फारुक नाईकवाडे

राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी घटकामध्ये अंतर्भूत तर्कक्षमता, बौद्धिक क्षमता आणि गणितीय कौशल्ये या तीन घटकांवर यापूर्वी विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे प्रकार व त्यांचे स्वरूप यावर मागील लेखामध्ये चर्चा केली. या लेखामध्ये त्यांच्या तयारी व सरावाबाबत चर्चा करण्यात येत आहे.

mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

तर्कक्षमतेमध्ये विधानांवर आधारित निष्कर्ष पद्धती, नातेसंबंध, बैठक व्यवस्था हे मुद्दे समाविष्ट होतात. प्रथमदर्शनी क्लिष्ट वाटणाऱ्या या प्रश्नांचा सराव केल्यास आणि त्यांच्यामागचे नेमके तर्क समजून घेतल्यास हे प्रश्न वेळेच्या मर्यादेत सोडविणे शक्य होते. निष्कर्ष पद्धतीमध्ये दिलेली विधाने खरी मानून ती वेन आकृत्यांमध्ये मांडून प्रश्न सोडवावेत.

तीन वा त्यापेक्षा जास्त व्यक्ती खरे वा खोटे बोलत असल्याचे गृहीतक देऊन त्यांनी सांगितलेल्या माहितीवरून निष्कर्ष काढणे अशा प्रश्नांमध्ये एलिमिनेशन पद्धतीने किंवा दिलेल्या पर्यायांचाच विचार करून उत्तर शोधले तर वेळेची बचत होते. सहसंबंधांच्या प्रश्नांमध्ये संख्यामालिका, अंकअक्षर मालिका किंवा आकृती मालिका यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वापरायच्या युक्त्या उपयुक्त ठरतात.

नातेसंबंधांवरील प्रश्नांसाठी त्यातील एका पात्राच्या जागी स्वत:स कल्पून ते प्रश्न सोडवावेत. मागील काही वर्षांपासून दिलेली माहिती नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी पर्याप्त आहे किंवा कसे, अशा प्रकारचे प्रश्नही विचारण्यात आले आहेत. त्यामुळे डेटा सफिशिएन्सी आणि नातेसंबंध यांची सांगड घालता येणे आवश्यक आहे.

सरळ रेषेतील बैठकी/ रांगेचे प्रश्न तुलनेने सोपे वाटतात. गोलाकार बैठक व्यवस्थेचे प्रश्न सोडविताना एकमेकांसमोरील व्यक्ती व त्यांच्या डाव्या उजव्या बाजू कटाक्षाने लक्षात घ्यायला हव्यात. एका गटातील व्यक्तींच्या वजन, उंची, गुण, त्यांच्या टोपी/ कपडय़ांचे रंग अशा एकाच निकषाच्या आधारे त्यांचा क्रम शोधण्यासाठी दिलेल्या वाक्यांतील माहितीची एका रेषेवर मांडणी करता येईल. व्यक्ती वस्तूंची दिलेली तुलना वापरून निष्कर्ष काढण्यासाठीही अशाच प्रकारे रेषेवर माहिती मांडता येईल.

घडय़ाळातील काटय़ांचे कोन, आरशातील प्रतिमा, कॅलेंडरमधील लीप इयरचा विचार या बाबी सरावाने सोप्या होतील. दिशांबाबतच्या प्रश्नांमध्ये सरळ सांगितलेल्या मार्गाचे आरेखन करत गेल्यास योग्य उत्तर लवकर सापडते. एका गटातील व्यक्तींच्या छंद, रहिवास, व्यवसाय, आवडीचे खेळ, वजन, उंची, गुण अशा एकापेक्षा जास्त निकषांच्या आधारे त्यांमधील प्रत्येकाशी संबंधित माहितीवर प्रश्न विचारले जातात. माहितीच्या संयोजनावरील असे प्रश्न सोडविताना कोष्टकामध्ये माहिती भरत गेल्यास अचूक उत्तर व कॉम्बिनेशन्स सापडतात.

आकृती मालिकांवरील प्रश्न सोडविताना निरीक्षणशक्ती आणि विश्लेषण क्षमता यांचा वापर आवश्यक ठरतो. यामध्ये घडय़ाळाच्या काटय़ाच्या किंवा उलटय़ा दिशेने ठरावीक कोनांतून बदलणारे स्थान किंवा दोन आकृत्यांमधील ठरावीक स्थांनावरील घटकांची बेरीज वा वजाबाकी अशा प्रक्रियांच्या आधारे उत्तरे शोधता येतात. दिलेल्या प्रश्नातील ठरावीक चिन्हांनंतर आकृतीमध्ये किंवा संख्या/ वर्ण यांमध्ये होणारे बदल नीट निरीक्षणातून लक्षात येतात. त्यातून प्रश्नातील चिन्हांची प्रक्रिया करुन उत्तरे शोधता येतील.

अक्षरमालिका आणि अंकाक्षर मालिका सोडविण्यासाठी इंग्रजी वर्णमाला एकाखाली एक सरळ आणि उलटय़ा क्रमाने लिहावी आणि त्यांना त्याच क्रमाने आकडे द्यावेत. या आधारे अक्षरमालिका, अंकाक्षर मालिका आणि आकृतीमधील अक्षरांचे प्रश्न सोडवावेत. सांकेतिक भाषेवरील प्रश्नांसाठी एलिमिनेशन पद्धतीने शब्द व त्यांचे संकेत शोधावेत. इनपुट आऊटपुट प्रश्नांसाठी दिलेल्या शब्द/ संख्यांना क्रमांक देऊन त्यांचे क्रम कशा प्रकारे बदलत जातात त्यांचे नियम शोधावेत.

सर्वसाधारणपणे या उपघटकामध्ये गणिती क्रियांवर ६ ते ८ प्रश्न आणि संख्यामालिकेवर २ ते ५ प्रश्न विचारण्यात येतात. पायाभूत गणिती सूत्रे तसेच परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ यांबाबतची सूत्रे आणि १ ते ३० पर्यंत पाढे पाठ असतील तर ही गणिते कमी वेळेत आणि आत्मविश्वासाने सोडविता येतात.

संख्यामालिका, आकृतीमधील गणिती क्रिया सोडविण्यासाठी १ ते ३० पर्यंतचे पाढे, १ ते २० पर्यंतचे वर्ग आणि १ ते १५ पर्यंतचे घन पाठ असतील तर हे प्रश्न सोडविण्यातही आत्मविश्वास मिळवता येतो. या मूलभूत गोष्टींबरोबर अंकाक्षर मालिकाही विचारण्यात येत आहेत. शेकडेवारी, व्याज, नफातोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, समीकरणे, काळ काम वेग अंतर, माहिती विश्लेषण आणि संभाव्यता हे घटक विशेष महत्त्वाचे आहेत. यामध्ये पहिले पाच घटक एकत्रितपणे अभ्यासावेत.

नफ्याचे गुणोत्तर किंवा टक्केवारी, व्याजातील फरकाचे प्रमाण अशा प्रकारे यांच्या एकत्रित उपयोजनाचे प्रश्न विचारण्यावर आयोगाचा भर दिसतो. सूत्रे पाठ असावीतच पण हे घटक सोडविताना का आणि कसे हे नेमकेपणाने समजून घेऊन सराव केल्यास कशाही प्रकारे प्रश्न विचारला तरी नेमकी कोणती प्रक्रिया करायला हवी हे लक्षात येते.

डेटा इंटरप्रिटेशनच्या प्रश्नांमध्ये एकापेक्षा जास्त प्रश्न विचारले असल्यास सर्व प्रश्न पाहून मगच माहितीवर प्रक्रिया करावी. जर एकच प्रश्न विचारला असेल तर तो वाचून मग त्यासाठी आवश्यक असेल तेवढीच प्रक्रिया दिलेल्या आलेख/ आकृतीमधील माहितीवर करावी. त्यातून वेळेची बचत होऊ शकते. डेटा सफिशिएन्सीच्या प्रश्नांमध्ये दिलेली गाणिती प्रक्रिया करून कोणते विधान आवश्यक आहे ते ठरविता येते. नातेसंबंधांवरील माहितीच्या प्रश्नांमध्येही तर्कक्षमतेच्या प्रश्नांमध्ये डेटा सफिशिएन्सीचे उपयोजन करण्यासारखे प्रश्नही विचारण्यात येत आहेत.

या घटकामध्ये किमान ५० ते ६० टक्के प्रश्न सोडविणारे उमेदवार चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात. त्यामुळे यातील जास्तीत जास्त प्रकारचे प्रश्न सोडविण्याचा सातत्याने सराव करत राहायला हवा. खरे तर सराव हीच या घटकाची तयारी आहे हे लक्षात घ्यायला हवे. सरावातून या प्रश्नांसाठीच्या युक्त्या आणि प्रयुक्त्या समजतात. प्रश्न पाहिल्यावर त्यासाठीची क्लृप्ती पटकन आठवते. त्यामुळे ऐन वेळी प्रश्न सोडविताना वेळ वाचतो. या घटकामध्ये २५ पेक्षा जास्त गुण मिळवायचे असतील तर सराव हा एकच पर्याय आहे!