उत्तरोत्तर स्पर्धा परीक्षेची काठिण्य पातळी वाढतच चालली आहे. स्पर्धा परीक्षेला बसणारे, त्यातून अधिकारी होणारे उमेदवार यांचे प्रमाण इतके व्यस्त आहे की, स्पर्धा परीक्षा हा अत्यंत अविश्वासार्ह असा करिअर ऑप्शन झाला आहे, हे सहज लक्षात येईल. ‘एमपीएससी’ वा इतर राज्यांच्या नागरी सेवा परीक्षांच्या तुलनेत ‘यूपीएससी’ची परीक्षा तशी विश्वासार्ह मानली जाते. मात्र, आता ‘पूजा खेडकर’सारख्या प्रकरणांमुळे ‘यूपीएससी’च्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी एक करिअर ऑप्शन म्हणून स्पर्धा परीक्षांकडे पहावे का, आपल्या आयुष्यातील किती वर्षे या क्षेत्रामध्ये गुंतवावीत आणि इतर करिअर ऑप्शन्सचा विचार का करू नये, याबाबतची मांडणी महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंद राज यांनी केली आहे. –

हेही वाचा : विश्लेषण: महाराष्ट्र ठरू लागलाय नेमबाजांची खाण? स्वप्निल कुसळे, अंजली भागवत, राही, तेजस्विनी यांच्या यशाचे रहस्य काय?

स्पर्धा परीक्षांमधील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) या संदर्भात घातलेल्या अटी शिथिल कराव्यात, तसेच उमेदवारांना स्पर्धा परीक्षेला बसू देण्याच्या मुदतीमध्ये वाढ करावी, अशा मागण्यांचा रेटा आता विद्यार्थ्यांकडून वाढला आहे. सध्या सामान्य प्रवर्गातील विद्यार्थी वयाच्या ३२ वर्षापर्यंत सहावेळा परीक्षा देऊ शकतो; तर अनुसूचित जाती आणि जमाती (SC/ST) प्रवर्गामध्ये मोडणारा विद्यार्थी वयाच्या ३७ वर्षांपर्यंत कितीही वेळा ही परीक्षा देऊ शकतो. इतर मागासवर्गीयांमध्ये (OBC) मोडणारे विद्यार्थी वयाच्या ३५ वर्षांपर्यंत नऊवेळा परीक्षेला बसू शकतात. येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिघडत जाणार आहे, असे सध्याचे वास्तव आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाख होती; आता हीच संख्या १३.४ लाखांवर गेली आहे. इतकेच काय, २००६ मध्ये ही संख्या १.९५ लाख इतकी जेमतेम होती. मात्र, गेल्या दहा वर्षांमध्ये या संख्येमध्ये अभूतपूर्व अशी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढत असली तरीही भरतीची पदसंख्या वर्षानुवर्षे जमतेम एक हजार इतकीच राहिलेली आहे. यामुळे सध्या यूपीएससी परीक्षेतील यशाच्या शक्यतेचा दर ०.०७५ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. थोडक्यात, ही परीक्षा देण्याचा निर्णय घेणे म्हणजे जुगार खेळण्यासारखेच आहे. अगदी जुगारामध्येही जिंकण्याच्या शक्यतेचा दर याहून अधिक असू शकतो. मात्र, स्पर्धा परीक्षेमधील यशाचा दर दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. यातून सर्वांत मोठे नुकसान काय होते? तर स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेणाऱ्या तरुण विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाची आणि उमेदीची वर्षे वाया जातात.

साधारण २१ ते ३२ वयोगटातील तरुण नागरी सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून आपल्या उमेदीची बरीच वर्षे त्यामध्ये खर्ची घालतात. या स्पर्धा परीक्षेतील यशाचा दर अत्यंत कमी असल्यामुळे आणि दरवर्षी साधारण हजारभर पदेच भरली जात असल्यामुळे पाठीमागे लाखो अयशस्वी विद्यार्थी निराश आणि हताश अवस्थेत ढकलेले जातात. लहान वयातच अयशस्वी, निराश, हताश झालेल्या आणि आतून खचून गेलेल्या तरुणांची संख्या आता मोठी आहे. वयाच्या ३२ व्या वर्षीच नाउमेद आणि आतून खच्ची झालेले लाखो तरुण आपण तयार करत आहोत, हे भीषण वास्तव आहे. भारतातील जवळपास प्रत्येक शहर आणि गावांमध्ये मोठमोठे कोचिंग सेंटर्स उभे राहिले आहेत; जे दरवर्षी आयएएस बनवण्याचे स्वप्न विकताना दिसतात. विशेष म्हणजे या उमेदवारांच्या क्षमतांचे मूल्यमापन न करताच प्रत्येकाला हमखास यशासाठीचा मार्ग दाखवला जाईल, असा दावा केला जातो. या कोचिंग सेंटर्समध्ये विद्यार्थ्यांची संख्या जितकी जास्त, तितकीच फीदेखील भरमसाठ असते.

दिल्लीतील राजेंद्र नगर, करोल बाग इत्यादी भाग हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांचे दुसरे जगच आहे. इथे कोचिंग सेंटर्स, निवास, भोजन आणि इतर सेवा पुरवणाऱ्या उद्योगांची मोठी उलाढाल होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांच्या जोरावर अशा सेवा पुरवणाऱ्या उद्योजकांनी आपल्या उद्योगांचे इमल्यावर इमले रचले आहेत. दुसऱ्या बाजूला मध्यमवर्गातून आलेले विद्यार्थी अत्यंत काटकसरीने राजेंद्र नगरसारख्या भागात कष्टामध्ये दिवस काढताना दिसतात. माणसांना राहण्यासाठी अयोग्य असणाऱ्या धोकादायक इमारतींमधील अत्यंत दाटीवाटीच्या तरीही महागड्या खोल्यांमध्ये दाटीवाटीने राहणे ही जणू स्पर्धा परीक्षा देण्यामधीलच एक महत्त्वाची पायरी बनली आहे. खाण्यापिण्याचे वांदे, कोचिंग सेंटर्स आणि निवासासाठी भरमसाठ पैसे यामधील कसरत करत विद्यार्थी परीक्षेची तयारी करताना दिसतात. कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये अनधिकृतपणे उभ्या केलेल्या लायब्ररीमध्ये पाणी शिरल्यामुळे तीन उमेदवारांचा मृत्यू झाल्याची घटना ही याच अवस्थेचे विदारक चित्रण करणारी आहे. त्याआधीही एका उमेदवाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. खरे तर हे सेंटर्स कठोर नियमांच्या अखत्यारीत आणायला हवेत आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईही व्हायला हवी. मात्र, या परीक्षेचे स्पर्धात्मक स्वरुप आणि प्रतिष्ठा तसेच हे कोचिंग सेंटर्स नियामक चौकटीमध्ये बसून कोणतीही पदवी देत ​​नसल्यामुळे सरकारला त्यामध्ये हस्तक्षेप करणे कठीण होते. मात्र, नुकसान होते ते विद्यार्थ्यांचेच! ज्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेची काठिण्य पातळी भेदण्याची क्षमता नसते, असे विद्यार्थी आपल्या आयुष्यातील किमान सहा वा त्याहून अधिक वर्षे वाया घालवतात. एखाद्या मृगजळाच्या मागे धावून निराश झालेले असे लाखो विद्यार्थी आपल्या आयुष्यातील उमेदीची वर्षे गमावून बसलेली असतात.

हेही वाचा : अनुसूचित जाती-जमातींसाठीही क्रिमीलेअर; क्रिमीलेअर म्हणजे नक्की काय आणि त्याचे निकष काय आहेत?

नुकतीच पदवीची परीक्षा देऊन स्पर्धा परीक्षेकडे वळलेल्या वा यामध्ये एक-दोन वर्षे दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मला काही सल्ले द्यायचे आहेत.

१. सगळं काही बाजूला ठेवून यूपीएससीच्या तयारीमध्ये स्वत:ला झोकून देऊ नका. आधी एखादी नोकरी मिळवा, तिथे काम करा किंवा पदवीसाठीचे शिक्षण घेतच त्याबरोबर यूपीएससीची तयारी सुरू ठेवा. यामुळे काय होईल? तर जरी तुम्ही यूपीएससीमध्ये यशस्वी ठरलात, तरीही तुमच्याकडे आधीपासूनच एखादी नोकरी असेल वा अशी एखादी पदवी असेल जी तुम्हाला नोकऱ्यांच्या बाजारामध्ये टिकवून ठेवेल.

२. संपूर्णत: कोचिंग सेंटर्सच्या विश्वासावर राहू नका, त्यासाठी वारेमाप पैसे खर्च करू नका; कारण ते एका मर्यादेपर्यंतच तुमची मदत करू शकतात, हे लक्षात घ्या.

३. तुम्ही स्वत:ला झोकून देऊन प्रयत्न केल्यानंतर पहिल्या दोन परीक्षांमध्ये जर तुम्ही पूर्वपरीक्षा पास होऊ शकला नाही, तर तुम्ही येणाऱ्या परीक्षांमध्येही ती पास करण्याची शक्यता फारच कमी आहे, हे वास्तव लक्षात घ्या. त्यामुळे स्वत:च्या भल्याचा विचार करून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातून बाहेर पडा. तुम्हाला परीक्षा देण्याची परवानगी आहे वा उपलब्धता आहे म्हणून आकाश-पाताळ एक करून त्यामागे लागून स्वत:ला थकवू नका.

४. असे कराल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील उमेदीची आणि महत्त्वाची वर्षे वाया घालवून बसाल. आपण यासाठी बनलेलो नाही, हे वास्तव स्वीकारा आणि इतर गोष्टींमध्ये प्रयत्न सुरू करा. कदाचित इतर एखाद्या क्षेत्रात तुम्हाला चांगले यश मिळू शकत असतानाही निव्वळ स्पर्धा परीक्षेच्या अट्टहासापायी तुम्ही ते गमावूनही बसाल, त्यामुळे असे करू नका.

५. गेली ३० वर्षे आयएएस म्हणून काम करण्याचा अनुभव गाठीशी आहे, म्हणून मी सांगू इच्छितो की, ही सुद्धा इतर नोकऱ्यांप्रमाणे एक नोकरीच आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकऱ्यादेखील अनेक अर्थांनी खूपच चांगल्या आहेत. थोडक्यात, माझे मत विचाराल तर यूपीएससीचा नाद सोडून दिल्याने तुम्ही फार काही गमावून बसाल असे नाही. या यूपीएससीच्या ध्येयापलीकडेही फार मोठे आयुष्य तुमची वाट पाहत आहे.

६. या स्पर्धा परीक्षेच्या प्रक्रियेतून एक हताश आणि निराश झालेला तरुण म्हणून बाहेर पडण्याऐवजी दोन-तीनवेळा परीक्षा दिल्यानंतर व्यावहारिक शहाणपणाचा निर्णय घेऊन बाहेर पडा आणि तुमच्या आवडीच्या दुसऱ्या एखाद्या क्षेत्रातील संधींचा शोध घ्या आणि त्याचं सोनं करा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.