वित्त क्षेत्रातील विविध संधी

वित्त क्षेत्राची भूल अनेकांना पडते, मात्र या क्षेत्राबाबत नेमकी आणि अद्ययावत माहिती असतेच, असे नाही. या क्षेत्रात समाविष्ट झालेले विभाग, त्यांचे काम, जबाबदाऱ्यांचे स्वरूप, या क्षेत्रातील करिअर संधी आणि आवश्यक कौशल्ये याची सविस्तर माहिती-

वित्त क्षेत्राची भूल अनेकांना पडते, मात्र या क्षेत्राबाबत नेमकी आणि अद्ययावत माहिती असतेच, असे नाही. या क्षेत्रात समाविष्ट झालेले विभाग, त्यांचे काम, जबाबदाऱ्यांचे स्वरूप,  या क्षेत्रातील करिअर संधी आणि आवश्यक कौशल्ये याची सविस्तर माहिती-
पदवी पूर्ण केल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्यांला विचारा, आता पुढे काय? तर बहुतांश मंडळींना फायनान्स म्हणजेच वित्तीय क्षेत्रासंदर्भातील एखादा कोर्स करून त्यातच पुढे करिअर करावयाचे असते, तर अपेक्षित अशी नोकरी मिळाल्यानंतर पुढे प्रमोशन मिळावे म्हणून अनेक मंडळी वित्तीय क्षेत्रातील छोटेमोठे कोर्स करण्यास प्राधान्य देत असताना दिसतात. एकूणच, यावरून असे लक्षात येते की, अलीकडच्या काळात फायनान्स म्हणजेच वित्तीय क्षेत्र हे सोन्याची खाण ठरू पाहत आहे.
या वित्तीय क्षेत्राचे जितके फायदे आहेत, तितक्याच त्याविषयी आपल्या मनात नाना प्रकारच्या शंका-कुशंका निर्माण होत असतात. जसे, वित्तीय कंपन्यांची नेमकी भूमिका काय असते? या क्षेत्रातील विभाग हे विशिष्ट नावाने ओळखले जातात, तर या विभागांचे नेमके काय काम असते? या क्षेत्रात करिअर करण्यासाठी नेमकी कोणत्या कौशल्यांची गरज असते? या क्षेत्रात मिळणारा कामाचा मोबदला?   
एका नामवंत शैक्षणिक संस्थेद्वारे नुकतीच करिअरविषयक एक पाहणी करण्यात आली. यामध्ये असे दिसून आले की, ७५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी वित्तीय क्षेत्रामध्ये करिअर करण्याला पसंती दिली होती, कारण इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा या क्षेत्रात मिळणारा मोबदला हा घसघशीत होता, पण यावरून एक बाब लक्षात आली की, जे विद्यार्थी अथवा जी मंडळी वित्तीय क्षेत्रामध्ये स्पेशलायजेशन करण्यासाठी वळतात, त्यांना प्रामुख्याने या क्षेत्रात नेमके काय करावयाचे आहे याची नीट माहिती नसते.
तेव्हा जाणून घेऊया, या क्षेत्रात करिअरच्या दृष्टीने कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत-
१. प्रायव्हेट इक्विटी: मोठय़ा गुंतवणूकदारांकडून निधी उभारून, हा निधी थेट व्यवसायामध्ये गुंतवणे हेच प्रामुख्याने खासगी इक्विटी निधीचे तत्त्व असते. अनेकदा हा निधी परकीय गुंतवणुकीतून उभारला जातो आणि मग तो व्यवसायात गुंतविला जातो. जसजसा व्यवसाय भरभराटीच्या दृष्टीने वाटचाल करू लागतो, तसतसा या निधीचा फायदा दिसून येतो. बऱ्याचदा असे दिसून येते की, काही गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यानंतर किंवा पब्लिक शेअर्सचे समभाग विकल्यानंतर, खासगी इक्विटी निधीचा प्रत्यक्ष वापर होण्यास सुरुवात होते.
२. इनव्हेस्टमेंट बँकिंग / मर्चण्ट बँकिंग: या बँकिंग क्षेत्रात प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या व्यावसायिक गोष्टींचा समावेश केला जातो. त्यापकी एक म्हणजे सल्लागार (अ‍ॅडव्हायझरी) किंवा कॉर्पोरेट वित्तीय, ज्यात विलीनीकरण (मर्जर) आणि ताबा (अ‍ॅक्विझिशन) आदींचा विचार केलेला असतो. यात लक्ष्य गटाची निवड करणे, एखाद्या गोष्टीचे मूल्यांकन करणे, कायदेशीर बाबी, तडजोडी संदर्भात बोलणी करणे (निगोशिएशन) इ. बाबींचा समावेश असतो, तर दुसऱ्यामध्ये इक्विटी भांडवल बाजारपेठेचा विचार केलेला असतो. यामुळे गुंतवणूकदार किंवा ग्राहकांना कॉर्पोरेट क्षेत्रांमधून निधी उभारणे सहज शक्य होते.
३. निधी व्यवस्थापन (फंड मॅनेजमेण्ट): निधी व्यवस्थापक ही अतिशय महत्त्वाची अशी जबाबदारी असलेले पद आहे. म्युच्युअल फंड संदर्भात निर्णय घेणे हे त्यांचे काम असते. सूक्ष्म (मायक्रो )आणि लघु (मॅक्रो ) उद्योगाच्या पातळीवर होणाऱ्या घडामोडींचा बाजारपेठेवर आणि पर्यायाने गुंतवणुकीवर काय परिणाम होत असतो, यावर त्याचे जातीने लक्ष असते. या सर्व गोष्टींचा विचार करून तो स्वत:जवळ असलेला निधी नेहमी स्टॉक मार्केट, डीबेट मार्केट किंवा थेट कंपनीत गुंतवणूक करीत असतो.  
४. इक्विटी संशोधन आणि विक्री: ट्रेडिंगमधल्या स्टॉकचे नेमके मूल्यांकन करण्याचे काम इक्विटी संशोधनाचे असते. हे संशोधन मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण अशा दोन प्रकारांनी केले जाते. यापकी एकामध्ये ब्रोकेजमार्फत झालेल्या विक्रीचा आढावा घेतला जातो. त्यामुळे गुंतवणुकीसाठी ज्या योजना तयार केल्या जातात, त्या ग्राहकांपर्यंत सहजपणे पोहोचवता येतात, जेणेकरून प्रत्यक्ष ट्रेडिंग करताना गुंतवणूकदाराला काही प्रमाणात कमिशन कमाविता येते, तर दुसऱ्यामध्ये खरेदीविषयक (बाय साइड) बाबीसंदर्भात संशोधन केले जाते, ज्यात प्रामुख्याने म्युच्युअल फंडाचा विचार केलेला असतो. शिवाय यात वेगवेगळ्या ब्रोकेजेसकडून येणाऱ्या विश्लेषणांबरोबर निधी व्यवस्थापकाच्या स्वत:च्या अशा गुंतवणुकीसंदर्भातील विश्लेषणाच्या संशोधनाचा विचार केला जातो. या दोन्ही विश्लेषणांच्या संशोधनाचा विचार करून त्याचा गुंतवणूक योजनेवर नेमका काय परिणाम होतो, हेदेखील पाहिले जाते.
५. प्रकल्पासाठीचे अर्थनियोजन (प्रोजेक्ट फायनान्स) आणि डेट सिंडिकेशन:  दळणवळण किंवा इण्डस्ट्रियल क्षेत्रातील काही प्रकल्प असे असतात, जे दीर्घकाळ चालणारे असतात नि त्यासाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजन करावे लागते. तेव्हा अशा प्रकल्पांना परवानगी देण्यापूर्वी तो प्रकल्प नेमका काय आहे, त्यामध्ये नेमके काय धोके आहेत, जोखीम किती आहे, काय चांगल्या गोष्टी आहेत, छोटय़ामोठय़ा आर्थिक बाबी इ.चा प्रथम यात विचार करावा लागतो. या सर्व गोष्टी प्रकल्पामध्ये भागीदार कोण आहेत, या प्रकल्पाचे प्रायोजक कोण आहेत, या लक्षात घेऊन पूर्ण कराव्या लागतात. बहुतेक वेळेला अशा स्वरूपाच्या मोठय़ा प्रकल्पांसाठी कोणतीही एक बँक पूर्णपणे कर्ज उपलब्ध करून देऊ शकत नाही. अशा वेळी तीन-चार बँका एकत्र येऊन हा भार उचलतात. अशा वेळी मुख्य बँक ही महत्त्वाची म्हणजेच बँकिंगच्या भाषेत सिंडिकेट मानली जाते.
६. वित्तीय जोखीम व्यवस्थापन (फायनॅन्शियल रिस्क मॅनेजमेण्ट): बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे वित्तीय क्षेत्रात नेहमीच विविध स्वरूपाचे धोके निर्माण होण्याची शक्यता असते. यासाठीच वित्तीय जोखीम व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते. एखाद्या फर्मचे आíथक मूल्यांकन करण्याच्या दृष्टीने वित्तीय जोखीम व्यवस्थापनाचा उपयोग होतो. या व्यवस्थापनाचे तंत्र वापरून क्रेडिट आणि मार्केट जोखमीचा (रिस्क) विचार केला जातो. त्याचबरोबर, इतर जोखमींचादेखील विचार केला जातो. वित्तीय जोखीम व्यवस्थापनाचे मूलस्रोत कोणते आहेत, त्याचे मूल्यांकन, नियोजन आदी बाबी त्यात लक्षात घेतल्या जातात. या व्यवस्थापनामध्ये संख्यात्मकता आणि दर्जा या दोहोंचाही विचार केलेला असतो. एखाद्या आíथक नियोजनात केव्हा आणि कोणत्या गोष्टी अडचणीच्या ठरू शकतील, एखाद्या मोठय़ा स्वरूपातील रकमेचे कर्ज मंजूर करताना त्यात काय काय जोखीम असतील आणि त्या लक्षात घेऊन त्यावर कशा पद्धतीने मात करता येईल यांचादेखील विचार या व्यवस्थापनाच्या विशेष अभ्यासांतर्गत केला जातो. सर्वसाधारणपणे बहुतांश बँका या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असलेल्या ‘बेसल अ‍ॅकॉर्ड’ने प्रमाणित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बँकेचे ट्रॅकिंग, अहवाल, क्रेडिट आणि मार्केट रिस्क व इतर ऑपरेशनल बाबींची नोंद ठेवतात.  
७. कॉर्पोरेट बँकिंग: यामध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील दोन्ही प्रकारच्या बॅकिंगचा प्रामुख्याने विचार केला जातो. त्यानुसार कॉर्पोरेट क्षेत्रांना आवश्यक असणाऱ्या सर्व सेवासुविधा पुरविल्या जातात. या दोन्ही प्रकारांमध्ये बडे कॉर्पोरेटस्, मध्यम व लहान स्वरूपाचे उद्योग यांचा समावेश होतो. सर्वसाधारणपणे विविध कंपन्या या कॉर्पोरेट बँकेच्या ग्राहक असतात आणि त्यांना आवश्यक त्या सर्व सेवा पुरविण्यासाठी कॉर्पोरेट बँका बांधील असतात. तेव्हा जाणून घेऊया कॉर्पोरेट बँकेच्या विविध विभागांविषयी:
०    कंपनीला विस्तारीकरण आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलाची गरज लक्षात घेऊन त्यानुसार आवश्यक ते कर्ज उधार देणे. कंपनीच्या कार्यभाराचे आवश्यक ते मूल्यांकन करूनच कंपनीला आवश्यक असणाऱ्या कर्जाला परवानगी देणे.
०    कंपनीच्या वेगवेगळ्या स्वरूपांच्या जोखमीचे व्यवस्थापन करण्याचे काम खजिनदार (ट्रेजरी) विभाग करतो. यात परकीय चलन, व्याजदराचे चढउतार अशा विविध जोखमींचा समावेश होतो. याव्यतिरिक्त फॉरेक्स आणि बॉण्ड बाजारपेठेत कसा फायदा मिळविता येईल हे पाहण्याचे कामदेखील या विभागाद्वारे चालते.  
०    पसा व्यवस्थापन उपाय (कॅश मॅनेजमेण्ट सोल्युशन): अनेक मोठमोठय़ा कंपन्यांचे जाळे हे दूरवर पसरलेले असते. यामध्ये ग्राहक, डिस्ट्रिब्युटर्स किंवा शाखा अधिकारी अशा हर तऱ्हेच्या घटकांचा समावेश होत असतो. अशा परिस्थितीत पशांचे योग्य रीतीने व्यवस्थापन करणे हे एक मोठे आव्हानच असते. हे आव्हान पेलण्याचे काम पसा व्यवस्थापनाचे असते. यात कॉर्पोरेट ग्राहकांच्या सोयीसाठी वेगवेगळे पर्याय पुरविले जातात.  
८. संपत्ती व्यवस्थापन: कंपनीचे आर्थिक  नियोजन मजबूत व भक्कम करावयाचे असेल, तर संपत्ती व्यवस्थापन हा त्या दृष्टीने योग्य व उत्तम पर्याय आहे. केवळ कंपनीनेच नाही, तर छोटे व्यावसायिक, कुटुंब किंवा जो व्यक्तिगतदृष्टय़ा चांगलाच सधन आहे, अशी मंडळीदेखील या पर्यायाचा विचार आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने करू शकतात. रिटेल बँकिंग, इस्टेट नियोजक, कायदे सल्लागार, कर व्यावसायिक आणि गुंतवणूक सल्लागार आदी विविध पर्यायांचा अवलंब करून आपल्याकडील संपत्तीचे योग्य तऱ्हेने व्यवस्थापन करता येते.  
संपत्ती व्यवस्थापक हा स्वतंत्ररीत्या काम करणारा घटक असतो, किंबहुना तो प्रमाणपत्रित नियोजक असतो, असे म्हटल्यास ते जास्त सयुक्तिक ठरेल. जर तुम्ही तुमच्या संपत्तीच्या व्यवस्थापनासाठी संपत्ती व्यवस्थापकाचे साहाय्य घेत असाल तर तुम्हाला नेमक्या किती मूल्य असलेल्या संपत्तीचे व्यवस्थापन करावयाचे आहे, याविषयीची माहिती त्यास द्यावी. त्यामुळे तोदेखील तुमच्यासमोर नेमके पर्याय उभे करू शकतो. बँक, ब्रोकेजेस्, स्वतंत्र वित्तीय सल्लागार किंवा मल्टी लायसन्स पोर्टफोलिओ व्यवस्थापक आदी अनेक पर्यायांद्वारे संपत्तीचे व्यवस्थापन करता येते.          
९. रिटेल बँकिंग:  रिटेल बँकिंग जे ग्राहकोपयोगी बँकिंग म्हणूनदेखील ओळखले जाते. या बँकिंगद्वारे ग्राहकाचे व्यक्तिगत हित लक्षात घेऊन त्यानुसार आवश्यक त्या सेवा अथवा उत्पादने पुरविण्यात येतात. जसे क्रेडिट कार्ड, बचत खाते, वैयक्तिक अथवा वाहन कर्ज इ.
१०. कॉर्पोरेट फायनान्स: कॉर्पोरेट  फायनान्समध्ये करिअर करणे म्हणजे एखाद्या कंपनीच्या आर्थिक नाडय़ांचा सर्व बाजूने विचार करण्यासारखे आहे. यात कंपनींचा विस्तार करण्यासाठी, व्यवसायवाढीसाठी, भविष्यातील आर्थिक नियोजन योग्य स्थितीत राहावे किंवा कंपनीजवळ काही रकमेचे भांडवल खेळत्या स्वरूपात राहावे या सर्वाचा विचार करून आर्थिक व्यवस्थापन केले जाते.  
एखाद्या कंपनीची बाजारातील आर्थिक पत कशी वाढविता येईल हे लक्षात घेऊन आर्थिक नियोजन करणे हे वित्तीय सल्लागाराचे मुख्य काम असते. जेव्हा कॉर्पोरेट वित्तीय तज्ज्ञ म्हणून तुम्ही काम करता, तेव्हा तुम्हाला खालील काही गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा लागतो:
 इतर कोणत्याही क्षेत्रांपेक्षा वित्तीय क्षेत्रातील नोकरी किंवा व्यवसायात त्यामानाने स्थर्यता असते. या नोकरी किंवा व्यवसायात तुमच्या कामाचा दर्जा निश्चितपणे बघितला जातो, पण या आठवडय़ात तुम्ही किती विक्री केलीत किंवा तिमाहीमध्ये तुम्ही किती फायदा कमावून दिला यावर तो अवलंबून नसतो, तर भविष्यातदेखील कंपनीच्या आर्थिक यशाचा आलेख कसा उंचावलेला राहील, या दृष्टीने तुम्ही कसे काम करीत आहात, यावर तुमच्या कामाचा दर्जा ठरविला जातो. त्यामुळे एकदा का कॉर्पोरेट वित्तीय क्षेत्रात तुम्ही शिरकाव केलात, की तुमचे आयुष्य मार्गी लागले असे समजा, असा बहुतांश मंडळींचा समज असतो. हे काही अंशी खरे असले तरीही तुम्हाला मेहनत घेणे तितकेच जरुरीचे असते. या क्षेत्रात येण्याचे काही फायदे आहेत, ते म्हणजे:  

कॉपोरेट वित्तीय तज्ज्ञाच्या मुख्य जबाबदाऱ्या
१)     लाभदायक आर्थिक योजनांची आखणी करणे
२)     त्याचे नियोजन व अंमलबजावणी करणे
३)     नवे आर्थिक स्रोत निर्माण करणे
४)     बदलत्या आर्थिक स्थितींचा आढावा लक्षात घेऊन गुंतवणूकदारांचे हित कसे साधता येईल, याकडे लक्ष देणे.

वित्तीय क्षेत्रात येण्याचे लाभ
*    योजना राबविण्याच्या दृष्टीने संघासोबत कार्यरत असतात.
*    व्यवसायातील आर्थिक अडचणींचा प्रत्यक्ष सामना करणे हे नक्कीच आव्हानात्मक स्वरूपाचे काम आहे.
*    कामाच्या निमित्ताने विविध ठिकाणांच्या भेटी आणि वेगवेगळ्या लोकांना भेटण्याची संधी मिळते.
*    कामाचा मिळणारा मोबदलादेखील समाधानकारक असतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Various opportunity in finance sector

ताज्या बातम्या