श्रीकांत जाधव

प्रस्तुत लेखामध्ये यूपीएससी पूर्वपरीक्षेमधील  भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित आर्थिक आणि सामाजिक विकास या घटकाची चर्चा करणार आहोत. भारत सरकारने १९९१ मध्ये आर्थिक सुधारणा धोरणाअंतर्गत आर्थिक उदारीकरणाच्या नीतीचा अवलंब केला, ज्याद्वारे भारतीय अर्थव्यवस्था खुली करण्यात आली. आपली अर्थव्यवस्था विकसनशील असल्याने समाजातील सर्व स्तरातील घटकांना समन्यायी पद्धतीने लाभ घेता यावा यासाठी सर्वसमावेशक वाढ, शाश्वत विकासाला अनुसरण आर्थिक विकास साध्य करणे, सामाजिक क्षेत्र उपक्रम ज्याद्वारे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण करणे इत्यादी बाबींना अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे. याची प्रचीती आपणाला १९९१ नंतर सरकारद्वारे आखल्या गेलेल्या विविध योजना, धोरणे व उपक्रम यावरून दिसून येते. या पार्श्वभूमीच्या आधारे या घटकाच्या अभ्यासाचे नियोजन करणे गरजेचे आहे.

upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall
विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

२०११ पासून ते २०२१ पर्यंत या घटकावर एकूण १८१ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या वरून हा घटक पूर्व परीक्षेच्या दृष्टीने किती महत्त्वपूर्ण आहे, याची आपणाला कल्पना करता येते. या घटकाची तयारी करताना नमूद प्रत्येक घटकाचे परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे योग्य आकलन असणे गरजेचे आहे आणि यासाठी  गतवर्षीय परीक्षामध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचा अभ्यास आणि विश्लेषण करणे गरजेचे आहे. जागतिकीकरणाच्या सर्वव्यापी परिणामामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल घडून आलेले आहेत. शाश्वत विकास, गरिबी अथवा दारिद्र्य, समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी मुद्दे आर्थिक आणि सामाजिक विकास या घटकामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. या मुद्यांची उकल परीक्षेच्या दृष्टीने खालीलप्रमाणे करता येऊ शकते .

शाश्वत विकास – यामध्ये शाश्वत विकास ही संकल्पना काय आहे, तसेच याची वैशिष्टय़े  काय आहेत. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये याच्याशी संबंधित ध्येय धोरणे, सरकारमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर याच्याशी संबंधित  विविध घडामोडी आणि हाती घेण्यात आलेले उपक्रम याची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. तसेच या मुद्याशी संबंधित समकालीन घडामोडींची माहितीही अभ्यासावी लागते. 

गरिबी अथवा दारिद्र्य –  या मुद्याचा अभ्यास करताना सर्वप्रथम याची मुलभूत माहिती असणे गरजेची आहे. गरिबी ही संकल्पना काय आहे व याचे किती प्रकार आहेत, निरपेक्ष गरिबी व सापेक्ष गरिबी काय आहे. या प्रकारच्या गरिबीचे निकष कसे ठरविले जातात. गरिबी निर्मूलनासाठी सरकारमार्फत कोणत्या योजना राबविल्या जातात. सरकारमार्फत वेळोवेळी गरिबीचे निकष ठरविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्या, तसेच या समित्यांनी दिलेले अहवाल इत्यादीशी संबंधित वस्तुनिष्ठ माहिती तसेच विश्लेषणात्मक आकलन असणे गरजेचे आहे.

समावेशन – भारतामध्ये जी आर्थिक विकास प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये समाजातील वंचित घटकापर्यंत या प्रक्रियेचा जास्तीत जास्त लाभ कसा पोहचवता येईल. तसेच, या वंचित घटकाचे या प्रक्रियेमध्ये समावेशन करण्यासाठी सरकारमार्फत उपयोजित केलेली धोरणे, वितीय समावेशकता इत्यादीशी संबंधित माहिती संकलित करून हा मुद्दा तयार करावा लागणार आहे.

लोकसंख्याशास्त्र – यामध्ये लोकसंख्या आणि आर्थिक विकास यामध्ये नेमका काय संबंध आहे. आर्थिक विकासामुळे लोकसंख्या वाढीवर कोणते परिणाम झालेले आहेत, भारतातील जनगणना पद्धत, जन्म दर, बालमृत्य दर, आयुर्मान दर, जनसांख्यिकी लाभांश या सारख्या संकल्पनांची मूलभूत माहिती व याच्याशी संबंधित आकडेवारी याची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. तसेच, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, लोकसंख्या वाढीची कारणे, लोकसंख्या स्थिरीकरण इत्यादीची माहिती असावी लागते. थोडक्यात, या मुद्यांचा अभ्यास हा आर्थिक विकासाच्या कलाने करणे अपेक्षित आहे.

सामाजिक क्षेत्रातील उपक्रम – भारत हा कल्याणकारी राज्याचा पुरस्कर्ता आहे, म्हणून या मुद्यांचा अभ्यास करताना आपणाला भारतामध्ये जे सर्वसमावेशक वाढीचे धोरण आखण्यात आलेले आहे. त्यानुसार हा घटक अभ्यासणे महत्त्वाचे आहे. अर्थात समाजातील विविध घटकांसाठी सरकारमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठीच्या योजना, उपक्रम इत्यादीची माहिती अभ्यासणे क्रमप्राप्त आहे.

उपरोक्त सर्व मुद्यांतर्गत अनेक संकल्पनांचा अंतर्भाव आहे आणि या संकल्पनांचे आपणाला योग्य आकलन असणे गरजेचे आहे, ज्यामुळे या घटकाची परीक्षाभिमुख तयारी करणे सोपे जाते. याव्यतिरिक्त आपणाला सर्वसमावेशक वाढ, कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रे, औद्योगिक क्षेत्र, पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, भारतीय वित्तीय प्रणाली, भारताचा परकीय व्यापार इत्यादीविषयी माहिती अभ्यासणे गरजेचे आहे. हा घटक आर्थिक आणि सामाजिक विकास या घटकाअंतर्गत प्रत्यक्षरीत्या नमूद केलेला नसला तरीही गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून या विषयावर अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, हे आपल्या लक्षात येईल. या घटकावर चालू घडामोडीच्या अनुषंगाने सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. तसेच, उपरोक्त नमूद मुद्यांतील अनेक घटक हे आर्थिक विकास या सामान्य अध्ययन-मुख्य परीक्षा पेपर तीनमधील विषयाची तयारी करण्यासाठी अभ्यासावे लागतात. म्हणून या घटकाची सर्वंकषतयारी करणे अधिक उपयुक्त ठरते.