सुनील तु. शेळगावकर

कोणताही विषय कोणत्याही स्पर्धा परीक्षेत अव्वल गुण मिळवून देण्यास समर्थ असतो. विषय चांगल्या पद्धतीने समजावा म्हणून एका विशिष्ट अभ्यास पद्धतीने तो हाताळावा लागतो. विषय चांगला समजला की आपल्याला चांगले गुण मिळतात. महाराष्ट्र गट – क  (पूर्व) परीक्षेसाठी नागरिकशास्त्र या विषयाची अभ्यास पद्धती आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी याचा अभ्यासक्रम पाहणे गरजेचे आहे.

maratha reservation
मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित, आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान
Maharashtra, ST Staff Congress, Practice Camp, Employee Promotion Exam, msrtc, ST Corporation,
एसटी महामंडळात सर्वात मोठी कर्मचारी बढती परीक्षा….
MLA Abhimanyu Pawar request to Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding contract recruitment in MPSC Pune
एमपीएससीत कंत्राटी भरती नको…; भाजपच्या कोणत्या आमदाराने केली मागणी?
The state board will also test the open book examination system
ओपन बुक परीक्षा पद्धतीची राज्य मंडळही करणार चाचपणी
  •   अभ्यासक्रम :

भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)

  •   अभ्यासक्रमाचे विश्लेषण:

भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास  –

भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा इतिहास/पार्श्वभूमी, घटना समिती, घटना निर्मिती, भारतीय राज्यघटनेची वैशिष्टय़े, घटनेचा सरनामा, घटना दुरुस्ती, भारतीय राज्यघटनेमधील-  भाग एक (भारत देशाचे नाव व त्याचा भूप्रदेश ), भाग दोन (नागरिकत्व व संदर्भीय तरतुदी), भाग तीन (मूलभूत हक्क), भाग चार (केंद्र -राज्य संबंध) या घटकांचा अभ्यास खोलात जाऊन करावा लागतो. याशिवाय इतर भाग त्यातील तरतुदी माहिती असणे गरजेचे आहे. याशिवाय काही विशेष बाबी जसे की; आणीबाणी, घटना दुरुस्ती, विविध लवादाची स्थापना, विशेष तरतुदी, न्यायव्यवस्था, निवडणुका इत्यादी (जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्यास याचा आणखीन तपशील लक्षात येईल.

राज्य व्यवस्थापन (प्रशासन) –

यात भारताची शासन पद्धती, संसद (लोकसभा व राज्यसभा) भारताचे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती, लोकसभा सभापती व उपसभापती, राज्यसभा अध्यक्ष व उप-अध्यक्ष, पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ, महान्यायवादी याचप्रमाणे राज्याची यंत्रणा जसे की; विधिमंडळ (विधानसभा विधान परिषद), राज्यपाल व नायब राज्यपाल, विधानसभा व विधान परिषद अध्यक्ष आणि उप-अध्यक्ष, मुख्यमंत्री व त्याचे मंत्री मंडळ, राज्याचा महाधिवक्ता इत्यादी बाबींचा अभ्यास करावा लागतो (अधिक माहितीसाठी जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा.)

ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) –

पंचायतराजविषयक समित्या, पंचायतराज व्यवस्थेचा स्वीकार, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१, ७३ वी व ७४ वी घटना दुरुस्ती,पंचायतराज व्यवस्थेची त्रिस्तरीय व द्विस्तरीय रचना, पदाधिकारी व कार्ये, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, महाराष्ट्र सरकारचे ग्राम विकास खाते इत्यादी घटकांचा अभ्यास करावा . (संदर्भीय काठिण्यपातळीच्या इतर जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्यास आणखी इतर घटक व उपघटक लक्षात येतील.)

  •   अभ्यासक्रमाव्यतिरीक्त अभ्यासक्रम:

बऱ्याचदा एखादी स्पर्धा परीक्षा देताना आपण आयोगाच्या अभ्यासक्रमाप्रमाणे अभ्यास करतो. परीक्षा कक्षांत  काही प्रश्न हे अभ्यासक्रमाबाहेरील भासतात. पण ते अभ्यासक्रम संलग्नित असतात म्हणून असे घटक नेमके कोणते हे जुन्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे शोधावे लागतात. त्यांचा शोध आणि बोध करून घेणे येथे या परीक्षेसाठी फायद्याचे ठरेल यात शंका नाही.

  •   अभ्यास पद्धती:

परीक्षा योजना, अभ्यासक्रमाचे विश्लेषण, जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास, प्रश्नांची काठिण्यपातळी, प्रश्न प्रकार इत्यादींच्या माध्यमातून आपला या परीक्षेसाठी या विषयाच्या अभ्यासाचा परीघ आखावा. पुढील अभ्यास पायऱ्याच्या  साह्याने अभ्यास करावा .

पायरी क्रमांक एक-

उपरोक्त पद्धतीने अगोदर अभ्यासक्रमाचे वाचन व मनन पूर्ण करावे. संपूर्ण विषय समजावून घ्यावा. एका घटकाचा दुसऱ्या घटकांशी संबंध जोडावा. पहिले मनन चोवीस तासांच्या आत, दुसरे मनन आठवडय़ाच्या आत आणि तिसरे एक महिन्याच्या आत पूर्ण करावे.

पायरी क्रमांक दोन –

वाचन व मनन पूर्ण झाल्यानंतर तुलनात्मक तक्ते पूर्ण करावेत. तक्ते पूर्ण करण्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकांचा आधार घ्यावा जसे की उदा: राजीनामा हा घटक घेतल्यास सर्वाचे राजीनामे एकत्र लिहून घ्यावेत, शपथविधी हा घटक घेतल्यास सर्वाचे शपथविधी एकत्र तक्त्याच्या स्वरूपात लिहून काढावे इत्यादी.

पायरी क्रमांक तीन –

सर्व तक्ते पूर्ण झाल्यानंतर जुन्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नांच्याप्रमाणे इतर नवीन प्रश्न तयार करावेत. यामुळे संपूर्ण अभ्यासावर प्रक्रिया पूर्ण होते. या प्रक्रियेनंतर ज्या घटकावर प्रश्न आजतागायत विचारलेले दिसत नाहीत त्याचीही परीक्षेतील प्रश्नाप्रमाणे  तयारी करावी.

पायरी क्रमांक चार –

अभ्यासाची अशापद्धतीने संपूर्ण तयारी झाल्यानंतर परीक्षा कक्षातील तांत्रिक चुका टाळण्यासाठी आपल्या परीक्षेच्या काठिण्यपातळीनुसार किमान तीन विषयवार सराव चाचण्या सोडवाव्यात. परीक्षेत होणाऱ्या या चुका टाळल्यास आपली तयारी पूर्ण झाली असे समजावे.

  •   अभ्यास साहित्य :

नागरिकशास्त्र या घटकाचा अभ्यास करण्यासाठी शालेय माध्यमिक व उच्च माध्यमिक क्रमिक पाठय़पुस्तके पुरेसे ठरत नाहीत. अशा पुस्तकांमध्ये नवनवीन बदल समाविष्ट असत नाहीत म्हणून बाजारातील एखादे कोणतेही पुस्तक वाचावे. याकामी एम. लक्ष्मीकांत सरांचे पुस्तक मार्गदर्शक ठरते. परंतु त्यात गरजेपेक्षा अधिक माहिती देण्यात आली आहे. ते पुस्तक राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता उपयुक्त आहे. त्यातील परीक्षाभिमुख माहिती शोधता आली पाहिजे. नसेल तर आपला अभ्यासक्रम समोर ठेवून माहितीची पडताळणी करून बाजारातील कोणतेही एखादे पुस्तक वापरावयास हरकत नाही.

नागरिकशास्त्र हा विषय जवळपास सर्व प्रकारच्या पूर्व आणि मुख्य स्पर्धा  परीक्षांचा अनिवार्य घटक आहे. यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रशासनात प्रवेश करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या देशाचा राज्यकारभार कसा चालतो हे माहिती असणे अनिवार्य आहे. नागरिकशास्त्राच्या मदतीने चालणारे देशाचे कायदे मंडळ, प्रशासनिक कार्य, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांचा अभ्यास होतो. नागरिकशास्त्र हा विषय कोणत्याही परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा विषय आहे. यामुळे या विषयाकडे दुर्लक्ष करू नये. हा विषय वरकरणी सोपा भासत असला तरी परीक्षा कक्षांमध्ये विद्यार्थ्यांना गोंधळात टाकू शकेल, असा आहे. म्हणून वर सांगितल्याप्रमाणे अभ्यास करावा. यशामागे, स्वप्नामागे धावण्याऐवजी या विषयात यश मिळवण्यासाठी अभ्यासामागे धावावे हेच खरे…