|| महेंद्र दामले

आज आपण फाइन आर्ट शिक्षण, त्यामुळे येणारे अष्टपैलुत्व आणि त्यामुळे उलगडणाऱ्या करिअर संधींकडे पाहू. आपण लिआनार्दो दा विंचीला ओळखतो, ते त्याच्या अष्टपैलूत्त्वाकरता. त्याने चित्रकला, शिल्पकला, आर्किटेक्ट, इंजिनीअर अशा अनेक  प्रकारची कामे केली. निर्मिती केली. आज त्याच्या कारकीर्दीतील अनेक शाखा स्वतंत्र झाल्या आहेत. पण अशाच प्रकारचं अष्टपैलूत्त्व फाइन आर्ट्सच्या शिक्षणामुळे प्राप्त होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या काही विशेष क्षमता विकसित होतात.

अगदी नेहमीचा अनुभव मांडायचा झाल्यास एखादी गोष्ट आकर्षक पद्धतीने मांडायची असेल, रांगोळी काढायची असेल, नाव लिहायचे असेल, एखाद्या गोष्टीचे अलंकरण करायचे असेल तर सौंदर्यदृष्टी असलेल्या व्यक्तीला आवर्जून बोलावले जाते. अशीच सौंदर्य दृष्टी फाइन आर्ट्सच्या अभ्यासक्रमात प्राप्त होते. या शिक्षणात सृजनशीलता विकसित होते. कलात्मक कृती करणे त्यातून कलावस्तू किंवा कलाकृती तयार करणे. त्याविषयी अनेक प्रकारची चित्रे, शिल्पे, आदी बनवणे. त्या करता लागणारी कौशल्ये विकसित होतातच. पण त्यासोबतच व्यवहाराविषयी एक भान आणि ज्ञान मिळते. हे भान सृजनशीलतेला चालना देते आणि सौंदर्य दृष्टी निर्माण करते. त्यातूनच अष्टपैलूत्व निर्माण होते.

फाइन आर्टिस्ट हा कलाकृती घडवत असताना दृश्य पातळीवर एक अनुभव निर्माण करत असतो. तो या करता चित्रामध्ये रंग, रेषा, आकारांच्या साहाय्याने अनुभव निर्माण करत असतो. हा अनुभव निर्माण करताना कलाकाराला एक भान असते. ते कलाकृतीतून निर्माण होणाऱ्या दृश्य परिणामांविषयी असते. हा परिणाम कशामुळे तयार होतो, कसा बदलतो, त्यामागची कारणे काय, त्यामुळे काय भाव तयार होतो, निर्मितीमधील तरल फरक काय, ते कसे ओळखायचे हे ज्ञान फाइन आर्टचे शिक्षण देते. कलाकृतीचा अनुभव, दृश्य परिणाम, आदी गोष्टी शेवटी भावनिर्मितीसाठी निर्माण केल्या जातात. प्राचीन भारतीय शास्त्रातील चित्रसूत्रामध्ये दृश्यकलेबद्दल चर्चा केली आहे. तिथे त्याला भाव योजन, लावण्ययोजन असे नाव दिलेले आहे.

कलाकाराकडे असलेली सौंदर्यदृष्टी प्रत्येकक्षणी जागी असते. जरी तो कलाकार एखादी कलाकृती निर्माण करत नसेल तरीही ही सौंदर्यदृष्टी जागीच असते. त्यामुळेच कलाकार हा उत्तम स्टायलिस्ट होऊ शकतो.

स्टायलिंगला आता अनेक क्षेत्रात संधी निर्माण झाल्या आहेत. फॅशन, फूड, फोटोग्राफी अशा अनेक क्षेत्रात स्टायलिस्टची गरज भासताना दिसते. फाइन आर्टिस्टला जर या क्षेत्रात काम करायचे असेल तर त्यासंबंधी अभ्यासक्रम करणे जास्त संयुक्तिक ठरेल. पण ते करताना फाईन आर्ट्सच्या शिक्षणाने प्राप्त झालेले सौंदर्य भान महत्त्वाचे असेल.

स्टायलिस्ट काय करतात? तर ते फॅशन, थीम, मॉडेल्स, कपडे, ब्रँड्स, फोटोग्राफर सगळ्याचा विचार करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातील भावनिश्चिती करतात. तीच गोष्ट फूड अर्थात खाद्यापदार्थाबद्दल होते. पदार्थाचे फोटोशूट करताना तो कसा दिसावा, त्यासाठी प्रकाशयोजना, पदार्थाचे जो गुणविशेष प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे, त्याप्रमाणे रचना आणि भाव कसा मोजता येईल या सगळ्याचा विचार स्टायलिस्ट करतो. फॅशन शूट, फूड शूट किंवा फोटो शूट यासंबंधीची दृश्यनिर्मिती आणि रचना, त्यातील भावनिर्मिती या गोष्टी समानदृष्टीने हाताळता येतात. त्या त्या क्षेत्रातील बारकावे कळतात. त्यात पारंगत होणे शक्य होते.

या सदरातून मी म्हटले होते की, कलाशिक्षणातून तुम्हाला फाइन आर्टिस्ट तसेच यूजर एक्सपिरियन्स डिझायनर होणे शक्य आहे. कारण फाइन आर्टिस्टमध्ये भावयोजनेची समज, सौंदर्यदृष्टीतील व्यापकता, भान यामुळे अष्टपैलूत्त्व विकसित होते.