आंतरराष्ट्रीय संघटना

आंतरराष्ट्रीय संघटना राष्ट्रांमधील सामाजिक, आर्थिक, राजकीय व सुरक्षाविषयक सहकार्य सुकर करण्याचे कार्य पार पाडतात.

यूपीएससीची तयारी : प्रवीण चौगले

प्रस्तुत लेखामध्ये यूपीएससी मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर- २ मधील आंतरराष्ट्रीय संघटना या अभ्यासघटकाविषयी जाणून घेऊ या. आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे भिन्नभिन्न राष्ट्रांमधील शासकीय यंत्रणांनी अगर खासगी व्यक्तींनी एकत्र येऊन काही विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी स्थापन केलेली स्थायी स्वरूपाची यंत्रणा होय. परस्परांचे हितसंबंध असणाऱ्या या राष्ट्रांनी समान बंधने घालून घेणे स्वहिताच्या दृष्टीने आवश्यक असते. या आवश्यकतेतूनच आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण होत असतात. एकोणिसाव्या शतकामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन झाल्या. १८५६ साली स्थापन करण्यात आलेला डॅन्यूब आयोग, १८६५ मध्ये जन्माला आलेली आंतरराष्ट्रीय तार संस्था आणि १८७४ मध्ये अस्तित्वात आलेली जागतिक टपाल संस्था ही काही प्रातिनिधिक उदाहरणे सांगता येतील. या संस्थांना राजकीय महत्त्व नव्हते. मात्र भविष्यकाळात कशा संस्था निर्माण होणे इष्ट आहे, याचे प्रतीक म्हणून या संस्था महत्त्वाच्या ठरतात.

आंतरराष्ट्रीय संघटना राष्ट्रांमधील सामाजिक, आर्थिक, राजकीय व सुरक्षाविषयक सहकार्य सुकर करण्याचे कार्य पार पाडतात. युद्धे टाळून शांतता व सुव्यवस्था राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनांमध्ये खासगी व सार्वजनिक, जागतिक व प्रादेशिक, बहुउद्देशीय व विशेषीकृत अशा सविस्तर संरचना दिसून येतात. सामान्य अध्ययन पेपर- २ साठी संयुक्त राष्ट्रसंघ व त्याच्याशी संबंधित इतर संस्था यामध्ये युनिसेफ, युनेस्को, यूएनईपी, जागतिक आरोग्य संघटना या व या प्रकारची इतर अभिकरणे, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, आसियान, युरोपीयन संघ, ओईसीडी, ओपेक, अरब लीग इ. संघटनांचे अध्ययन महत्त्वपूर्ण ठरते.

या संस्थांचे अध्ययन करताना त्यांची संरचना, अधीदेश ((Mandate)) या बाबी लक्षात घेणे महत्त्वपूर्ण ठरेल. तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्यास चालू घडामोडींच्या अनुषंगाने करणे संयुक्तिक ठरेल. बऱ्याचदा परीक्षेमध्ये संघटनेशी संबंधित एखादी बाब चर्चेत असल्यास त्यावर प्रश्न विचारला जातो. २०२० या वर्षी मुख्य परीक्षेमध्ये जागतिक आरोग्य संघटनेवर एक प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाला करोना साथीची पार्श्वभूमी  होती. २०२० मध्ये करोना साथीमुळे जागतिक आरोग्य संघटना नेहमीच चर्चेमध्ये होती.

 

२०२० Critically examine the role of WHO in providing global health security during the Covid-19 pandemic.

जागतिक आरोग्य संघटनेची थोडक्यात माहिती पाहू या. ७ एप्रिल १९४८ रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. गेल्या ७० वर्षांच्या काळामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातील सुधारणांमध्ये हऌड संघटनेचा मोलाचा वाटा आहे. कोणत्याही नवीन आजाराची माहिती मिळवणे आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणे तसेच साथीचे रोग पसरत असतील तर त्याविषयी विविध देशांना सावध करणे, लस आणि उपचारांविषयी संशोधन, आरोग्यविषयक निधी जमा करणे आणि तो गरज असेल तिथे पोहोचवणे अशी विविध कार्येWHO  पार पाडत आहे. हऌड च्या प्रयत्नांमुळे देवी रोगाचे उच्चाटन, पोलिओसारख्या रोगांवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. इबोलावरील लस तयार करण्यामध्ये हऌड ने कळीची भूमिका पार पाडली. एड्स, मलेरिया अशा संसर्गजन्य रोगांबरोबरच कॅन्सर आणि हृदयविकार तसेच पोषक आहार, अन्नसुरक्षा, मानसिक आरोग्य, नशामुक्ती इत्यादी क्षेत्रातील हऌड चे काम उल्लेखनीय आहे. विविध देशांबरोबरच खासगी देणगीदारांनी दिलेल्या पैशातून या संघटनेचे काम चालते. जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे.WHO  ने करोना विषाणूमुळे होणाऱ्या  Covid-19 या रोगाला जागतिक आरोग्य संकट म्हणून जाहीर केल्यावरच जगभरातील देशांनी त्याकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली. मात्र करोना विषाणू साथीच्या प्रारंभीच्या काळात हऌड ने पुरेशी पावले उचललेली नाहीत, तिची भूमिका चीनधार्जिणी आहे, अशी टीका केली गेली. या आजाराची तीव्रता समजून घेण्यात चीनने उशीर केला आणि त्यावर WHO ने पांघरूण घातलं असा आरोपही केला जातो. तसेच तैवान या देशाने हऌड आपल्याशी दुजाभाव करत असल्याचे म्हटले होते. परिणामी,  WHO च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.

आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये जागतिक शांततेसाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रे या संघटनेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. संयुक्त राष्ट्र संघ ही विविध देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आंतरराष्ट्रीय संघटना आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने या संघटनेची  स्थापना करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्र संघामध्ये सहा प्रमुख घटक संस्था आहेत. यामध्ये आमसभा, सुरक्षा परिषद, आर्थिक व सामाजिक परिषद, विश्वस्त परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय, सचिवालय यांचा समावेश होतो. याशिवाय संयुक्त राष्ट्रांनी वेळोवेळी स्थापन केलेल्या दुय्यम स्वरूपाच्या विशेष कार्यात्मक संस्था आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचाच एक भाग आहेत. १९४५ साली स्थापन झालेल्या या संघटनेने आपल्या सनदेतील व्यापक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अनेक कार्ये केली. साहजिकच संयुक्त राष्ट्रांकडून जगाच्या अपेक्षा वाढल्या तसेच या संघटनेच्या मर्यादादेखील स्पष्ट झाल्या. या पार्श्वभूमी वर आपणास संयुक्त राष्ट्राच्या यशापयशाविषयी माहिती असणे आवश्यक ठरते. यूपीएससी  मुख्य परीक्षेत अनेकदा जागतिक व्यापार संघटनेवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जागतिक व्यापार संघटना ही आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे दूर करणे आणि मुक्त आणि उदार व्यापारासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करण्याचे कार्य करते. जागतिक व्यापार संघटनेच्या अंतर्गत एक साधारण परिषद कार्यरत असते. या परिषदेत प्रत्येक सदस्य देशाचा एक प्रतिनिधी असतो. साधारणत: दर महिन्यात परिषदेची एक बैठक भरते. जागतिक व्यापार संघटनेची मंत्रिस्तरीय परिषद ही अंतिम निर्णय घेणारी परिषद असते, ती दर दोन वर्षांनी भरते. सदस्य राष्ट्रांचा वाणिज्यमंत्री या परिषदेमध्ये सहभाग घेतो.

आंतरराष्ट्रीय संघटनांविषयीची माहिती संबंधित संघटनेच्या संके तस्थळावरून मिळते. याबरोबरच या संघटनांशी संबंधित समकालीन घडामोडींचा मागोवा घेत राहिल्याने या घटकाची तयारी परिपूर्ण होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Upsc exam study mpsc exam study competitive exam exam student akp