फारुक नाईकवाडे
गट क सेवांमध्ये समाविष्ट पदांच्या वेतनश्रेणी, जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये वेगळय़ा स्वरूपाची आहेत. त्यामुळे मुख्य परीक्षेतील पेपर दोन हा पदनिहाय वेगळय़ा अभ्यासक्रमावर आधारित आहे. मात्र यामध्ये चालू घडामोडी व बुद्धिमत्ता चाचणी हे घटक सामायिक आहेत. या दोन घटकांच्या तयारीबाबत चर्चा केल्यावर पदनिहाय स्वतंत्र अभ्यासक्रमाच्या तयारीची चर्चा करण्यात येईल.

मागील वर्षीच्या तिन्ही पदांसाठीच्या पदनिहाय पेपरमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास तयारीबाबत पुढील मुद्दे विचारात घेता येतील :
साधारणपणे परीक्षा कालावधीपूर्वीच्या आठ महिने ते दीड महिना अशा कालावधीतील घडामोडींवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.
त्या त्या पदासाठी विहित केलेल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने चालू घडामोडींवरील प्रश्नांचाही समावेश करण्यात आला आहे.

लिपिक टंकलेखक पदासाठी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील घडामोडींचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख असला तरी पेपरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही घडामोडींवरही प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावरील घडामोडींकडे लक्ष असणे सर्वच पदांच्या पेपरसाठी आवश्यक आहे.
महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था तसेच संघटना यांची स्थापना, उद्देश, ठळक कार्ये, ब्रीदवाक्य, त्याचा भारत सदस्य केव्हा झाला, भारताची संघटनेतील भूमिका, संघट्नेचा नवीन ठराव किंवा इतर चर्चेतील मुद्दे या आधारावर तयारी करावी.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे निर्देशांक या मुद्यावर मागील वर्षी प्रश्नाचा समावेश झालेला नसला तरी तो अपेक्षित यादीमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे निर्देशांक व त्यातील भारताचे स्थान, निर्देशांक / अहवाल प्रकाशित करणारी संस्था / संघटना, महत्वाच्या निर्देशांकांचे निकष, त्यातील भारताचे अद्ययावत व मागील वर्षीचे स्थान हे मुद्दे लक्षात घ्यावेत.

भारताचे शेजारी देशांशी असलेले विवाद किंवा नवे संयुक्त प्रकल्प दोन्हीचाही परिपूर्ण आढावा घेणे आवश्यक आहे. यामध्ये संबंधित प्रकल्पाचे भौगोलिक स्थान, संबंधित सीमावर्ती राज्य, प्रकल्पाचा फायदा, असल्यास त्याबाबतचे चर्चेतील मुद्दे यांचा आढावा घ्यावा.
संरक्षण घटकामध्ये भारत व इतर देश / देशांचे गट यांचे संयुक्त युद्धाभ्यास यांचे कोष्टक पाठच करावे. दरवर्षी केवळ अभ्यासाचे ठिकाण व कालावधी अद्ययावत करणे इतकाच उजळणीचा भाग मग शिल्लक राहतो. या घटकामध्ये पारंपरिक आणि अद्ययावत असे दोन्ही मुद्दे विचारण्यात येतात. त्यामुळे भारतातील क्षेपणास्त्रे, रणगाडे, लढाऊ विमाने, पाणबुडय़ा, युद्धनौका, रडार व इतर यंत्रणा यांचे नाव, प्रकार, वैशिष्टय़, वापर, विकसित करणारी संस्था, असल्यास अद्ययावत चाचणीचे परिणाम या मुद्दय़ांच्या आधारे कोष्टकामध्ये नोट्स काढाव्यात.

व्यक्तिविशेष, शासकीय योजना यांबाबत नेमकेपणाने व शक्यतो बहुविधानी प्रश्न विचारण्यात आले आहेत.शासकीय योजनांचे उद्दिष्ट, सुरू झालेले वर्ष, तरतुदी, लाभार्थ्यांचे निकष, अंमलबजावणी यंत्रणा, असल्यास अपवाद, असल्यास कालमर्यादेतील उद्दिष्टे यांचा टेबलमध्ये नोट्स काढमुन अभ्यास करावा. योजनांच्या मूळ दस्तावेजाचे (शासन निर्णय किंवा राजपत्रातील सूचना) वाचन आणि तरतुदी समजून घेणे आवश्यक आहे. यामध्ये नव्या योजनांवर भर द्यायला हवा. मागील पाच ते सात वर्षांमधील योजनांचा समावेश केल्यास जास्त उपयुक्त ठरेल. पायाभूत सुविधांबाबतचे नवे प्रकल्प बारकाईने माहीत करून घ्यावेत.

चर्चेतील व्यक्ती, निधन, नेमणुका, आपापल्या क्षेत्रात वैशिष्टय़पूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींबाबत त्यांचे कार्यक्षेत्र, वैशिष्टय़पूर्ण कामगिरी, नियुक्त्या, बढती, असल्यास महत्त्वाच्या पदावरील निवड, प्राप्त पुरस्कार यांचा आढावा घ्यायला हवा. त्यांचे कार्य, संस्था, पुस्तके, प्रसिद्ध विधाने यांची जास्तीत जास्त माहिती करून घेणे आवश्यक आहे.

राज्यव्यवस्थेशी संबंधित चालू घडामोडींबाबत घटनात्मक तरतुदी, तशी प्रत्यक्ष तरतूद नसल्यास कायदेशीर बाजू समजून घेणे आवश्यक आहे. तसेच याबाबत पूर्वीच्या ठळक घडामोडी माहीत असायला हव्यात.महत्त्वाच्या खेळांचे विश्वचषक, ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा, इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, त्यातील विक्रम, भारत / महाराष्ट्र यांची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.

चर्चेतील महत्त्वाची पुस्तके व त्यांचे लेखक, चर्चेतील लेखकांबाबतच्या महत्त्वाच्या बाबी तसेच साहित्य क्षेत्रातील महत्वाचे पुरस्कार व विजेते यांच्या नोट्स काढणे आवश्यक आहे.चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, संशोधन, शैक्षणिक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात. भारतातील व्यक्तींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असल्यास त्यांच्याबाबतची अतिरिक्त माहिती असणे आवश्यक आहे. पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती व त्यांचे कार्यक्षेत्र, शौर्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात.

महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार, राज्य स्तरावरील महत्त्वाची संमेलने यांची माहिती असायला हवी.केंद्रीय व राज्याच्या अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात. आर्थिक विकास दर, बैंक दर, जीएसटी, आर्थिक क्षेत्रातील नवे निर्णय, जीडीपी, जीएनपी यांची अद्ययावत माहिती असायला हवी.