फारुक नाईकवाडे

मागील लेखामध्ये प्राकृतिक आणि संकल्पनात्मक भूगोलाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये आर्थिक आणि सामाजिक भूगोलाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

आर्थिक भूगोल

* आर्थिक भूगोल हा पूर्णत: तथ्यात्मक घटक आहे. भारताच्या आर्थिक भूगोलावर प्रश्नांची संख्या कमी असली तरी आर्थिक पाहणी अहवालामधून महत्त्वाची पिके, खनिजे, उद्योग यांची देशातील सर्वाधिक उत्पादन, उत्पन्न व निर्यातीमधील वाटा असणारी राज्ये यांची माहिती अद्ययावत करून घ्यायला हवी.

* यामध्ये खनिजे व उर्जा स्रोत, महत्त्वाचे पायाभूत उद्योग, महत्त्वाची धरणे / प्रकल्प व महत्त्वाची पर्यटनस्थळे यांचा कोष्टकामध्ये मांडणी करून अभ्यास करायचा आहे.  कोष्टकामध्ये समाविष्ट करायचे मुद्दे पुढीलप्रमाणे स्थान, वैशिष्टय़े, आर्थिक महत्त्व, असल्यास वर्गीकरण, असल्यास पर्यावरणीय मुद्दे, संबंधित समस्या, कारण, उपाय, असल्यास संबंधित चालू घडामोडी.

* महाराष्ट्रातील महत्त्वाची वने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, जैवविविधता क्षेत्रे यांचा भौगोलिक व पर्यावरणीय वैशिष्टय़े व महत्त्व या दृष्टीने अभ्यास करावा. वनांचे आर्थिक महत्त्व समजून घ्यावे.

* महाराष्ट्रातील खनिजांचे उत्पादन होणारी क्षेत्रे, त्यांची भूशास्त्रीय रचना, उत्पादनाचे प्रमाण व गुणवत्ता, खाणींचे प्रकार या बाबी समजून घ्याव्यात.

* भारतातील व महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार पुढील मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यासावेत. खडकांचा प्रकार, निर्मिती, कोठे आढळतो, भौगोलिक व वैज्ञानिक वैशिष्टय़े, रचना, आर्थिक महत्त्व.

* धार्मिक, वैद्यकीय, सांस्कृतिक पर्यटन,  eco-tourism, राखीव उद्याने,इ. संकल्पना व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय उद्याने, वने माहीत असायला हवीत.

भारतातील प्रसिद्घ वने, उद्याने आणि सद्य:स्थितीत चच्रेत असलेली स्थळे याची माहिती करून घ्यावी. संदर्भ साहित्यातील संबंधित सगळे कोष्टक पाठ करणे आवश्यक नाही.

* सामाजिक भूगोल

यामध्ये राजकीय, मानवी आणि लोकसंख्या भूगोल हे उपघटक विचारात घेता येतील.

राजकीय भूगोल

* प्रशासकीय विभागातील जिल्हे, त्यांची मुख्यालये व त्यांची वैशिष्टय़े, जिल्ह्य़ांची कालानुक्रमे निर्मिती, महत्त्वाची शहरे, आर्थिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे यांची कोष्टक पद्धतीत मांडणी करून टिप्पणे काढावीत.

* राज्यातील जिल्ह्य़ांच्या सीमा, इतर राज्यांच्या सीमेवरील जिल्हे, जिल्ह्य़ांच्या सीमा म्हणून उपयुक्त ठरणारी नदी/ डोंगर/नैसर्गिक भूरूपे आणि राज्याचा राजकीय नकाशाही व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.

लोकसंख्या भूगोल

* भारताच्या व राज्याच्या लोकसंख्येचा साक्षरता, नागरीकरण, लिंगगुणोत्तर, रोजगार, लोकसंख्येची घनता या मुद्दय़ांच्या आधारे आढावा घ्यावा. जन्मदर, मृत्यूदर, बाल लिंगगुणोत्तर, माता मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर, बाल मृत्यूदर यांची माहिती असायला हवी.

*  यामध्ये सन २००१ व २०११ च्या जनगणनेची तुलना, वरील मुद्दय़ांबाबत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण असलेली तीन राज्ये, तुलनेने सर्वात जास्त व सर्वात कमी वाढ झालेली राज्ये व सर्व बाबतीत महाराष्ट्राचे दोन्ही वर्षांमधील स्थान तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण व वाढीचे जिल्हे अशा पद्धतीने कोष्टके तयार करून टिप्पणे काढणे फायदेशीर ठरेल.

मानवी भूगोल

* वसाहतींचे प्रकार, आकार, स्वरूप, ठिकाण व आर्थिक महत्त्व पाहायला हवेत. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वसाहत आहे हे समजून घेता आले तर उत्तम. पण माहिती नसल्यास वसाहतींचे प्रकार नीट अभ्यासले असतील तर एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी वसाहत कोणत्या प्रकारे विकसित झालेली असू शकेल याचा अंदाज नक्की बांधता येऊ शकतो.

* स्थलांतराचा कारणे, स्वरूप, समस्या, परिणाम व उपाय, इ. दृष्टीने अभ्यास आवश्यक आहे. या बाबतीत ‘आकडेवारी’ हा मुद्दा महत्त्वाचा आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भातील स्थलांतराची आकडेवारी (म्हणजे टक्केवारी) आर्थिक पाहणी अहवालामधून अद्ययावत करून घ्यायला हवी. यामध्ये स्थलांतरातील सामाजिक घटकांचे उतरत्या क्रमाने प्रमाण, कारणांची उतरत्या क्रमाने टक्केवारी, कोणत्या ठिकाणाहून स्थलांतर होत आहे त्यांच्या टक्केवारीचा उतरता क्रम ही आकडेवारी महत्त्वाची आहे.

टीप

प्रत्यक्ष तयारी करताना या विषयाच्या इंग्रजी भाषेतील संज्ञा पाहायचीही सवय असायला हवी. आणि प्रत्यक्ष पेपर सोडवताना इंग्रजी व मराठी दोन्ही प्रश्न पाहावेत. इंग्रजी प्रश्नातील

The following figures are relief features created by external forces.  या वाक्याचे मराठी भाषांतर ‘बहिर्गत शक्तींच्या खनन कार्यामुळे पुढील काही भूरूपांच्या आकृत्या दिलेल्या आहेत.’ असे पूर्णपणे चुकीचे भाषांतर देण्यात आले होते. प्रत्यक्षात बहिर्गत शक्तींच्या अपक्षय (खनन) आणि संचयामुळे होणारी दोन्ही प्रकारच्या अशा एकूण चार भूरूपांच्या आकृत्या प्रश्नामध्ये देण्यात आल्या आहेत.

संदर्भग्रंथ

* राज्य पाठय़पुस्तक मंडळ अकरावी व बारावी आणि NCERT आठवी ते दहावी

* महाराष्ट्राचा भूगोल व भारताचा भूगोल – के. ए. खतीब

* जिऑग्राफी ऑफ इंडिया, वर्ल्ड जिऑग्राफी व मानवी भूगोल – माजिद हुसेन

* महाराष्ट्रातील जिल्हे – के सागर प्रकाशन