scorecardresearch

एमबीएसाठी आवश्यक कौशल्ये!

व्यवस्थापनाची पदवी घेताना विद्यार्थ्यांनी सैद्धान्तिक अभ्यासासोबत संवाद कौशल्य, विश्लेषणात्मक चिकित्सा यासारखी कौशल्ये संपादन करणे आवश्यक आहे, त्याबद्दल..

एमबीएसाठी आवश्यक कौशल्ये!

MBAव्यवस्थापनाची पदवी घेताना विद्यार्थ्यांनी सैद्धान्तिक अभ्यासासोबत संवाद कौशल्य, विश्लेषणात्मक चिकित्सा यासारखी कौशल्ये संपादन करणे आवश्यक आहे, त्याबद्दल..
एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांसंबंधीची माहिती आपण मागच्या काही लेखांमध्ये घेतली. एमबीएला प्रवेश घेतल्यानंतर तो अभ्यासक्रम योग्य प्रकारे पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये लक्षात ठेवण्याचा मुद्दा असा की, एमबीएला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांपासून जरी कमी होत असली तरी या अभ्यासक्रमाला आजही तितकेच महत्त्व आहे की, जितके पूर्वीही होते.  
वर्तमानपत्रांमधून असेही वाचनात येते की, एमबीए चालवणाऱ्या अनेक संस्था हा अभ्यासक्रम बंद करणार आहेत किंवा विद्यार्थ्यांची प्रवेशसंख्या कमी करणार आहेत. एमबीए पूर्ण केल्यानंतर चांगली नोकरी न मिळालेलेही अनेकजण आढळून येतात. या पाश्र्वभूमीवर एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा किंवा नाही, प्रवेश घेतल्यास भवितव्य काय, दोन वर्षांचा अवधी, भरमसाठ शुल्क तसेच इतर खर्च करूनही आपल्या पदरात अखेरीस काय पडणार आहे, असा प्रश्न विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या मनात उमटण्याची शक्यता आहे.
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्यास असे दिसते की, या सर्व प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. त्यासाठी अर्थातच केवळ  सकारात्मक दृष्टिकोन पुरेसा नाही तर विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण आणि योग्य ते प्रयत्नही यासाठी करायला हवेत.
अनेकदा ‘एमबीए’चा अभ्यासक्रम विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून योग्य प्रकारे पूर्ण केला जात नाही, असे दिसून येते. याचे प्रमुख कारण म्हणजे प्रवेश घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच सर्वजण नोकरीच्या म्हणजे प्लेसमेंटच्या मागे असतात. ‘एमबीए’च्या प्रवेशावेळी प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांकडून ‘तुमच्याकडचे प्लेसमेंटचे पॅकेज किती?’ अशी विचारणा होते. अर्थात प्लेसमेंटची चौकशी करणे हे गैर नाही, पण नुसतेच प्लेसमेंटच्या मागे लागल्यास मूलभूत विषयांकडे आणि महत्त्वाच्या घटकांकडे दुर्लक्ष होते. व्यवस्थापन अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था म्हणजे ‘एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज’ नव्हे हे लक्षात ठेवायला हवे. यामुळे चांगली नोकरी (प्लेसमेंट) हवी असल्यास तशी पात्रता अंगी येण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला हवेत. केवळ ‘एमबीए’ची पदवी प्राप्त केली म्हणजे सर्व काही साध्य झाले असे नाही. नोकरीच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी काही कौशल्येही विकसित करणे नितांत आवश्यक आहेत. ‘एमबीए’च्या अंतिम परीक्षेमध्ये चांगले गुण
प्राप्त करण्याबरोबरच ही कौशल्ये जाणीवपूर्वक विकसित केली तर सध्याच्या तीव्र स्पर्धेत नोकरी मिळवणे आणि ती टिकवणे
सोपे होते.
आपले विचार दुसऱ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे म्हणजे संवाद कौशल्य. हे कौशल्य विकसित करणे  अत्यंत महत्त्वाचे आहे. एमबीए अभ्यासक्रमात संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध असतात. यामध्ये सादरीकरण (प्रेझेंटेशन), गट चर्चा (ग्रुप डिस्कशन) तसेच केस स्टडीवरील चर्चा अशा अनेक प्रकारे संवादकौशल्ये वाढवता येतात. यासाठी  भाषेवरील प्रभुत्व संपादन करण्याचा, सतत सराव करण्याचा उपयोग होतो. भाषेवरील प्रभुत्व वाढवण्यासाठी इंग्रजी वर्तमानपत्रांचे तसेच पुस्तकांचे वाचन वाढवावे. नवनवे शब्द शिकून शब्दसंपत्ती वाढवल्याने बराच उपयोग  होतो. मात्र, यासाठी प्रयत्नांमध्ये चिकाटी आणि सातत्य हवे.  
लेखन कौशल्य प्रभावी होण्यासाठीही प्रयत्न करायला हवा. आपले विचार लेखनाच्या माध्यमातून प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवणे  लेखन कौशल्याद्वारे साध्य होते. वर्गामध्ये तास चालू असताना टिपणे (नोट्स) काढण्यापासून लेखन कौशल्य विकसित करण्याची सुरुवात करता येईल. याशिवाय नेमक्या शब्दांत आशय व्यक्त करणे, एखाद्या लेखाचा सारांश तयार करणे, इत्यादींमुळे लेखनाचा सराव वाढवता येतो. एमबीए अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर व्यवस्थापक म्हणून काम करताना या कौशल्यांचा उपयोग होतो. व्यवस्थापक म्हणून काम करताना वेगवेगळ्या विषयांवर सादरीकरण करणे, पत्रव्यवहार करणे, वेगवेगळ्या प्रकारचे दस्तऐवज (डॉक्युमेंट्स) तयार करणे ही कामे सतत करावी लागतात. यासाठी संवाद कौशल्य विकसित होणे महत्त्वाचे आहे. प्रयत्नांनी हे साध्य होऊ शकते. मात्र, त्यासाठी चिकाटी व सातत्य हवे.
व्यवस्थापन करताना लागणारे आणखी एक महत्त्वाचे कौशल्य म्हणजे विश्लेषणात्मक क्षमता. कोणत्याही घटनेचे विश्लेषण करणे आणि त्यामधून योग्य ते निष्कर्ष काढणे व्यवस्थापकाचे महत्त्वाचे काम आहे. दैनंदिन कामकाजामध्ये कोणत्याही व्यवस्थापकाला अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नावर निर्णय घ्यावे लागतात. निर्णय घेताना त्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधून काढणे, या पर्यायांची योग्यता ठरवताना आवश्यक माहिती गोळा करणे, या माहितीचे विश्लेषण करून योग्य त्या पर्यायाची निवड करणे म्हणजेच योग्य तो निर्णय घेणे अशी साधारण निर्णयप्रक्रिया असते. यासाठी कोणती माहिती गोळा करायची आणि तिचे विश्लेषण  कसे करायचे हे समजायला हवे. यासाठीच विश्लेषणात्मक क्षमता आवश्यक असते. ही क्षमता आपल्याकडे उपजत असतेच असे नाही तर ही क्षमता प्रयत्नपूर्वक वाढवावी लागते. कित्येक वेळा प्रवेश परीक्षांमध्ये एखादी घटना देऊन त्यावर तुमचे मत मागतात. हे प्रश्न सोडवताना विश्लेषणात्मक क्षमतेचाच वापर अपेक्षित असतो. म्हणून प्रवेश परीक्षेला बसण्यासाठी ही क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू करायला हवे. विश्लेषणात्मक क्षमता ही कोणत्याही क्षेत्रामध्ये म्हणजे विपणन, वित्त, मनुष्य बळ विकास, उत्पादन इत्यादी कोणत्याही क्षेत्रामध्ये उपयोगी पडते.
वर उल्लेख केलेल्या कौशल्यांव्यतिरिक्त आपल्या  व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष द्यायला हवे. व्यक्तिमत्त्व विकासामध्ये वक्तृत्व क्षमता, चतुरस्रता तसेच अभ्यासातील नैपुण्य, वाचन व लेखन क्षमता अशा अनेक बाबींचा समावेश होतो. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमधील एक प्रमुख फरक म्हणजे पदवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या मोठी असल्यामुळे महाविद्यालयातील उपक्रमांत प्रत्येकालाच संधी मिळतेच असे नाही. तुलनेने एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यामुळे महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले व्यक्तिमत्त्व विकसित करण्याची संधी प्रत्येकाला मिळू शकते. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यायला हवा.
सारांश, एमबीए अभ्यासक्रमानंतर चांगल्या करिअरच्या संधी आजही उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरते. एमबीए अभ्यासक्रमाची दोन वर्षे आपल्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. हे समजून घेत या वर्षांमध्ये अधिकाधिक प्रयत्न केले तर यशस्वी होता येते, हे निश्चित.     
nmvechalekar@yahoo.co.in
(लेखक पुण्याच्या इंडसर्च संस्थेचे अधिष्ठाता आहेत.)

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Required skills for mba

ताज्या बातम्या