चंपत बोड्डेवा
भारतीय समाजातील ज्वलंत प्रश्न (Current Issues In Indian Society) या अभ्यासघटकाचा यूपीएससी मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. या घटकांतर्गत वर्तमान भारतीय समाजाची मूलभूत गुण वैशिष्टय़े, सामाजिक विविधता, स्त्रियांचे आजचे प्रश्न, लोकसंख्या, दारिद्रय़ आणि विकासाच्या आंतरविरोधातून उद्भवणारे मुद्दे, नागरीकरणातील समस्या व त्यावरील उपाययोजना, जागतिकीकरणाचे भारतीय समाजावर होणारे परिणाम, सामाजिक सक्षमीकरणाचे मुद्दे तसेच जमातवाद, प्रदेशवाद आणि धर्मनिरपेक्षतेसंबंधीच्या मुद्दयांचा समावेश केलेला दिसून येतो.
या अभ्यास घटकांतर्गत येणाऱ्या उपघटकांवरही यूपीएससीने मुख्य परीक्षेत प्रश्न विचारलेले दिसून येतात. मागील काही वर्षांत या घटकांवर ६२ गुणांपासून ते ७५ गुणांपर्यंत प्रश्न विचारले गेले आहेत. प्रश्नांचे स्वरूप पाहता यूपीएससीने सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये कमीतकमी ५ ते ६ प्रश्न या अभ्यास घटकांवर सातत्याने विचारलेले आहेत.
आजपर्यंत मुख्य परीक्षेत कुटुंबपद्धती, जाती, लिंगभाव, जागतिकीकरण, धर्मनिरपेक्षता, प्रदेशवाद, दारिद्रय़ यांच्या विविध आयामावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. प्रस्तुत लेखात ‘भारतातील कुटुंबसंस्था आणि तिचे वर्तमानकालीन स्थान’ याचा थोडक्यात ऊहापोह केलेला आहे. या घटकाचा अभ्यास करताना कुटुंब रचना ही एक ‘सामाजिक संस्था’ आहे आणि इतर सामाजिक संस्थांशी कुटुंबसंस्थेचे नाते कोणत्या प्रकारचे आहे, याही बाबी सर्व प्रथम ध्यानात घ्याव्यात. कुटुंबसंस्था आकलनाच्या कक्षेत येण्यासाठी जात, वर्ग, धर्म, विवाह, रीती-परंपरा या संस्थांच्या जोडीने समजून घ्यावी लागते. परंतु त्या सोबत जागतिकीकरणाच्या सांस्कृतिक, आर्थिक प्रवाहाच्या प्रभावातून कुटुंब रचनेत काय प्रकारचे बदल होत आहेत याचाही विचार करावा लागतो.
मुख्य परीक्षेच्या दृष्टीने विचार करू पाहता, मागील काही वर्षांपूर्वी मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेला एक प्रश्न येथे उदाहरणादाखल पाहू या – संयुक्त कुटुंबाची जीवनशैली सामाजिक मूल्याऐवजी आर्थिक चल घटकांवर अवलंबून आहे, यावर चर्चा करा. या प्रश्नाची मुळे शोधण्यासाठी शहरीकरण व औद्योगिकरण अंतर्भूत असलेली आर्थिक प्रकिया नीट समजून घ्यावी लागते. दुसऱ्या बाजूला वर म्हटल्याप्रमाणे मुद्दे कितीही जुने असले तरीही वर्तमानातील त्या मुद्दयांचे स्थान काय आहे आणि त्याची चिकित्सा यावर यूपीएससी भर देताना दिसते.
शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या धोरणाने रोजगाराचे आणि उत्पन्नाचे अन्य पर्याय समोर आले. स्वातंत्र्यानंतर शहरीकरणाचे धोरण कायम राहिल्याने संयुक्त कुटुंबरचनेत मोठा बदल घडून येत गेला. रोजगार, शिक्षण आणि जात व्यवस्थेतील वैगुण्यामुळे खेडय़ातील लोकांचे शहरांकडे स्थलांतर होण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढत गेले. अशा परिस्थितीत संयुक्त कुटुंबरचेनेचे आधार आणि गुण वैशिष्टय़ांमध्ये बदल घडून आले. थोडक्यात, सामाजिक मूल्याऐवजी संयुक्त कुटुंबावर आर्थिक घटक प्रभाव टाकू लागले.
जागतिकीकरणाच्या रेटय़ातून कुटुंबे वर्तमान बाजारव्यवस्थेच्या (मार्केट) भूमिकेत उतरू लागली. वाढत्या गरजांमधून अधिक अर्थार्जन कमावण्याकडे कल वाढू लागला. त्यातूनही संयुक्त कुटुंबरचनेला तडे जाऊ लागले. व्यक्तीचे झालेले वस्तुकरण कुटुंबरचनेत बदल घडवून आणते. त्यामुळे चंगळवादाने कुटुंबसंस्थेवर काय प्रकारचे परिणाम केले, याचीही उत्तरे मिळवणे आवश्यक आहे.
संयुक्त कुटुंबरचनेकडून विभक्त कुटुंबरचनेकडे झालेल्या स्थित्यंतरातून अनेक मुद्दे निर्माण झाले. विभक्त कुटुंबात आई-वडील दोघे नोकरी निमित्ताने घराबाहेर पडणे अनिवार्य असल्याने लहान मुलांचा सांभाळ ही मोठी जिकिरीची समस्या बनली. त्यामुळे शहरीकरण आणि विभक्त कुटुंबे यांच्या आंतर संबंधावर यूपीएससीकडून प्रश्न विचारले गेले आहेत.
दुसरी समस्या म्हणजे निवाऱ्याची जागा मर्यादित असल्याने आणि कुटुंबाचा खर्च वाढत गेल्याने घरातील वृद्धांचे राहणीमान प्रभावित झाले. त्यातून समाजामध्ये त्यांच्यासाठी वृद्धाश्रमे उदयाला आली. या धर्तीवर वृद्धांची हेळसांड थांबवण्यासाठी सरकारने कोणती धोरणे आखली आहेत याचाही विचार अभ्यासामध्ये करावा लागेल.
कुटुंबसंस्थेच्या संक्रमणातून जनरेशन गॅप नावाची समस्या समोर आली. मने जुळत नाहीत, दृष्टिकोनामध्ये फरक पडत जातो; अशी विविध लक्षणे असलेल्या जनरेशन गॅपचा अर्थ लावणे, ती निर्माण होण्याचे आधार तपासणे तसेच या जनरेशन गॅपची कारणे आणि परिणाम याचाही अभ्यास अनिवार्य ठरतो.
वर्तमान कुटुंबसंस्थेचा परिचय करून घेण्यासाठी कुटुंबपद्धतीचे पायाभूत घटक आणि तिची गुण वैशिष्टय़े काय होती आणि त्यात वेळोवेळी कसा फरक पडत गेला, तसेच त्यात कोणते बदल घडून आले, बदलास जबाबदार असणारी प्रक्रिया आणि तिचे चलघटक कोणते आहेत, यालाही स्पर्श करावा लागेल. त्या दृष्टीने किमान पातळीवर संकल्पनात्मक अभ्यास एनसीईआरटीच्या इयत्ता बारावी समाजशास्त्राच्या क्रमिक पुस्तकातून करता येऊ शकतो. ती मुख्यत: ‘इंडियन सोसायटी’आणि ‘सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट इन इंडिया’ या नावाने बाजारात उपलब्ध आहेत. परंतु त्यापुढे जाऊन वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून संदर्भ पाहावे लागतील.

Mumbai Local Female Passenger do not complain about Crimes information comes from the GRP study
चोरी, छेडछाड, लैंगिक छळाविरोधात ७१ टक्के महिलांचा तक्रार करण्यास नकार; कारण काय? अभ्यासातून ‘ही’ माहिती समोर
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)