इंग्रजी भाषा पेपरमधील आकलन विषयक प्रश्नांच्या तयारीबाबत मागील लेखामध्ये पाहिले. या लेखामध्ये अभिव्यतीविषयक प्रश्नांच्या तयारीबाबत पाहू.

कोणत्याही भाषेतील अभिव्यक्तीसाठी व्याकरण आणि शब्दसंग्रह या दोन बाबींवर प्रभुत्व महत्त्वाचे ठरते. त्यानुसार इंग्रजी भाषा पेपरमध्ये समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचारांचा व शब्दांचा वाक्यात उपयोग हे प्रश्न शब्दसंग्रह तपासण्यासाठी आणि वाक्य रुपांतरण, गाळलेल्या जागा भरणे इत्यादी प्रश्न व्याकरणावर आधारित आहेत. श्ब्दसंग्रह आणि व्याकरणाचे नियम यांच्या आधारे अभिव्यक्तीची क्षमता तपासली जाते निबंध लेखनामध्ये. या प्रश्नांची तयारी कशी करावी ते पाहू.

व्याकरण

इंग्रजीमधील काळ व प्रयोगांच्या वाक्यरचनेचा टेबल, तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय पुरुषांसाठीचा तक्ता आणि महत्त्वाच्या क्रियापदांची past participle, past perfect participle यांचा तक्ता पाठच असायला हवा. वाक्यरचनेचे नियम पक्के माहीत असतील तर वाक्य रुपांतरणाचे प्रश्न नक्कीच सोडवता येतात.

मात्र नियम आणि त्याच्या चौकटी फक्त माहीत असून उपयोगाचे नाही. त्याचा वेगवेगळ्या उदाहरणाशी संबंध ओळखता येणे महत्त्वाचे आहे. व या नियमांचा वेगवेगळ्या उदाहरणामध्ये शब्दरचना / वाक्यरचना करताना कशा प्रकारे वापर करण्यात येतो हे समजून घेणे आवश्यक आहे. नियम व्यवस्थित समजून घेणे आणि त्याचा वेगवेगळ्या उदाहरणामध्ये वापर करण्याचा सराव करणे हा या भागाच्या तयारीसाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे.

अवांतर वाचनाची सवय असेल तर भाषेतील म्हणी, वाक्प्रचार वारंवार नजरेखालून जातात आणि त्यांचा समर्पक अर्थही लक्षात येतो व राहतो. कॉमन सेन्समुळे म्हणी आणि वाक्प्रचारांचा इतर प्रसंगाशी संबंध जोडता येणे शक्य होते. तयारीच्या काळात अवांतर वाचनासाठी वेळ काढणे काही वेळेस शक्य होत नाही. अशा वेळी म्हणी, वाक्प्रचार यांचे संकलन असलेले छोटेसे पुस्तक किंवा प्रिंटआऊट सोबत बाळगावे. अधून मधून त्यातील म्हणी, वाक्प्रचार वाचून त्याचा अर्थ समजून घ्यावा. अर्थाची उकल झाली की त्यांचा उदाहरणामध्ये वापर करणे किंवा केलेला वापर योग्य आहे की नाही हे कळणे सोपे होते.

समानार्थी / विरुद्धार्थी शब्दाबाबतचे तसेच दिलेल्या शब्दाचा वाक्यात उप्योग करण्यासाठीचे प्रश्न सोडविण्यासाठी शब्दाचा अर्थ नेमकेपणाने माहीत असायला हवा. इंग्रजीमधील एकसारख्या उच्चाराचे / स्पेलिंगचे पण वेगळे अर्थ असणाऱ्या शद्बांमध्ये गोधळ उडू शकतो. त्यामुळे प्रश्नातील शब्द काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

व्याकरणाचे नियम पक्के केले तरी भाषा विषयाच्या तयारीमध्ये त्या त्या भाषेतील वेगेवेगळ्या विषयावरचे लेखन वाचनात येणे आणि त्याचे आकलन होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने आकलनासह वाचन आणि नियमांचा सराव आवश्यक आहे.

निबंध लेखन

दिलेल्या चार पैकी एका विषयावर ६०० शब्दांचा किंवा प्रत्येकी ५० गुणांसाठी ३०० शब्दांचे दोन निबंध अशा वेगवेगळ्या पद्धतीने निबंध लिहायला सांगण्यात येऊ शकते. १०० गुणांसाठी ६०० शब्द हे प्रमाण मात्र निश्चित आहे. शब्दमर्यादेपेक्षा खूप कमी वा जास्त शब्द वापरल्यास निबंधाचे गुण कमी केले जाऊ शकतात.

निबंधासाठी जे विषय देण्यात आले आहेत त्या विषयांवर ३०० किंवा ६०० शब्दांचा आखीव राखीव, मुद्देसूद निबंध लिहिण्याची क्षमता तुमच्या मध्ये असायला हवी. यासाठी दिले जाणारे विषयसुद्धा पारंपरिकपणे भाषा पेपरचे निबंधाचे विषय असतात तसे सहजसोपे असतील अशी शक्यता कमी आहे.

चालू घडामोडींवर आधारित, कल्पनात्मक, चिंतनपर, वैचारिक अशा प्रकृतीचे विषय आयोग निबंधासाठी देऊ शकतो. याचा अर्थ एखादा मुद्दा/समस्या /संकल्पना / Statement मधील निहीतार्थ लक्षात घेऊन त्याबाबत तुम्हाला बहुस्पर्शी विचार करता व मांडता येतो का हे आयोगाला निबंधातून तपासायचे आहे.

विषयाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक व इतर काही संबंधित पैलू विचारात घ्यावेत व त्यांचे व्यक्ती, कुटुंब, समाज, राज्य, राष्ट्र असे स्तर पाहावेत. सरळ वा मुद्द्यांचा तक्ता करून त्यात सुचणारे मुद्दे भरावेत. यानंतर योग्य व समर्पक मुद्दे (साधारणपणे १० ते १२) निवडून त्यांचा क्रम ठरवून घ्यावा.

परिणामकारक सुरुवात करण्यासाठी सुविचार, कविता इ. चा वापर करता येईल. सुरुवातीनंतर ठरलेल्या क्रमाने थोडक्यात मुद्दे मांडावेत व एका Conclusion ने शेवट करावा. लेखनामध्ये ‘ओघ’ असायला हवा, हे लक्षात ठेवा.

निबंध लेखनास Direct सुरुवात करू नये. कच्च्या पानावर आधी १० मिनिटे सुचतील ते मुद्दे मांडत राहावे. त्यानंतर पुढची ५ मिनिटे त्याचा क्रम, सुरुवात व शेवट ठरवण्यासाठी वापरावीत व पुढच्या १५-२० मिनिटांत प्रत्यक्ष लेखन करावे.

शब्दमयदिचे पालन व्हायलाच हवे. दिलेल्या शब्दमर्यादेपेक्षा १० कमी-जास्त शब्द लिहीले तर चालतील पण त्यापेक्षा जास्त स्वातंत्र्य घेता येणार नाही. नाही तर त्याचा गुणांवर परिणाम होऊ शकतो.

steelframe.india@gmail.com