आशुतोष शिर्के, रश्मी पटवर्धन
ॲनिमेशन म्हणजे जगाकडे नव्या नजरेने पाहायला शिकणे. ॲनिमेशन ही कला आहे, ती मानवी निरीक्षणातून जन्माला येते. एखाद्या चेहर्‍यावरचा क्षणिक भाव, संध्याकाळच्या प्रकाशाचा रंग किंवा शांततेतही घडणारी कथा – हे सगळं पाहण्याची आणि समजण्याची क्षमता सॉफ्टवेअर देऊ शकत नाही.

गेल्या दोन दशकांत ॲनिमेशन ही केवळ मनोरंजनाची शाखा राहिलेली नाही. ॲनिमेशन हे जगाच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि तांत्रिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी जाऊन बसले आहे. चित्रपट, वेबसीरिज, गेमिंग, इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, वैद्यकीय सिम्युलेशन, व्हच्र्युअल रिॲलिटी या सर्व क्षेत्रामध्ये ॲनिमेशनचा वापर वाढतो आहे. त्यामुळे जगभरातील विद्यापीठे  ॲनिमेशन क्षेत्राकडे गंभीरपणे पहात आहेत. ॲनिमेशन शिक्षणाचा अर्थ आपण बर्‍याच वेळेला केवळ ‘सॉफ्टवेअर किंवा तंत्र शिकणे’ असा घेतो. परंतु खरे तर ॲनिमेशन म्हणजे जगाकडे नव्या नजरेने पाहायला शिकणे.

बहुतेक भारतीय विद्यार्थ्यांच्या मनात ॲनिमेशन शिक्षण म्हटलं की अमेरिका किंवा युरोप हेच पर्याय येतात. कॅलिफोर्निया इ्स्टिटट्यूट ऑफ आर्ट्स, न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी, शेरिडन कॉलेज (कॅनडा), गोबलिन्स (फ्रान्स) आणि रॉयल कॉलेज ऑफ आर्ट (यूके) या संस्था जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहेत यात शंकाच नाही. या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲनिमेशन उद्योग जगतात  काम करणारे नामांकित कलाकार आणि दिग्दर्शक शिकवतात. ते विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक कौशल्य देत नाहीत, तर ‘दृश्य विचार’ करण्याची क्षमता विकसित करतात – कथा, प्रकाश, रंग आणि भावना यांचा परस्परसंबंध समजावतात.

पण ॲनिमेशनचं विश्व केवळ पाश्चिमात्य देशांपुरतं मर्यादित नाही. ॲनिमेशन क्षेत्रामध्ये जपान अग्रेसर मानला जातो. टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्स आणि क्योटो सेइका युनिव्हर्सिटीसारख्या संस्थांनी ‘ॲनिमे’ या विशिष्ट शैलीला जागतिक प्रतिष्ठा मिळवून दिली. जपानी शिक्षणपद्धतीत निरीक्षण, संयम आणि सूक्ष्म भावनांचं चित्रण यावर भर दिला जातो. चीनमध्येही बीजिंग फिल्म अकॅडमी आणि चायना ॲकॅडमी ऑफ आर्टसारख्या संस्थांनी ॲनिमेशनमध्ये मोठी प्रगती केली आहे. तिथे पारंपरिक चीनी कलेचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडवण्यावर भर दिला जातो. दक्षिण कोरिया आणि सिंगापूर हे देशही या क्षेत्रात झपाट्याने पुढे येत आहेत.

आज एआयमुळे या क्षेत्रात मोठा बदल होत आहे. काही वर्षांपूर्वी ज्यासाठी तासन्तास मेहनत लागायची, ती कामं आता काही मिनिटांत होतात. त्यामुळे अनेकांना वाटतं की ॲनिमेशनमध्ये माणसाची गरज कमी होईल. काही प्रमाणात हे खरे आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जगभर ॲनिमेशन क्षेत्रात काम करणार्‍या अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. परंतु ॲनिमेशन तयार करण्याच्या प्रक्रियेतील माणसाचे स्थान गेले आहे असे यामुळे आपण म्हणू शकतो का? एआय दृश्य तयार करू शकतो, पण तो अनुभव तयार करू शकत नाही. भावना, सूक्ष्मता आणि कथेला दिशा देण्याची क्षमता ही माणसाकडेच असते. एआय हे एक साधन आहे; कलाकार हा त्याचा सर्जक आहे. म्हणूनच जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये आजही सॉफ्टवेअरला जितकं महत्त्व दिलं जातं तितकंच महत्त्व ड्रॉइंग, स्केचिंग, फोटोग्राफी, सिनेमाचा अभ्यास, मानसशास्त्र आणि कथाकथन यांना दिलं जातं. 

ॲनिमेशनमध्ये करिअर करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी स्वत:ला केवळ ‘तंत्रज्ञ’ म्हणून नव्हे, तर ‘कलाकार’ म्हणून घडवणं आवश्यक आहे. सॉफ्टवेअर बदलतील, एआय विकसित होईल, पण मानवी कल्पनाशक्ती आणि संवेदनशीलता हीच या क्षेत्राची खरी ताकद राहील. ॲनिमेशनचं शिक्षण म्हणजे एका साधनाचं प्रशिक्षण नव्हे; ते म्हणजे स्वत:ची वेगळी दृष्टी शोधण्याचा आणि जगाला नव्या पद्धतीने व्यक्त करण्याचा प्रवास आहे.

गायत्रीचा प्रकाश, सावल्या आणि स्वप्नांचा प्रवास

गायत्री अंकम आज कॅनडात आहे. ॲनिमेशनच्या जगात तिने स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. पण हे स्थान तिला सहज मिळालेलं नाही. एआयच्या वेगवान लाटेमुळे तिच्या क्षेत्रात निर्माण झालेली अस्थिरता, बदलणार्‍या कौशल्यांची मागणी आणि परदेशात स्वत:ला सतत सिद्ध करण्याची गरज – या सगळ्यांशी सामना करत ती अजूनही तिच्या सर्जनशीलतेला धरून उभी आहे. तिच्यासाठी ही केवळ नोकरी नाही, तर तिच्या वेडासाठी तिने मोजलेली किंमत आहे.

 ही कथा सुरू  होते मुंबईतल्या सर जे. जे. इ्स्टिटट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्सच्या वर्गात. रंग, प्रकाश आणि सावल्यांच्या सूक्ष्म नात्याने तिला तेव्हाच भुरळ घातली होती. पडद्यावर दिसणार्‍या जगामागचं गूढ तिला खुणावत होतं. त्या खुणेचा पाठलाग करत ती न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीपर्यंत पोहोचली आणि तिथे तिच्यासाठी एक नवं विश्व उघडलं.

इथे तिला शिकवणारे शिक्षक केवळ प्राध्यापक नव्हते; तेच ते लोक होते ज्यांनी तिच्या लहानपणी तिला भुरळ घालणार्‍या चित्रपटांच्या जगाची निर्मिती केली होती. ज्यांची नावे तिने पडद्यावर वाचली होती, तेच आता तिचे मार्गदर्शक होते. त्यांनी तिला केवळ सॉफ्टवेअर शिकवलं नाही, तर ‘प्रकाश हा कथा सांगतो’ हे शिकवलं. तांत्रिक कौशल्य आणि कलात्मक दृष्टी यांचा संगम म्हणजेच खर्‍या अर्थाने ॲनिमेशन, हे तिला तिथे उमगलं.

अमेरिकेत शिकताना आणि नंतर टीचिंग असिस्टंट म्हणून काम करताना तिची ओळख केवळ विद्यार्थिनी म्हणून राहिली नाही; ती त्या विद्यापीठाच्या सर्जनशील परंपरेचा एक भाग बनली. पुढे कॅनडात बार्डेल एंटरटेनमेंटमध्ये तिचं काम होतं नेटफ्लिक्स, डिस्ने आणि अमेझॉन प्राइममधील विविध ॲनिमेटेड दृश्यांना प्रकाश आणि कॉम्पोझिटिंगच्या माध्यमातून जिवंत करणं. 

आज ती पुन्हा नव्या तंत्रज्ञानाकडे वळते आहे. परदेशी विद्यापीठातील शिक्षण आणि अनुभवातून ती एक महत्त्वाची गोष्ट शिकली – ॲनिमेशन ही केवळ करिअरची वाट नाही, तर सतत स्वत:ला नव्याने घडवत राहण्याची एक जिवंत प्रक्रिया आहे. 

mentorashutosh@gmail.com (लेखक करिअर समुपदेशक आहेत.)