अपंग विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या अपंग विद्यार्थी विकास मंत्रालयातर्फे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी देण्यात येणाऱ्या विशेष शिष्यवृत्ती योजनेंतर्गत खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी- उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : या योजनेंतर्गत उपलब्ध असणाऱ्या शिष्यवृत्तींची संख्या १००० असून यापैकी ३०% शिष्यवृत्ती या महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदारांनी व्यावसायिक विषयांसह पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा. त्यांच्या पालकांचे मासिक एकत्रित उत्पन्न २५००० रु.पेक्षा अधिक नसावे. अर्जदार अन्य कुठल्याही शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी नसावेत व त्यांच्याजवळ त्यांच्या अपंगत्वाबद्दलचा दाखला असायला हवा.
शिष्यवृत्तीची रक्कम : योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी दरमहा २५०० रु. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दरमहा ३००० रु. शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात येईल. याशिवाय या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार दरवर्षी अनुक्रमे ६००० व १००० रु. शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी देण्यात येतील.
अधिक माहिती व तपशील : या शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल हँडीकॅप्ड फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या दूरध्वनी क्र. ०१२९-२२२६९१० अथवा २२८७५१२ वर संपर्क साधावा अथवा कॉर्पोरेशनच्या http://www.nhidc.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
या योजनेंतर्गत संबंधित पात्रताधारक विद्यार्थी वर्षभरात केव्हाही अर्ज करून त्याचा लाभ घेऊ शकतात.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज नॅशनल हँडीकॅप्ड फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, एनएचएफडीसी, रेड क्रॉस भवन, सेक्टर-१२, फरिदाबाद १२१००६ (हरियाणा) या पत्त्यावर पाठवावेत.