– सलील चिंचोरे
भारतात नोकरीला खूप सिरीयसली घेतात. जीवनातील सगळी ध्येय म्हणजे- घर, गाडी, दौलत, पत नोकरीभोवती फिरत असतात. भारतातील नोकरदार वर्ग मोठा महत्त्वकांक्षी आहे. करिअरची शिडी सरसर चढून उत्कर्ष कसा साधायचा यावर बहुतेक कर्मचाऱ्यांचा फोकस असतो. या संदर्भात एक महत्त्वाचा व हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे “मी नोकरी बदलू का?” या प्रश्नाला अनेक कंगोरे आणि दृष्टिकोन आहेत. वरवर साधा वाटणारा हा प्रश्न आपल्याला बराच विचार करायला लावतो.
काही दशकांपूर्वी भारतात कॉर्पोरेट क्षेत्रात फारशा नोकऱ्या नसत. म्हणून मिळेल ती नोकरी टिकवून शक्यतो तेथूनच निवृत्त व्हायचे अशी कर्मचाऱ्यांची धारणा होती. गेल्या दशकाभरात हे चित्र पालटले आहे. जागतिकीकरण, भारताचे अर्थकारण, सरकारची धोरणे यामुळे नवनवीन व्यवसाय क्षेत्र उदयास येत आहेत, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रतिभावान व्यक्तींसाठी नोकरीच्या अनेक संधी चालून येतात. कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ कमी असल्याने काहीजण नोकरीच्या तीन-चार जॉब ऑफर्स बाळगून असतात. त्याला ‘जॉब शॉपिंग’ असे आता नवीन नाव पडले आहे! या वातावरणात नोकरी बदलण्याचा विचार केव्हा व कसा करायचा हा कळीचा मुद्दा आहे.
पहिल्यांदा एक लक्षात घेतले पाहिजे की नोकरी बदलण्यामागे केवळ पगारवाढ हा निकष पुरेसा नाही. कंपनी उमेदवार निवडताना त्याचा अनुभव, क्षमता कंपनीच्या बिजनेस प्लॅन्सनुसार आहे की नाही हे तपासात असते. म्हणजे करिअरमध्ये पुढे जायचे असेल तर योग्य व पुरेसा अनुभव गाठीशी बांधणे महत्त्वाचे असते. ‘योग्य अनुभव’ म्हणजे जॉबमध्ये व्यतीत केलेले महिने अथवा वर्ष नाही. त्या जॉबमध्ये कोणते महत्त्वाचे प्रोजेक्ट्स केले, बदलांना तोंड कसे दिले, कंपनीच्या वाढीसाठी व नफ्यासाठी काय योगदान दिले, टीम कशी सांभाळली या विविध घटकांचा समावेश होतो. नुसती डिग्री अथवा कोर्सेसचे सर्टिफिकेट्स न बघता कंपन्या उमेदवाराची आव्हाने झेलण्याची क्षमता, लवचिकता, खडतर परिस्थितीतून मार्ग काढण्याची वृत्ती या गोष्टींची चाचपणी करते. म्हणून केवळ जास्त पगाराच्या मागे न धावता कर्मचाऱ्यांनी आपले अनुभवाचे गाठोडे समृद्ध करण्यामागे लक्ष दिले पाहिजे.
कित्येक जणांना दर दोन वर्षांनी नोकरी बदलणे गरजेचे वाटते. एका नोकरीत जॉईन केले की वर्षभरात त्यांचा नवीन नोकरीसाठी शोध चालू होतो. काही वर्षांनी अशा कर्मचाऱ्यांची जॉब मार्केटमधील प्रतिमा खराब होते. कारण हा कर्मचारी विविध कंपन्यांमध्ये तोच तो जॉब करत नुसता फिरलेला असतो. त्याने नवीन क्षमता मिळवण्यामागे लक्ष दिलेले नसते. कंपनीच्या आव्हानांना, अडचणींना आपले मानून त्यांच्याशी भिडणारे कर्मचारी कंपनीला हवे असतात. कंपनीच्या चढउतारात वैयक्तिक लाभाची अपेक्षा न करता साथ देणाऱ्या कर्मचाऱ्यांची कंपनी योग्य कदर करते. मात्र ज्या कर्मचाऱ्यांची करिअरची ध्येय कंपनीच्या ध्येयांपेक्षा प्रबळ बनतात अशा कर्मचाऱ्यांना कंपन्या टाळू लागतात. सतत स्वतःच्या करिअरचा विचार करणाऱ्या, मला प्रमोशन केव्हा मिळणार?, वेतनवाढ कधी देणार? असे सतत विचारणारे हट्टी कर्मचारी कंपनीसाठी एक डोकेदुखी होऊन बसतात.
नोकरी बदलण्याचा विचार मनात आल्यावर स्वतःला काही प्रश्न विचारून बघा- माझे नोकरी बदलण्यामागचे प्रमुख कारण काय? मी सध्याच्या नोकरीत किती वर्ष काम केले? या जॉबमध्ये मी कंपनीमध्ये एक्सपर्ट गणला जातो का? कंपनीतील माझा परफॉर्मन्स कसा आहे? मला करिअरमध्ये पुढल्या पाच वर्षात काय करायचे आहे? त्यासाठी त्याच्या कंपनीत कितपत संधी आहे? या व अशा प्रश्नांचे प्रामाणिक उत्तर शोधून त्याविषयी तुमचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांची चर्चा करा. विचारपूर्वक केलेला नोकरीतला बदल स्वतःसाठी व कंपनीसाठी ही फायदेशीर ठरतो. याउलट केवळ अल्पकालीन फायद्याचा विचार करून केलेला बदल करिअरच्या सापशिडीत तुम्हाला खालच्या स्थानावर आणू शकतो. म्हणून सारासार विचार करून मगच पुढचा मार्ग निश्चित करा.

