केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालयातर्फे अपंग विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी देण्यात येणाऱ्या ‘अपंग विद्यार्थी विशेष शैक्षणिक शिष्यवृत्ती योजने’अंतर्गत पात्रताधारक अपंग विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
आवश्यक पात्रता : संबंधित अर्जदार विद्यार्थी त्यांच्या पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यास पात्र असावेत वा त्यांनी अशा अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेला असावा. त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांहून अधिक नसावे.
शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : या योजनेअंतर्गत दीड हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यापैकी ३० टक्के शिष्यवृत्ती महिला अपंग विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.
शिष्यवृत्तींची रक्कम व इतर लाभ : योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पुढीलप्रमाणे शिष्यवृत्ती व इतर आनुषंगिक लाभ उपलब्ध होतील-
०     व्यावसायिक क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दरमहा शैक्षणिक शिष्यवृत्ती.
०     पुस्तके, शैक्षणिक साहित्य वा इतर आनुषंगिक खर्चापोटी पदवी अभ्यासक्रमासाठी वार्षिक ६ हजार रुपये तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी वार्षिक १० हजार रुपयांचे अर्थसाह्य़.
०     याशिवाय पात्रताधारक विद्यार्थी अपंग विद्यार्थी शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असल्यास अशा शैक्षणिक संस्थांनाही विशेष अर्थसाह्य़ देण्यात येईल.
अधिक माहिती : या शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ मार्च २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालयाची जाहिरात पाहावी. मंत्रालयाच्या http://www.socialjustice.nic.in अथवा http://www.nhfdc.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत : पात्रताधारक उमेदवार, त्यांचे पालक अथवा संस्थांनी संगणकीय पद्धतीने http://www.nhfdc.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करून त्याची प्रत संबंधित शैक्षणिक संस्था प्रमुखामार्फत नॅशनल हँडिकॅप्ड फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, रेडक्रॉस भवन, सेक्टर- १२, फरिदाबाद १२१००७, हरियाणा या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची विशिष्ट अशी अंतिम तारीख नसल्याने त्यासाठी वर्षांतून केव्हाही अर्ज करता येतो, हे विशेष.