाठीचे मुद्दे ठरवून घेणे आवश्यक आहे.

राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपरमध्ये हे घटक समाविष्ट आहेत. मात्र त्यांचा सविस्तर अभ्यासक्रम देण्यात आलेला नाही. राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यावर या घटकांच्या अभ्यासक्रमाची चौकट लक्षात येते. त्या आधारावर तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेमध्ये या उपघटकासाठी अपेक्षित मुद्दे आणि त्यांची तयारी कशी करावी ते पाहू.

रसायनशास्त्राची तयारी अपेक्षित अभ्यासक्रम द्रव्य, त्याचे स्वरूप व अवस्था मुलद्रव्ये आणि त्यांची वैशिष्ट्ये अणूंची संरचना व त्याविषयी विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांत डोबेरायनर ते मोस्ले या शास्त्रज्ञांनी अणूंची मांडणी करण्यासाठी बनविलेली आवर्तसारणी व तिच्यामध्ये होत गेलेले बदल. आधुनिक आवर्तसारणी व तिची ठळक वैशिष्ट्ये धातू, अधातू, धातूसदृश धातुके काही महत्त्वाच्या मूलद्रव्यांच्या संज्ञा मिश्रण संयुग आम्ल, आम्लारी व क्षार आणि त्यांच्यामधील प्राथमिक अभिक्रिय कार्बन आणि कार्बनची संयुगे आणि त्यांचे उपयोजन

  प्रत्यक्ष तयारी

रसायनशास्त्राची तयारी करताना मुद्यांचा क्रम लावून केलेला अभ्यास जास्त सोपा होतो आणि लक्षातही राहतो. वर दिलेल्या मुद्यांचा त्याच क्रमाने अभ्यास केल्यास अभ्यासाची एक लिंक तयार होते. दोन मुद्यांमध्ये असलेल्या सलगतेमुळे आणि परस्परसंबंधांमुळे केलेला अभ्यास व्यवस्थित लक्षात राहतो.

या प्रत्येक मुद्यातील संकल्पना, सिद्धांत, तो मांडणारे शास्त्रज्ञ, संज्ञा, व्याख्या व्यवस्थित समजून घ्याव्यात.

अभिक्रियांचे प्रकार हे  अभिक्रिया त्यांतील घटक, कारक आणि उत्पादन अशा मुद्यांच्या आधारे अभ्यासावेत.

रसायनशास्त्राच्या मूलभूत संकल्पनांच्या उपयोजनावर आधारित प्रश्नही विचारले जातील. त्यामुळे वरील सर्व मुद्यांचा अभ्यास करताना त्या त्या  मुद्यांतील उपयोजित भागावर विशेष लक्ष द्यायला हवे. 

  भौतिकशास्त्र

  अपेक्षित अभ्यासक्रम

   प्रकाश

   ध्वनी

  भिंगे

   धाराविद्युत

चुंबकत्व

गती व गतीविषयक समीकरणे

   बल

   दाब

   कार्य

   ऊर्जा

   शक्ती

   उष्णता

   तापमान

   पदार्थाचे अवस्थांतर

   तापमान पद्धती (राशी व एकके)

  प्रत्यक्ष तयारी

  भौतिकशास्त्राचा अभ्यास करताना आयोगाच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा आयाम लक्षात घ्यावा लागेल तो म्हणजे या विषयाची उपयोजिता.  भौतिकशास्त्र विषयाचा अभ्यास  करताना  पुढ़ील आयामांचा विचार करायला हवा – १) संकल्पनात्मक अभ्यास २) वस्तुनिष्ठ, पारंपरिक मुद्दे ३) विश्लेषणावर आधारित मुद्दे ४) गणिते ५) उपयोजन

  प्रकाश, ध्वनी, भिंगे, धाराविद्युत, चुंबकत्व आणि गती व गतीविषयक समीकरणे हे या घटकातील मोठे, जास्त महत्त्वाचे आणि विस्तृत मुद्दे आहेत. तर बाकीचे मुद्दे मूलभूत आणि कमी विस्ताराचे मुद्दे आहेत. 

आधी कमी विस्ताराच्या मुद्यांचा अभ्यास करून मग मोठ्या मुद्यांची तयारी करणे जास्त व्यवहार्य ठरेल.

  सर्वच घटकांच्या मूलभूत संकल्पना समजून घ्याव्यात. यातील संज्ञा आणि व्याख्यांची व्यवस्थित उजळणी करणे आवश्यक आहे.

  सर्वच मुद्यांतील सिद्धांत, ते मांडणारे शास्त्रज्ञ, त्या त्या सिद्धांताचे उपयोजन, त्यावर विकसित झालेले तंत्रज्ञान यांची कोष्टकामध्ये मांडणी करून टिपणे काढावीत.

  गणिते विचारली गेली तर त्यांची काठिण्य पातळी अन्य परीक्षांतील या घटकांवर विचारण्यात येणाऱ्या गणितांपेक्षा थोडी जास्त असेल असे गृहीत धरून त्यांचा सराव करणे आवश्यक आहे.

दोन्ही विषयांमध्ये नवे शोध, त्या त्या विषयांतील नोबल तसेच प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार व त्या त्या वर्षीचे पुरस्कारप्राप्त विजेते, चर्चेतील मुद्दे या चालू घडामोडींचा अभ्यासही आवश्यक आहे.

तांत्रिक सेवा परीक्षा असल्याने या घटकांची काठीण्य पातळी थोडी जात असण्याची शक्यता आहे. मात्र अभ्यासक्रमाची चौकट माहीत झाल्यावर अभ्यास खोलवर केला की हे घटक चांगले तयार होतील. अपेक्षित अभ्यासक्रम आणि त्यानुसार तयारी कशी करावी हे आपण या व मागील लेखांमध्ये पाहिले. पहिली संयुक्त पूर्व परीक्षा पार पडली की कोणत्या घटकासाठी किती गुण मुक्रर आहेत ते जास्त स्पष्ट होईल.