नोकरी शोधणाऱ्या- बदलणाऱ्या गरजू उमेदवारांना नेमके हेरून त्यांच्याशी मुलाखतीच्या माध्यमातून संपर्क साधून व खोटय़ा मुलाखत नेमणूकपत्राचे आमीष दाखवून मोठी रक्कम वसूल करत उमेदवारांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सध्या मोठय़ा प्रमाणावर होत आहेत. मुख्य म्हणजे असे प्रयत्न काही फुटकळ व्यक्तींप्रमाणे सामूहिकरीत्या  योजनापूर्वक आणि मोठय़ा प्रमाणात होत असून या गैरप्रकारांची वेळेत दखल घेणे गरजेचे आहे.
सद्यस्थितीतील नोकरी- रोजगारांचे घटते प्रमाण, नोकरी शोधणाऱ्या, बदलणाऱ्या उमेदवारांची वाढती संख्या, त्यांची निकड आणि मानसिकता यामुळे अशा मंडळींचे फावत असून जाणारा पैसा व वाढता मनस्ताप यामुळे संबंधित उमेदवारांना  होणाऱ्या वाढत्या त्रासाप्रमाणेच खोटय़ा, फसवणुकीच्या मुलाखती-  नेमणूकपत्रांचा वाढता त्रास विशेषत: मोठय़ा व प्रस्थापित कंपन्यांनाही होत आहे. काही कंपन्यांनी तर यामुळे त्यांच्या व्यवस्थापन व व्यावसायिक प्रतिष्ठेला बाधा पोहोचत असल्याने अशा फसवणूकदारांविरुद्ध व्यापक प्रयत्न सुरू केले आहेत.
फसवणूक करत बनावट पद्धतीने उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांनी खोटी नेमणूकपत्रे देण्याच्या विरोधात ज्या प्रस्थापित कंपन्यांनी योजनाबद्ध प्रयत्न सुरू केले आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने पुढील कंपन्या आणि त्यांच्याद्वारे करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा समावेश करावा लागेल –
‘इंटेल-इंडिया’ कंपनीत नोकरी देण्याचे आश्वासन देत काही टोळक्यांनी उमेदवारांची केलेल्या फसवणुकीचा किस्सा असाच चर्चिला जात आहे. बंगळुरु येथील काही उमेदवारांना इंटेलमध्ये नोकरी देण्याचे आमीष दाखवण्यात आले. त्यांची मुलाखत घेऊन, खोटे नेमणूकपत्र देत, संबंधित उमेदवारांची फसवणूक करून त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करण्यात आल्याच्या वाढत्या तक्रारी बंगळुरु पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे.
‘वॉश’ कंपनीच्या संदर्भात असाच किस्सा घडला आहे. खोटय़ा मुलाखत- नेमणूकपत्रांद्वारे नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांची वारंवार फसवणूक करून त्यांच्याकडून  मोठय़ा रकमा वसूल करण्याचे अनेक प्रकार घडल्यानंतर वॉश कंपनीने प्रमुख वृत्तपत्रांत यासंबंधीचे निवेदन प्रकाशित करून अशा उमेदवारांना संभाव्य फसवणुकीपासून सावध राहण्याचा जाहीर सल्ला दिला आहे.
मारूती सुझुकी, ह्य़ुंडाई, एचसीएल टेक्नॉलॉजीज यासारख्या कंपन्यांनीही अशा गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने व उमेदवारांची फसवणूक टाळून कंपनीच्या पतप्रतिष्ठेला बाधा पोहोचू नये यासाठी ‘ई मेल’चा वापर करण्यावर भर दिला आहे.
‘आयबीएम’ सारख्या कंपनीने आपल्या संकेतस्थळावरील ‘रोजगार-संधी’च्या जोडीलाच उमेदवारांनी अनधिकृत नोकरी-निवड एजंटांपासून सावध राहून आपली फसवणूक टाळण्याचा जाहीर सल्ला देण्यास सुरुवात केली आहे.
‘इंटेल’ने तर फेसबुकाच्या माध्यमातून  उमेदवारांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला असून, कंपनीद्वारा त्यासंदर्भात आता संगणकीय पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे.
प्रमुख कंपन्यांच्या संदर्भात खोटय़ा व फसवणूक करणाऱ्या व त्याद्वारा संबंधित उमेदवारांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणावर पैसे उकळण्याच्या प्रकारांची नोंद ‘नॅसकॉम’द्वारा घेण्यात आली आहे. ‘नॅसकॉम’तर्फे गेली काही वर्षे संगणक तंत्रज्ञान-संगणक सेवा उद्योग क्षेत्रातील विविध स्वरूपाच्या व विविध प्रकारच्या गैरव्यवहारांवर व्यापक व प्रभावी तोडगा शोधण्यासाठी प्रयत्नशील असून आपल्या याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ‘नासकॉम’ ने मुलाखत-नोकरीच्या संदर्भातील वाढते गैरव्यवहार आणि पैसे वसुलीच्या वाढत्या प्रकारांच्या विरोधात पुढाकार घेतला आहे, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
यासंदर्भात ‘नासकॉम’द्वारा नव्याने केलेल्या एका अभ्यासात असे सिद्ध झाले आहे की, मोठय़ा व प्रस्थापित कंपन्यांमध्ये मुलाखत- नोकरीचे अमिष दाखवून त्याद्वारे त्यांची हजारो रुपयांनी फसवणूक होण्याचे प्रमाण नव्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला म्हणजेच जून- ऑगस्ट या कालावधीत सर्वाधिक असते. अभ्यास अहवालात नमूद केल्यानुसार, नव्या शैक्षणिक सत्राच्या पहिल्या टप्प्याच्या तिमाहीत नव्याने उत्तीर्ण झालेल्या पदवीधर-पदवीधारकांचे प्रमाण सर्वाधिक असते. यातील बहुतांश उमेदवारांना नोकरीची गरज असते तर काहींना त्यांच्या शैक्षणिक कर्जाची परतफेड करण्यासाठी लगेच नोकरी करणे अत्यावश्यक असते. अशा गरजू उमेदवारांची नोकरी-रोजगार विषयक निकड लक्षात घेत त्यांची दिशाभूल करण्याचे आणि अशा उमेदवारांकडून पैसे उकळण्याचे प्रकार सुरू होतात.
गरजू उमेदवारांच्या नोकरी-रोजगार विषयक गरजा लक्षात घेऊन  व त्यांच्याकडून पैसे उकळण्याची फसवणूक करणाऱ्यांच्या कार्यपद्धतीत आणि कार्यशैलीत विलक्षण साम्य असते असे आढळून आले आहे. या साऱ्या फसवणुकीची सुरुवात होते, ती संबंधित कंपनीच्या तंतोतंत जुळणाऱ्या लेटरहेडवर उमेदवारांना मुलाखतीसंदर्भात ई-मेल पाठवून सूचित करण्यापासून. हा प्रकार इतक्या बेमालूमपणे केला जातो की, त्यावरून कुणाला काही शंका येण्याचे कारणच उरत नाही. या मुलाखत सूचनेमध्ये उमेदवाराला त्याचा अर्ज वा उमेदवारी कंपनीच्या दृष्टीने कशी मिळतीजुळती आहे, हेही सूचित करून या साऱ्या सूचना-प्रक्रियेवरील उमेदवारांचा विश्वास प्राप्त केला जातो.
त्यानंतर अशा ‘निवडक’ उमेदवारांना कंपनीच्या एचआर मॅनेजरच्या बँक खात्यात विशिष्ट रक्कम सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून जमा करण्याबद्दल सूचित करण्यात येते. ही रक्कम साधारणत: सात हजार रु.पासून  १५ हजार रुपयांपर्यंत असते व हे सारे व्यवहार रोखीनेच करण्यावर भर दिला जातो. पत्रात असे असेही नमूद करण्यात येते की, ही रक्कम उमेदवारांच्या प्रवास खर्चापोटी मागविण्यात येत असून त्यामध्ये बाहेरगावच्या उमेदवारांच्या भोजन व निवास खर्चाचाही समावेश आहे. कंपनीच्या लेटरहेडवरील स्वाक्षरीसह असणारा मजकूर व त्यातील तपशील सहजगत्या पटणारा असल्याने त्यावर कुणाचाही विश्वास बसतो व जवळपास सर्वच उमेदवार त्यानुसार रोखीने रक्कम भरतात आणि त्यांच्या फसवणुकीचा पहिला टप्पा पूर्ण होतो. मुख्य म्हणजे मुलाखतीनंतर ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ म्हणून घेण्यात येणारी रक्कम परत करण्याची कथित हमी देण्यात आगामी फसवणुकीवर विश्वासार्हतेचे शिक्कामोर्तबही करण्यात येते.
प्रत्यक्षात मात्र अशा प्रकारच्या कुठल्याही मुलाखती घेतल्याच जात नाहीत. जे उमेदवार रक्कम भरण्यास वेळ लावतात त्यांच्याशी फोनद्वारा संपर्क साधून पैसे भरणे त्यांच्या हिताचे कसे आहे व आलेल्या वा येऊ घातलेल्या संधीचा त्यांनी कशाप्रकारे फायदा घ्यावा ते पटवून देण्यात येते. उद्देश हाच की, अधिकाधिक संख्येतील अर्जदार-उमेदवार आपल्या जाळ्यात ओढले जावेत.
अशाप्रकारे सिक्युरिटी डिपॉझिट भरलेल्या उमेदवारांच्या पहिल्या टप्प्यातील विश्वासाला बळकटी देण्यासाठी त्यांना खोटे मुलाखतपत्र पाठवले जाते. प्रत्यक्षात अशा मुलाखती ठरलेल्याच नसतात. काही वेळेस ‘अपरिहार्य’ कारणांमुळे मुलाखत लांबणीवर टाकण्यात आल्याचे या उमेदवारांना आवर्जून सूचित करण्यात येते.
दरम्यान उमेदवारांना सूचित करण्यात येते की, मुलाखत घेता आली नसली तरी त्यांची पात्रता  व शैक्षणिक आलेखाच्या आधारे त्यांची निवड मात्र निश्चित करण्यात आली असून त्यांना त्यांची रूजू होण्याची तारीख वेगळ्या स्वरूपात सांगण्यात येणार आहे. या साऱ्या प्रक्रियेशी निगडित प्रशासकीय कामांसाठी आणि प्रक्रियेसाठी त्यांनी १० हजार रु. आधी भरल्याप्रमाणेच रोखीने भरण्याचे आग्रहपूर्वक सूचित करण्यात येते. उमेदवारांना या साऱ्या संदर्भात विश्वास वाटावा यासाठी त्यांना बेमालुम व अगदी हुबेहूब खरे वाटावे असे नेमणूकपत्र स्वतंत्रपणे पाठवले जाते. यावेळी कंपनीच्या लोगोपासून, वेतनश्रेणी, सेवा-शर्ती, स्वाक्षरी इ.चा ताळमेळ तंतोतंतपणे जुळवून आणलेला असतो. त्यालाच जोड मिळते ती दूरध्वनीवरील सततच्या पाठपुराव्याची. अशा परिस्थितीत कुठला गरजू उमेदवार मोठय़ा विश्वासाने १० ते १५ हजार रुपये भरण्याची तयारी करतात.
या पद्धतीने आपल्याला मिळालेले कथित नेमणूकपत्र घेऊन उमेदवार विशिष्ट प्रतिष्ठित कंपनीत कामावर रूजू होण्यास जातात तेव्हा त्यांना कळते की, त्यांची फसवणूक होऊनही बराच उशीर झाला आहे.
उमेदवारांची ही दुर्दैवी फसवणूक टाळली जावी, यासाठी आता प्रमुख कंपन्यांनीच प्रबोधनापासून पोलिसी कारवाईपर्यंतची  पावले उचलायला सुरूवात केली आहे. मात्र या प्रकाराला पुरता आळा बसावा, यासाठी उमेदवार आणि त्यांच्या पालकांनीसुद्धा कुठल्याही प्रकारच्या फसव्या आश्वासनाला बळी पडू नये. यासंबंधी त्या विशिष्ट कंपनीला सूचित करणे व प्रसंगी पोलिसांचीही मदत घेणे तितकेच आवश्यक ठरते.