रोहिणी शहा
गट क सेवा मुख्य परीक्षा पेपर एक हा संयुक्त पेपर असून मागील वर्षी झालेल्या परीक्षेतील प्रश्नविश्लेषण आणि त्याबाबतची चर्चा मागील लेखामध्ये करण्यात आली. या लेखामध्ये या पेपरच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.या पेपरमध्ये मराठी भाषेसाठी ६० तर इंग्रजी भाषेसाठी ४० प्रश्न विचारले जातात. या पेपरच्या अभ्यासक्रमाचे व्याकरण, आकलन आणि म्हणी-वाक्प्रचार असे तीन भाग आहेत. या तीन भागांची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.

व्याकरण
मराठीतील संधी, समास, विभक्ती, शब्दरचना, वाक्यरचना, प्रयोग, अलंकार, काळ, वाक्य पृथ:करण अशा बाबींचा अभ्यासक्रमामध्ये वेगळयाने उल्लेख केलेला नसला तरी त्यांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे व्याकरण या व्याख्येत जे येते त्याबाबत आपल्याला माहिती असणे आणि ही माहिती नेमकी व अचूक असणे हे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक आहे. इंग्रजीतील वाक्य रूपांतरणाचे प्रश्न वाक्यरचनेचे नियम पक्के माहीत असतील तर नक्कीच सोडवता येतात. मात्र नियम आणि त्यांच्या चौकटी फक्त माहीत असून उपयोगाचे नाही. या नियमांचा वेगवेगळय़ा उदाहरणांमध्ये शब्दरचना / वाक्यरचना करताना कशा प्रकारे वापर करण्यात येतो हे समजून घेणे आवश्यक आहे.मराठीतील विभक्ती प्रत्ययांचे कोष्टक किंवा इंग्रजीमधील काळ व प्रयोगांच्या वाक्यरचनेचा कोष्टक पाठच असायला हवेत. नियम व्यवस्थित समजून घेणे आणि त्यांचा वेगवेगळय़ा उदाहरणांमध्ये वापर करण्याचा सराव करणे हा या भागाच्या तयारीसाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे.

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला

आकलन
आकलनाच्या बाबतीतले प्रश्न उताऱ्यावरील प्रश्न, समानार्थी / विरुद्धार्थी शब्द, शब्दार्थ व त्यांचे उपयोजन अशा स्वरुपांत विचारण्यात येतात. हे प्रश्न सोडविताना पुढील बाबी लक्षात घ्याव्या.

उताऱ्यावरील प्रश्न
उताऱ्यावर १० गुणांसाठी प्रश्न विचारण्यात येत असले तरी उपलब्ध वेळ, उताऱ्याची लांबी व काठीण्य पातळी यांचा विचार करता वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरते. उतारा नीट समजून घेतल्याशिवाय त्यांची योग्य उत्तरे सापडणार नाहीत अशी काठीण्य पातळी असते हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे पहिल्या वाचनातच बहुतांश उतारा समजेल अशा प्रकारे शांतपणे वाचणे आवश्यक आहे. यासाठी आधी प्रश्न पाहून मग उतारा वाचावा. वाचनावेळी प्रश्नाशी संबंधित वाक्ये अधोरेखित करता येतील. जेणेकरून प्रश्न सोडविताना संबंधित वाक्य पटकन सापडेल.उताऱ्याला शीर्षक देणे, लेखकाचा हेतू, उद्देश अशा प्रकारचे प्रश्न याबाबत विचारले जातात. यासाठी एकमेकांशी साधम्र्य दाखवणारे पर्यायच दिले जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे गोंधळ उडू शकतो. नकारात्मक गुणपद्धतीचा विचार करता हे प्रश्न खूप काळजीपूर्वक सोडवायला हवेत.

शब्दार्थ आणि त्याचे उपयोजन
समानार्थी/विरुद्धार्थी शब्दांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्नातील शब्दाचा अर्थ नेमकेपणाने माहीत असायला हवा. मराठीतील शब्दांच्या -हस्व-दीर्घ वेलांटी/उकारांमधील बदलामुळे तसेच काना/मात्रा/वेलांटीची जागा बदलल्याने शब्दांचे अर्थ बदलतात हे लक्षात ठेवायला हवे. उदा. पाणि (हात)- पाणी (जल). इंग्रजीमधील एकसारख्या उच्चाराचे/स्पेलिगंचे पण वेगळे अर्थ असणारे शब्द Tricky ठरतात. उदा. accept आणि except या शब्दामध्ये गोंधळ उडू शकतो. त्यामुळे प्रश्नातील आणि पर्यायांमधील शब्द काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठीचा शब्द हा भाग आकलनाचा असला तरी व्याकरणाच्या स्वतंत्र भागातही यावर प्रश्न विचारलेले आहेत.

दिलेल्या कोणत्या पर्यायामध्ये एखाद्या शब्दाचा अभिप्रेत असलेला अर्थ समाविष्ट आहे अशा प्रकारे विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये सूक्ष्म फरक असलेले पर्याय दिलेले असतात. त्यामुळे एखाद्या शब्दाचा नेमका अर्थ आणि त्यापेक्षा जास्त अर्थासाठी तो शब्द वापरला जात असेल तर ते अर्थ माहीत असणे आवश्यक ठरते. यासाठी शब्दसंग्रह वाढणे व पर्यायाने वाचन हा एकमेव मार्ग आहे.

म्हणी आणि वाक्प्रचार
म्हणी आणि वाक्प्रचार यावरील प्रश्न सोडविण्यासाठी अवांतर वाचन अत्यंत उपयोगी ठरते. तयारीच्या काळात अवांतर वाचनासाठी वेळ काढणे शक्य नसेल तर म्हणी, वाक्प्रचार यांचे संकलन असलेले छोटेसे पुस्तक किंवा पिंट्र आऊट सोबत बाळगायला हवे. त्यातील म्हणी, वाक्प्रचार वाचून त्यांचा अर्थ समजून घ्यायला हवा. अर्थाची उकल झाली की त्यांचा उदाहरणांमध्ये वापर करणे किंवा केलेला वापर योग्य आहे की नाही हे कळणे सोपे होते.
या पेपरमध्ये व्याकरणाचे नियम सरळसोटपणे वापरून भागत नाही. वाक्याचा नेमका अर्थ समजून घेतल्यावर आणि भाषेतील वेगवेगळय़ा अर्थछटा माहीत करून घेतल्या तर प्रश्न व्यवस्थित सोडविता येतील. यासाठी वाचन, उताऱ्यांवरील प्रश्नांचा सराव आणि व्याकरणाच्या नियमांची उजळणी ही त्रिसूत्री उपयोगी ठरते.