ॲड प्रवीण निकम

मित्रांनो, आपली ही लेखमाला सुरू होऊन आता कित्येक महिने उलटले आहेत. दर १५ दिवसांनी जेव्हा हा लेख तुमच्यासाठी लिहायचा असा विचार करतो त्यावेळी डोक्यात एक गोष्ट पक्की असते की, लिहिला जाणारा प्रत्येक लेख हा माझ्या मित्र-मैत्रिणींच्या आयुष्यात एक नवी प्रकाशवाट दाखवणारा असायला हवा. तुमच्यासारखाच शैक्षणिक वाटचालीत अनेक अडचणींना सामोरे जात, उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न बाळगणारा मीही होतो. फी भरण्यासाठी पैसे नाही उभे राहू शकले तर आपलं शिक्षण मनासारखं होणार नाही अशा अनेक चिंता अनुभवत, त्या पार करत मी इथवर पोहोचलो आहे. त्यामुळे जेव्हा लेखमालेची सुरुवात केली तेव्हा ठरवलं होत की, तुम्हाला शैक्षणिक वाटचाल सुखकर करणाऱ्या अनेक गोष्टी सांगायच्या. मदतीचे अखंड हात आपल्यासाठी उभे आहेत ही जाणीव तुम्हाला करून द्यायची आणि म्हणूनच मी लेखात तुम्हाला विविध सरकारी, खासगी शिष्यवृत्तींबद्दल सांगत आहे आणि सांगत राहीन.

आजच्या लेखात मी तुम्हाला ज्या खासगी शिष्यवृत्तीबाबत सांगणार आहे ती शिष्यवृत्ती तुम्हाला आर्थिक सहाय्य तर करतेच, पण त्याच बरोबर एक परिपूर्ण, सुजाण नागरिक बनविण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील असणारी अशी ही शिष्यवृत्ती आहे. कारण ही शिष्यवृत्ती सुरूच झाली ती मुळात ग्रामीण तसेच शहरी भागातील वंचित व दुर्बल घटकांतील गुणवान आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी. ‘विद्यादान सहायक मंडळ’ अर्थात (VSM) म्हणून प्रचलित असणारी ही संस्था २००८ मध्ये ठाणे इथे सुरू झाली. या संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा फायदा दरवर्षी जवळ जवळ ७०० हून अधिक विद्यार्थ्यांना होत आहे. २३ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या ज्ञानकेंद्री उपक्रमातून गेल्या १६ वर्षांत ‘विद्यादान सहायक मंडळ’ १६ करिअर टीम्सच्या भक्कम पाठिंब्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांचा पाठलाग करत आहेत. हे विद्यार्थी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांतून येतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी, त्यांची-त्यांची असणारी आव्हाने आणि करिअरचे विविध प्रवाह यांचा विचार शिष्यवृत्ती देताना केला जातो.

हेही वाचा >>> नोकरीची संधी : ‘आयआरडीएआय’मधील संधी

VSM मध्ये सामाजिक कार्य, विज्ञान, पॅरा मेडिकल, वैद्याकीय, कायदा, आयटीआय (ITI), हॉटेल मॅनेजमेंट, अभियांत्रिकी, परिचर्या, वाणिज्य, कला, आर्किटेक्ट/ इंटिरियर डिझाइन, उपयोजित/ ललित कला, बी.एस्सी. आणि संगणक अशा विविध शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना सहाय्य केले जाते. आता अर्थात तुम्हाला प्रश्न पडला असेल की, इतक्या विविध अभ्यासक्रमांसाठी मदत करणारे ‘विद्यादान सहायक मंडळ’ नक्की कोणाला, कशाप्रकारे आणि किती शिष्यवृत्ती देते, तर त्यासाठीही काही नियम आहेत. जसे –

विद्यार्थी गरजू असला पाहिजे, म्हणजेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळू शकते. (शहरी किंवा ग्रामीण असा भेद इथे केला जात नाही )

शिष्यवृत्ती ही अभ्यासक्रमानुसार वेगवेगळी असते, विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमाची निवड केली त्यानुसार त्याला ती शिष्यवृत्ती दिली जाते. (उदा. कला शाखेची फी वेगळी आहे, तर इंजिनीअरिंगची फी वेगळी असते.)

शिष्यवृत्तीची रक्कम ही त्या-त्या संबंधित कॉलेजमध्ये कॉलेजच्या नियमावलीनुसार टप्प्याटप्याने किंवा एकत्रित भरली जाते. शिष्यवृत्ती कोणत्याही विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जात नाही.

‘विद्यादान सहायक मंडळ’ या संस्थेची शिष्यवृत्ती ग्रामीण तसेच शहरी भागातील त्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आहे जे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न बघतात. शिवाय या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत ही संस्था एक भावनिक बंध जोडून काम करत असल्यामुळे संस्थेची ही शिष्यवृत्ती तुम्हाला आर्थिक आणि भावनिक अशा सर्वच पातळीवर घडवायला सहाय्य करणारी आहे. परिपूर्ण माणूस घडावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि त्यासोबतच तुमच्या आर्थिक बाजूला संभाळून घेणाऱ्या ‘विद्यादान सहायक मंडळ’ अर्थात (VSM) या संस्थेबद्दल आणि त्यांच्या या शिष्यवृत्तीबद्दल तुम्हाला http://www.vsmthane.org या संकेतस्थळावरून अधिक सविस्तर माहिती मिळू शकते.

शिष्यवृत्तीसाठी निवडीचे निकष

विद्यादान सहायक मंडळाच्या शिष्यवृत्तीची निवड प्रक्रिया तीन टप्प्यावर घडते.

टप्पा क्र. १.: यामध्ये विविध सामाजिक संस्था, व्यक्ती, सोशल मीडिया, सामाजिक कार्यकर्ते, अशा विविध स्तरातून जेव्हा विद्यादान सहायक मंडळाकडे विद्यार्थी शैक्षणिक मदतीसाठी जोडले जातात तेव्हा त्यांची एक प्रारंभिक मुलाखत होते, ज्यात सर्वसाधारपणे तो विद्यार्थी, त्याचे कुटुंब, आर्थिक परिस्थिती यासर्वाबद्दल माहिती घेतली जाते.

टप्पा क्र. २.: विद्यार्थ्याला कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यानुसार त्यांची एक निवड परीक्षा घेतली जाते. उदा. अभियोग्यता चाचणी (aptitude test ).

टप्पा क्र. ३ : मुख्य मुलाखत

अशा तीन टप्प्यामधून प्रत्येक विद्यार्थ्याला जावे लागते. या तीनही टप्प्यांवर पडताळणी झाल्यावर मग विद्यार्थ्याला त्यांच्या अभ्यासक्रमासाठी लागणारे अर्थ सहाय्य केले जाते.

pravinnikamindia@gmail.com