स्मिता किंकळे
आजच्या काळात कला शिक्षकांसाठी शैक्षणिक पात्रतेचे निकष बदलले आहेत. महाविद्यालयीन अध्यापनासाठी नेट – सेट परीक्षा आवश्यक ठरली असून संशोधन क्षेत्रासाठी पीएचडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. कला विषयातील संशोधनामुळे कला शिक्षण, इतिहास, सौंदर्यशास्त्र आणि समकालीन कलाविचार अधिक व्यापक झाला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर कला शिक्षणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.
भारतीय कला शिक्षणाची परंपरा हजारो वर्षांची आहे. ही परंपरा केवळ चित्रे, शिल्पे किंवा हस्तकला निर्माण करणारी नाही, तर समाजाला दिशा देणारे कलाकार घडविणाऱ्या शिक्षकांची परंपरा आहे. प्राचीन काळातील गुरू–शिष्य पद्धतीत कला शिक्षक हा केवळ तंत्र शिकवणारा नव्हता, तर शिस्त, मूल्ये, संवेदनशीलता आणि सौंदर्यदृष्टी रुजवणारा मार्गदर्शक होता. प्रत्यक्ष अनुभवातून, सातत्यपूर्ण साधनेतून कला शिकवली जात असे आणि त्यातून भारतीय संस्कृतीचा वारसा जतन झाला आहे .
ब्रिटिश काळात कला शिक्षणाला औपचारिक शैक्षणिक स्वरूप प्राप्त झाले. अभ्यासक्रम, वर्गपद्धती, परीक्षा आणि प्रमाणपत्र यामुळे कला शिक्षण संस्थात्मक झाले. याच काळात कला शिक्षकांची भूमिका अधिक व्यावसायिक झाली. परंपरागत कौशल्यांसोबत रेखाटनशास्त्र, प्रमाणबद्धता आणि पाश्चात्त्य कला संकल्पना अध्यापनात समाविष्ट झाल्या. आधुनिक कला शिक्षणाची पायाभरणी याच टप्प्यावर झाली.
स्वातंत्र्यानंतर कला शिक्षणाला नियोजनबद्ध दिशा मिळाली. महाराष्ट्रात कला शिक्षणाचा विकास करण्यासाठी कला संचालनालयाची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या पुढाकारातून महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अस्तित्वात आले. एकसंध अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि शिक्षक प्रशिक्षणाची रचना उभी राहिली. राज्यातील कला शिक्षणाची शिस्तबद्ध वाटचाल याच टप्प्यावर सुरू झाली.
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत राबविले जाणारे आर्ट टीचर डिप्लोमा (ATD) आणि डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन (Dip.A.Ed.) अभ्यासक्रम शालेय व उच्च माध्यमिक स्तरावर प्रशिक्षित कला शिक्षक घडविण्याचे प्रमुख माध्यम ठरले. पुढे जी.डी. आर्ट, बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स (BFA) आणि मास्टर ऑफ फाइन आर्ट्स (MFA) या अभ्यासक्रमांमुळे कला शिक्षणाला शास्त्रीय आणि संशोधनात्मक अधिष्ठान मिळाले. MFA मुळे महाविद्यालयीन अध्यापन, संशोधन आणि व्यावसायिक कला क्षेत्रात नवी दारे उघडली.
या संपूर्ण परंपरेचे केंद्र म्हणून मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे स्थान महत्त्वाचे आहे. सुमारे ११६ वर्षांपासून येथे कला शिक्षक प्रशिक्षण आणि उच्च कला शिक्षणाचे अभ्यासक्रम सातत्याने सुरू आहेत. येथून घडलेल्या शिक्षकांनी महाराष्ट्रासह देशातील कला शिक्षणाला दिशा दिली आहे.
आजच्या काळात कला शिक्षकांसाठी शैक्षणिक पात्रतेचे निकष बदलले आहेत. महाविद्यालयीन अध्यापनासाठी नेट-सेट परीक्षा आवश्यक ठरली असून संशोधन क्षेत्रासाठी पीएचडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. कला विषयातील संशोधनामुळे कला शिक्षण, इतिहास, सौंदर्यशास्त्र आणि समकालीन कलाविचार अधिक व्यापक झाला आहे. त्यामुळे कला शिक्षकाची भूमिका केवळ वर्गात मर्यादित न राहता संशोधन आणि विचारक्षेत्रात विस्तारत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर कला शिक्षणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. NCERT आणि SCERT च्या अभ्यासक्रमांतून कला विषयाला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी जोडले गेले आहे. अभ्यासक्रम अधिक लवचीक, कौशल्याधारित आणि अनुभवप्रधान होत आहेत.
आज कला शिक्षकांसाठी रोजगाराच्या संधी केवळ शाळा किंवा कला महाविद्यालयांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. शासकीय व खासगी शाळा, ज्युनिअर कॉलेज, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अध्यापनाच्या संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर NCERT, SCERT, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, विद्यापीठे आणि स्वायत्त संस्थांमध्ये अभ्यासक्रम विकास, मूल्यमापन, प्रशिक्षण आणि शैक्षणिक सल्लागार म्हणूनही कला शिक्षक कार्यरत आहेत. संग्रहालये, कला दालन, सांस्कृतिक संस्था आणि शासकीय कला प्रकल्पांमध्येही प्रशिक्षित कला शिक्षकांची गरज वाढत आहे.
कला शिक्षण क्षेत्रात उद्योजकतेच्या संधीही वाढत आहेत. स्वतःचे आर्ट क्लासेस, ड्रॉइंग इन्स्टिट्यूट, कार्यशाळा, बालकांसाठी सर्जनशील शिक्षण केंद्रे, ऑनलाइन अध्यापन, डिजिटल कोर्सेस आणि शैक्षणिक कंटेंट निर्मिती यांद्वारे कला शिक्षक स्वतंत्र व्यावसायिक म्हणून कार्य करू शकतात. कौशल्याधारित शिक्षणावर वाढलेल्या भरामुळे कला शिक्षणाशी निगडित उपक्रमांना पुढील काळात अधिक वाव मिळणार आहे. कला शिक्षणाच्या संधी आज शहरी भागापुरत्या मर्यादित नाहीत. ग्रामीण, आदिवासी भागातील कला संवर्धन प्रकल्प, एनजीओ, संग्रहालये, सांस्कृतिक केंद्रे तसेच देश-विदेशातील रेसिडेन्सी, फेलोशिप्स आणि संशोधन प्रकल्पांमुळे कला शिक्षकांसाठी नवी क्षेत्रे खुली होत आहेत.
गुरू–शिष्य परंपरेतून सुरू झालेली भारतीय कला शिक्षकांची वाटचाल आज ATD–Dip.A.Ed. पासून MFA, NET–SET आणि Ph.D. पर्यंत विस्तारली आहे. परंपरा जपत बदल स्वीकारणे आणि पुढील पिढी घडवणे, हीच आजच्या काळातील कला शिक्षकांची खरी जबाबदारी आहे.
(लेखक चित्रकार तसेच सर ज जी कलामहाविद्यालयात अधिव्याख्याता आहेत. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या सचिव आहेत.)
kinkalesmita@gmail.com

