किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेंतर्गत शिष्यवृत्ती

केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आणि बंगळुरूच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना राबविण्यात येते.

केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आणि बंगळुरूच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना राबविण्यात येते. विज्ञान विषयासह शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तंत्र-विज्ञान विषयात उच्च-शिक्षण व संशोधनपर उत्तेजन देण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. या योजनेची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे –
योजनेचा उद्देश
या शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश अर्हतापात्र विद्यार्थ्यांना विज्ञान विषयासह बीएस, बीएस्सी, बी-स्टॅटिस्टिक्स, एमएस्सी, एमएस यांसारख्या अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देणे हा आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
अर्जदार विद्यार्थ्यांची पात्रका खालील नमूद केल्यानुसार असावी –
एसए गट : अर्जदार विद्यार्थ्यांनी २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात विज्ञान विषयासह अकरावीमध्ये प्रवेश घेतलेला असावा. त्यांची दहावीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी किमान ८० टक्के (राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी ६० टक्के) असावी.
एसएक्स गट : अर्जदारांनी १०+२ या शैक्षणिक अभ्याासक्रमांतर्गत २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात विज्ञान विषयासह बारावीत प्रवेश घेतलेला असावा. त्यांची शालान्त परीक्षेतील गुणांची टक्केवारी किमान ८० टक्के (राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी ६० टक्के) असावी.
एसबी गट : अर्जदारांनी २०१५-२०१६ या शैक्षणिक सत्रात विज्ञान विषयासह बीएस्सी प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा. त्यांची बारावीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी किमान ८० टक्के (राखीव गटातील उमेदवारांसाठी
६० टक्के) असावी.
या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या एकूण शिष्यवृत्तींपैकी काही शिष्यवृत्ती अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.
अर्जासह पाठवायचे शुल्क
अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून एक हजार रु. संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांची निवडचाचणी संगणकीय पद्धतीने देशातील प्रमुख शहरांतील निवडक परीक्षा केंद्रांवर १ नोव्हेंबर २०१५ रोजी घेण्यात येईल आणि त्याआधारे त्यांची संबंधित गटातील शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येईल.
शिष्यवृत्तीचा तपशील या योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या कालावधीत दरमहा पाच हजार ते सात हजार रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि त्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेच्या चौपट रक्कम वार्षिक आकस्मिक निधी स्वरूपात देण्यात येईल.
अधिक माहिती
शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजने’ची जाहिरात
पाहावी अथवा दि कन्व्हेनर, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना,
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरू ५६००१२ या
पत्त्यावर चौकशी करावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.kvpy.iisc.crnet.in
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३० ऑगस्ट २०१५ पर्यंत अर्ज करावा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Scholarship scheme to promote young scientists