प्रवीण चौगले

प्रस्तुत लेखामध्ये आपण यूपीएससी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर-३ मधील अभ्यासक्रमामध्ये नमूद तंत्रज्ञान या घटकाची तयारी कशी करावी हे जाणून घेणार आहोत. हा घटक जरी तंत्रज्ञान या नावाने अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेला असला तरी यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून अभ्यास करावा लागतो. या घटकाअंतर्गत आपणाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास, त्याची उपयोगिता आणि त्याचे सर्वसामान्याच्या जीवनावर होणारे परिणाम, भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मिळविलेले यश, नवीन तंत्रज्ञानाचा विकास तसेच माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, संगणक, रोबोटिक्स, नॅनो तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा अधिकार व संबंधित मुद्दे इत्यादी क्षेत्रामध्ये घडणाऱ्या घडामोडींचा अभ्यासक्रमामध्ये समावेश होतो.

या घटकाची परीक्षाभिमुख तयारी कशी करावी याविषयी थोडक्यात चर्चा करू या. हा घटक अभ्यासताना आपल्याला दोन बाबींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पहिली बाब या घटकामध्ये संकल्पनांवर आधारित प्रश्न अधिक प्रमाणात विचारले जातात आणि दुसरी बाब या घटकांवर विचारण्यात येणारे जवळपास सर्व प्रश्न हे या घटकाशी संबंधित घडणाऱ्या चालू घडामोडींवर विचारले जातात. या घटकाची मूलभूत माहिती देणारी अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ स्पेक्ट्रम, टीएमएच या प्रकाशनांची विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकावर पुस्तके आहेत. या पुस्तकांचा वापर आपल्याला या घटकाचा मूलभूत अभ्यास करण्यासाठी करता येऊ शकतो, कारण ही पुस्तके आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेली असतात, त्यामुळे अभ्यासक्रमात समाविष्ट प्रत्येक मुद्दय़ाची सविस्तर माहिती मिळते. पुढे २०२१च्या मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊ.

 Q. The Nobel Prize in Physics of 2014  was jointly awarded to Akasaki, Amano and Nakamura for the invention of Blue LEDs in 1990 s.  How has this invention impacted the everyday life of human beings? (250 words)

वरील प्रश्नावरून स्पष्ट होते की, या घटकावर विचारण्यात आलेले प्रश्न चालू घडामोडींच्या अनुषंगाने आणि नवीन तंत्रज्ञान व तंत्रज्ञानामुळे सामान्य लोकांच्या जीवनावर होणारे परिणाम, तसेच तंत्रज्ञानाची उपयुक्तता इत्यादी बाबींना गृहीत धरून विचारण्यात आलेले आहेत. जपानी भौतिकशास्त्रज्ञ इसामू अकासाकी आणि हिरोशी अमानो आणि जपानी-अमेरिकन शास्त्रज्ञ शुजी नाकामुरा यांची निळा प्रकाश उत्सर्जक डायोडच्या (LED) शोधासाठी २०१४ च्या भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकासाठी संयुक्तपणे निवड करण्यात आली होती. हे डायोड ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणास अनुकूल प्रकाश स्रोत आहेत. हा शोध २० वर्षांपूर्वीचा आहे, परंतु सर्व मानवजातीच्या फायद्यासाठी या शास्त्रज्ञांनी एलईडीच्या निळय़ा प्रकाशाचा वापर करून पांढरा प्रकाश निर्माण करण्याचे तंत्र विकसित केले होते. अशा घटकांची तयारी वृत्तपत्रांच्या माध्यमातून सहजपणे करता येते. याकरिता समकालीन घडामोडींचा मागोवा घेणे व योग्य पद्धतीने स्वत:च्या नोट्स तयार करणे आवश्यक ठरते.

Q.  How is S-400  air defence system technically superior to any other system presently available in the world? (150  words)

 Q. What are the research and developmental achievements in applied biotechnology?  How will these achievements help to uplift the poorer sections of the society? (250  words) जैवतंत्रज्ञान हे उपयोजित तंत्रज्ञान आहे. शेती, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रांत प्रामुख्याने जैवतंत्रज्ञानाचा वापर होतो. शेती, पर्यावरण आणि या क्षेत्रात जैतंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्थिक विकासाला गती देऊन लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होऊ शकते आणि समाजाच्या उत्पन्नातील विषमता दूर करून बेरोजगारी आणि गरिबीपासून मुक्तता मिळवता येते. हे आतापर्यंत सिद्ध झाले आहे. उत्तराच्या प्रारंभी जैवतंत्रज्ञान या शाखेचे महत्त्व थोडक्यात विशद करावे. यानंतर उपयोजित जैव तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासात्मक कामगिरी उदाहरणांसह लिहावी. या कामगिरीचा समाजातील गरिबांच्या उन्नतीसाठी कसा फायदा होऊ शकतो, यावर चर्चा करून उत्तराची सांगता करावी.

या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे स्वरूप थोडय़ाफार फरकाने सारखेच आहे, कारण हा घटक अभ्यासाच्या दृष्टीने अधिक वस्तुनिष्ठ आहे. त्यामुळे संबंधित संकल्पना, त्यांची वैशिष्टय़े आणि उपयुक्तता इत्यादी बाबींची माहिती असणे अपरिहार्य ठरते, हे उपरोक्त प्रश्नावरून आपण समजून घेऊ शकतो.

भारतातील अवकाश तंत्रज्ञान विकास कार्यक्रम, क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम, जैवतंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान, संगणक, रोबोटिक्स, नॅनो तंत्रज्ञान यांची नेमकी सुरुवात कशी झालेली आहे, यासाठी नेमक्या कोणत्या संस्था कार्यरत आहेत, हे तंत्रज्ञान नेमके सामाजिक, आर्थिक आणि देशाची सामरिक सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी कसे उपयुक्त आहे याची माहिती असणे गरजेचे आहे. तसेच या घटकाशी संबंधित चालू घडामोडींचे आकलन करून उपरोक्त विषयाची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे, जी आपण एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांबरोबरच वर नमूद केलेल्या प्रकाशनाच्या पुस्तकामधून मिळते. विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक आपले ज्ञान अद्ययावत करण्यासाठी ‘इंडियन एक्स्प्रेस’सारखी इंग्रजी दैनिके, सायन्स रिपोर्टर, डाऊन टू अर्थ ही मासिके तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित संस्था, मंत्रालय याची संकेतस्थळे यांचा वापर करता येईल.