विवेक वेलणकर
स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेतील सर्व स्तरांवर कायदेशीर सुरक्षिततेला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. विधिज्ञ अर्थात वकील सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. देशात आजघडीला विविध न्यायालयांमध्ये कोट्यवधी खटले दाखल आहेत आणि दररोज हजारो खटले नव्याने दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर वकिलांची गरज सातत्याने वाढत आहे. विधी शिक्षण पदवीधरांना म्हणजेच वकिलांना वित्तसंस्था, संरक्षणदले, सरकारी व निमसरकारी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, अशासकीय संस्था, विधी महाविद्यालयात अध्यापन, वकिली व्यवसाय, पत्रकारिता, लिगल प्रोसेस आऊटसोर्सिंग अशा अनेक क्षेत्रांत संधी आहे. कायदा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडे काही गुण असणे आवश्यक आहे जसे उत्कृष्ट मसुदा लेखन, सादरीकरण व संवाद कौशल्य, चातुर्य, आत्मविश्वास व उत्तम आकलन क्षमता.

लॉ क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर तीन वर्षांचा किंवा बारावीनंतर पाच वर्षांचा कोर्स करून वकील बनता येते.

लॉ शिक्षणासाठी देशात सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या २४ नॅशनल लॉ स्कूल्स मधील बारावीनंतर पाच वर्षांच्या पदवी कोर्सच्या प्रवेशासाठी

१ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय स्तरावर सीईटी परीक्षा होईल. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असून एकशे वीस मार्कांच्या या परीक्षेत विद्यार्थ्यांना दोन तासात एकशे वीस प्रश्न सोडवावे लागतात. यामध्ये लॉजिकल रीझनिंगवर २० टक्के प्रश्न, लीगल रीझनिंगवर २५ टक्के प्रश्न, सामान्यज्ञानावर २५ टक्के प्रश्न व इंग्रजीवर २० टक्के प्रश्न व गणितावर १० टक्के प्रश्न असतील. परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरुपाची असते आणि चुकीच्या उत्तरासाठी पाव गुण वजा होईल . परीक्षा इंग्रजी भाषेतच देता येते. यंदा बारावीत असलेले विद्यार्थीसुद्धा ही परीक्षा देऊ शकतील. या परीक्षेसाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने www. consortiumofnlus. ac. in या संकेतस्थळावर दाखल करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२४आहे.

लॉ पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या नॅशनल लॉ स्कूल्स मध्ये एक वर्षाच्या एल एल एम पदवीसाठी प्रवेश मिळू शकतो त्यासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक सुद्धा हेच आहे. या २४ नॅशनल लॉ स्कूल्स पैकी तीन महाराष्ट्रात असून ती मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी आहेत.