प्रशासन प्रवेश : यूपीएससी :प्राथमिक तयारी

यूपीएससी परीक्षेसाठी आवश्यक मूलभूत कौशल्यांचा विचार केल्यानंतर आता तयारी प्रक्रियेविषयी प्रारंभापासून चर्चा करणे उपयुक्त ठरेल.

यूपीएससी परीक्षेसाठी आवश्यक मूलभूत कौशल्यांचा विचार केल्यानंतर आता तयारी प्रक्रियेविषयी प्रारंभापासून चर्चा करणे उपयुक्त ठरेल. त्यादृष्टीने विचार करता या परीक्षेची प्रत्यक्ष तयारी करण्यापूर्वी काही प्राथमिक स्वरूपाची तयारी करणे अत्यावश्यक आहे. यास ‘प्राथमिक जुळवाजुळव’ असेही म्हणण्यास हरकत नाही आणि पुढील मुद्दय़ांच्या स्वरूपात ही जुळवाजुळव लक्षात घेता येते.
* यूपीएससी परीक्षेचे स्वरूप यूपीएससी परीक्षेचे स्पर्धात्मक स्वरूप सविस्तरपणे जाणून घ्यावे लागते. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अथवा व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन निराळ्या टप्प्यांचा समावेश असणारी ही परीक्षा आहे. यातील पूर्वपरीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची, बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित आणि नकारात्मक गुणपद्धत असलेली आहे. पूर्वपरीक्षेचा हा प्राथमिक टप्पा ‘पात्रता चाचणी’ (Qualifying Test) स्वरूपाचा आहे. याचा अर्थ या परीक्षेत प्राप्त होणारे गुण या टप्प्यापुरतेच गृहीत धरले जातात आणि पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा पुढील प्रवास नव्याने सुरू होतो. वस्तुनिष्ठ व नकारात्मक गुणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात नेमकेपणा व अचूकता आणण्याशिवाय पर्याय नाही. मूलभूत संकल्पनांचे आकलन, आवश्यक माहितीचे पुन्हा पुन्हा वाचन, अभ्यासाचे मजबुतीकरण, स्मरणशक्तीचा विकास, प्रश्नाखालील चुकीचे पर्याय बाजूला सारून योग्य पर्यायाकडे जाण्याचे कौशल्य आणि अचूकता या आधारेच पूर्वपरीक्षेत यश संपादन करता येईल. थोडक्यात, पूर्वपरीक्षेचे स्वरूप लक्षात न घेताच केलेला अभ्यास पुरेसा ठरणार नाही, हे लक्षात घेऊन अभ्यासाचे धोरण ठरवावे लागते.
मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाची असल्यामुळे त्यानुसार अभ्यासपद्धतीत पूरक बदल करणे अत्यावश्यक आहे. व्यक्तिमत्त्व चाचणीच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. उमेदवाराने आयोगाकडे पाठवलेली व्यक्तिगत माहिती, वैकल्पिक विषय, चालू घडामोडी आणि नागरी सेवेविषयी काही मूलभूत प्रश्न या अनुषंगाने मुलाखतीत प्रश्न विचारले जातात. मुलाखत ही संवादरूपी तोंडी परीक्षा असल्यामुळे सदस्यांनी विचारलेले प्रश्न व्यवस्थितपणे ऐकणे व समजून घेणे, त्याविषयी आपले मत योग्य पद्धतीने मुलाखत मंडळापर्यंत पोचवणे, आपल्या आवाजाची योग्य पातळी, औपचारिक भाषा, आत्मविश्वासपूर्वक देहबोली, संभाषणात आवश्यक इतर सर्व औपचारिकता या सर्व गोष्टींचे भान ठेवावे लागते. मुलाखतीच्या या स्वरूपानुसारच आपल्या तयारीस आकार द्यावा लागतो. थोडक्यात प्रत्येक टप्प्याचे भिन्नत्व लक्षात घेऊन त्या प्रकारची अभ्यासपद्धती अनुसरावी लागते.
* अभ्यासक्रमाचे सूक्ष्म आकलन
पूर्व परीक्षेत ‘सामान्य अध्ययन’ आणि ‘नागरीसेवा कलचाचणी’ हे दोन विषय तर मुख्य परीक्षेत निबंध, सामान्य अध्ययन (चार पेपर), वैकल्पिक विषय आणि अनिवार्य इंग्रजी तसेच भारतीय भाषा या विषयांचा समावेश आहे. केंद्र लोकसेवा आयोगाने या दोन्ही टप्प्यांतील उपरोक्त विषयांचा अभ्यासक्रम नमूद केलेला आहे.
या अभ्यासक्रमाचे अत्यंत सूक्ष्म वाचन व आकलन अत्यावश्यक ठरते. अभ्यासाच्या आकलनाद्वारे एखाद्या ‘विषयाची व्याप्ती’ किती आहे याचा प्राथमिक अंदाज घेता येतो.
‘अभ्यास व वेळेचे नियोजन’ करताना प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचे आकलन पायाभूत ठरते. मुलाखतीसाठी औपचारिकपणे अभ्यासक्रम निर्धारित केलेला नसला तर उपरोक्त परिच्छेदात अधोरेखित केलेल्या घटकांची तयारी महत्त्वाची ठरते.
* संदर्भपुस्तकांचे संकलन परीक्षेसाठी आवश्यक संदर्भपुस्तकांची यादी मिळवणे क्रमप्राप्त ठरते. परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्यावर विचारले जाणारे प्रश्न लक्षात घेऊनच संदर्भाची यादी निश्चित करावी. त्यादृष्टीने विचार केल्यास ‘एनसीईआरटी’ची इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यघटना, विज्ञान-तंत्रज्ञान, समाजरचना आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयांवरील क्रमिक पुस्तके हा प्राथमिक संदर्भ ठरतो. त्यानंतर प्रत्येक विषयासाठी किमान एक प्रमाणित संदर्भपुस्तक वाचणे महत्त्वाचे ठरते. काही वेळा दुसरा एखादा संदर्भग्रंथ वाचायचा असल्यास त्याचीही तयारी ठेवावी.
त्याचप्रमाणे मराठी वर्तमानपत्रासह इंग्रजीतील एक वर्तमानपत्र, काही नियतकालिके आणि ‘भारत वार्षकिी’ या संदर्भसाहित्याचा समावेश अत्यावश्यक असतो. अशा रीतीने ‘एनसीईआरटी’द्वारा विषयाचा संकल्पनात्मक पाया, प्रमाणित संदर्भ ग्रंथ याद्वारे संबंधित विषयाचे सखोल आकलन आणि वर्तमानपत्र, नियतकालिकांद्वारे विषयाचे समकालीन (चालू घडामोडी) आयाम पक्के करणे सुलभ जाईल.
संदर्भसाहित्याविषयी नेहमी एक काळजी घेणे अत्यावश्यक ठरते. ती म्हणजे भाराभर पुस्तके वाचण्यापेक्षा त्या त्या विषयांचे मूलभूत एखाद्-दुसरे संदर्भपुस्तक पुन्हा-पुन्हा वाचून तो पक्का करण्यावर भर द्यावा. त्यामुळे प्रारंभीच कोणती संदर्भपुस्तके वाचायची आहेत हे विचारपूर्वक ठरवणे महत्त्वाचे असते.
* नियोजन
प्राथमिक तयारीतील शेवटचा, परंतु तेवढाच महत्त्वाचा टप्पा म्हणजे अभ्यास व वेळेचे नियोजन होय. वस्तुत: यूपीएससी परीक्षेचे स्वरूप, विविध टप्पे, त्यातील विषय, त्यांचा अभ्यासक्रम, त्यावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे विश्लेषण आणि त्यासाठी वाचावी लागणारी संदर्भपुस्तके या घटकांचे आकलन ‘नियोजन’ ठरवण्यासाठी पायाभूत ठरते यात शंका नाही. अर्थात ‘अभ्यास व वेळेच्या’ नियोजनाची सविस्तर चर्चा पुढील लेखात करू या.

प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण  
परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात जे विषय समाविष्ट केले आहेत, त्यावरील गेल्या पाच-सहा वर्षांतील आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अत्यंत उपयुक्त ठरते. पूर्वपरीक्षेतील सामान्य अध्ययन आणि नागरीसेवा कलचाचणी या विषयांच्या किमान २०११ पासूनच्या प्रश्नपत्रिका पाहाव्यात. मुख्य परीक्षेच्या बाबतीत जरी २०१३ पासून नवी परीक्षा योजना स्वीकारली तरी सामान्य अध्ययन, वैकल्पिक विषय आणि निबंधाच्या जुन्या पद्धतीतील प्रश्नपत्रिका उपयुक्त ठरतील. प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे प्रत्येक वर्षांची संबंधित विषयावरील प्रश्नपत्रिका बारकाईने वाचणे; प्रत्येक प्रश्न कोणते प्रकरण व अभ्यासघटकावर आधारित आहे हे पाहणे; त्या प्रश्नाचे स्वरूप संकल्पनात्मक, माहितीप्रधान अथवा विश्लेषणात्मक आहे हे लक्षात घेणे; प्रश्नात चालू घडामोडीचे आयाम अथवा संबंधित घटकाच्या भवितव्याविषयी काही विचारले आहे का हे जाणून घेणे होय. प्रश्न वर्णनात्मक, चर्चात्मक, स्पष्टीकरणात्मक, चिकित्सक, मूल्यमापनात्मक की उपाययोजनात्मक आहे याचेही आकलन महत्त्वाचे ठरते. चार-पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका बारकाईने अभ्यासल्यास त्या विषयाच्या अभ्यासाची व्याप्ती ठरवणे जसे शक्य होईल, तसेच अभ्यासास ‘परीक्षाभिमुख’ बनवणे सुलभ जाईल. प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून जे जे बारकावे लक्षात येतील, त्याचा अंतर्भाव अभ्यासात प्रारंभापासूनच करता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Upsc prelims preparation

ताज्या बातम्या