सलील चिंचोरे
मानसशास्त्रात एक महत्त्वाचा नियम आहे. तुम्ही स्वत:ला जसा प्रश्न विचाराल तसा दृष्टिकोन बदलतो. सध्या प्रत्येक कर्मचार्यारच्या मनात ‘एआय म्हणजे माझ्या नोकरीच्या जीवावर उठलेले तंत्रज्ञान’ असा विचार घर करून बसला आहे.
प्राणिसंग्रहालयात वाघ-सिंह बघताना एक विचार मनात रुंजी घालत असतो, ‘‘हा जाळीतून बाहेर आला तर?’’ आज कॉर्पोरेट क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. त्याबद्दल चर्चा करताना प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न येतो ‘‘एआय माझी नोकरी घेईल काय?’’
औद्योगिक क्रांतीच्या इतिहासात मानवाने असे कित्येक बदल पाहिले आणि पचवले. ९०च्या दशकात संगणकीकरणाची सुरुवात झाली तेव्हा संगणकामुळे कर्मचार्यांकच्या नोकर्याि मोठ्या प्रमाणावर जातील अशी आवई उठली होती. कित्येक सरकारी बँकात आणि कार्यालयांत या भीतीपोटी कर्मचार्यां नी संगणकाला हात लावायला नकार दिला होता. यथावकाश संगणकाने मानवाच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश केला व मानवी जीवन सुलभ केले. कर्मचारी संगणकाचा वापर करून स्वत:ची उत्पादकता वाढवायला शिकले. एकेकाळी टायपिंग येणे ही प्रत्येक पदवीधरासाठी नोकरीची पूर्वअट होती. नंतर त्याची जागा संगणक साक्षरतेने घेतली. आता एआय घेऊ पाहत आहे.
मानसशास्त्रात एक महत्त्वाचा नियम आहे. तुम्ही स्वत:ला जसा प्रश्न विचाराल तसा दृष्टिकोन बदलतो. सध्या प्रत्येक कर्मचार्यारच्या मनात ‘एआय म्हणजे माझ्या नोकरीच्या
जिवावर उठलेले तंत्रज्ञान’ असा विचार घर करून बसला आहे. यालाच थोडे बदलून आपण ‘एआय माझी नोकरी घेणार नाही. एआयचा योग्य वापर करणारा कर्मचारी मात्र नक्कीच घेईल’ असा विचार केला पाहिजे. एआयकडे स्पर्धक म्हणून पाहण्याऐवजी त्याकडे अत्यंत कार्यक्षम आणि उत्साही ‘डिजिटल असिस्टंट’ म्हणून पहा.
कंटाळवाणी आणि वारंवार करावी लागणारी कष्टाची कामे करण्यात एआय अत्यंत निष्णात आहे. एआयमुळे कामाचा झपाटा व त्यातील अचूकता कमालीचे वाढू शकते. एखाद्या अवघड ग्राहकाला किचकट ईमेल लिहायचा असो, विक्रेत्यांसाठी सणासुदीच्या शुभेच्छा तयार करायच्या असो किंवा ४० पानांच्या अहवालाचा सारांश लिहायचा असो. अगदी सुरुवातीपासून सुरुवात करण्यासाठी वेळ आणि मानसिक ऊर्जा लागते. एआय हे बदलून टाकते. साध्या इंग्रजीमध्ये एक सोपे वाक्य टाइप करून तुम्ही पाच सेकंदांपेक्षा कमी वेळात ७०% पूर्ण झालेला मसुदा मिळवू शकता. ‘अथपासून इतीपर्यंत’ काम करण्यापेक्षा एआयला आज्ञा देऊन त्याच्याकडून जवळपास तयार मसुदा बनवून आपल्या अनुभवाने अखेरचा एक्सपर्ट हात फिरवणे हे कामाचे नवीन स्वरूप.
एआय स्वीकारण्याचा सर्वात मोठा फायदा केवळ कॉर्पोरेट उत्पादकता नाही तर तो म्हणजे तुमचे वैयक्तिक कार्य-जीवन संतुलन. भारतीय कॉर्पोरेट जीवन हे जास्त तास काम करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. या दमछाक करणार्याी धावपळीच्या संस्कृतीविरुद्ध लढण्यासाठी एआय हे तुमचे साधन आहे. तुमच्या दैनंदिन सॉफ्टवेअरमध्ये समाविष्ट असलेल्या एआय साधनांचा वापर करून (वर्डमधील मायक्रोसॉफ्ट कोपायलट किंवा जीमेलमधील गूगल जेमिनी) तुम्ही दैनंदिन
कामे स्वयंचलित करू शकता. दररोज दोन तास वाचवल्याने ऑफिसमध्ये रात्री उशिरापर्यंत काम करण्याचे प्रमाण कमी होते, सुट्टी घेतल्याबद्दल अपराधीपणाची भावना कमी होते आणि कुटुंबासाठी अधिक वेळ मिळतो.
एआय वापरण्यासाठी तुम्हाला कोडिंगमधील पदवीची गरज नाही. एखाद्या सहाय्यकाशी जसे बोलता तसेच एआय टूल्सशी संवाद साधा. तुम्हाला नेमके काय हवे आहे, तुमचा प्रेक्षकवर्ग कोण आहे
आणि तुम्हाला अपेक्षित असलेली भाषाशैली (टोन) कशी असावी याबद्दल स्पष्ट माहिती द्या. एआय प्रॉम्प्ट्सचे प्रशिक्षण घ्या. कंटाळवाणी गुंतागुंतीची
कामे अल्गोरिदम्सना करू द्या. तुम्ही मानवांना सर्वोत्तम जमणार्याय गोष्टींवर लक्ष केंद्रित करा- जसे नातेसंबंध दृढ करणे, एआयच्या कामातील त्रुटी दूर करणे, कोरड्या विश्लेषणाला भावनांचा पदर जोडणे.
mentorashutosh@gmail.com
(लेखक मनुष्यबळ क्षेत्रातील तज्ज्ञ असून या क्षेत्रात २५ वर्षे कार्यरत आहेत.)
