सलील चिंचोरे
गेल्या काही लेखांमध्ये आपण करिअरच्या अनेक संकल्पनांचा उहापोह केला. त्यामध्ये करिअर लॅडर, करिअर लॅटीस, रिव्हर मॉडेल, इकिगाई करिअर मॉडेल, कौशल्ये आणि क्षमता-आधारित करिअर, करिअर अँकर्स अशा संकल्पनांचा आपण परामर्श घेतला. या प्रत्येक संकल्पनेचा उद्देश वेगळा, दृष्टिकोन वेगळा आणि त्याचा उपयोगही व्यक्तीसापेक्ष. ज्याला जे भावेल ते करिअर मॉडेल त्याने निवडावे. त्यामुळे असे वाटू शकते की यांना एकत्र जोडणारा समान धागा असू शकत नाही. हे तितकेसे खरे नाही. या सर्व संकल्पनांमधून करिअरविषयी काही महत्त्वाची समान सूत्रे आपल्या हाती लागतात. त्यांना गणिताच्या भाषेत आपण ‘करिअरवाढीच्या संकल्पनांचा लसावि’ असे म्हणूया.

पहिले सूत्र म्हणजे करिअर फक्त पद, पगार, पैसा अशा रूढार्थाने महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या गोष्टींपर्यंत मर्यादित नाही. त्यापेक्षा खोलात जाऊन करिअर स्वत:ची ओळख घडवण्यात मदत करते. आपल्यामधील क्षमता, आकांक्षा यांचा पूर्णपणे वापर करण्यासाठी करिअरसारखे महत्त्वाचे साधन नाही. आपण जितके स्वत:ला चांगले ओळखू तितके समर्पक करिअर मॉडेल निवडायला मदत होते. उदाहरणार्थ, ‘इकिगाई करिअर मॉडेल’ आवड, क्षमता, योगदान, आर्थिक मूल्य अशा चार पैलूंचा विचार करण्यास प्रवृत्त करते. योग्य करियर मॉडेल निवडल्यास भौतिक प्राप्तीबरोबरच मानसिक समाधान, तृप्तीची भावना मिळते.

दुसरे सूत्र म्हणजे करिअरच्या सारथ्याची जबाबदारी कंपनीकडे नसून ती कर्मचार्‍याच्या हातात असते. आपले व्यक्तिमत्त्व, सामर्थ्य व उद्दिष्टे याला अनुरूप करिअरचे मार्ग निवडण्याचे काम कर्मचार्‍याचे असते. त्या करिअरला पूरक अशा कामाची संधी व विकासाचे दरवाजे उघडून देण्याची जबाबदारी कंपनीकडे असते. असे समजा की करिअर नावाची एक गाडी आहे. तिचे सुकाणू तुमच्या हातात आहे. कंपनी म्हणजे शेजारच्या सीटवर गुगलमॅप हाती घेऊन दिशा दाखवणारा तुमचा सहकारी आहे. प्रत्येक गोष्टीसाठी कंपनीला जबाबदार धरून तिच्यावर विसंबून राहणार्‍या कर्मचार्‍यांसाठी हे खूप महत्त्वाचे सूत्र आहे.

करिअरचे तिसरे सूत्र म्हणजे तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाणारा करिअरचा एकच ‘करिअर समृद्धी महामार्ग’ कधी नसतो. ध्येयाकडे जाणार्‍या अनेक वाटा (करिअर मॉडेल्स) असतात. बर्‍याचदा आपण सुरक्षिततेच्या भावनेपोटी फक्त पारंपरिक करिअर मार्ग निवडतो. त्यात चुकीचे काही नसले तरी त्यात आपल्या क्षमतांचा पूर्णपणे वापर होत नाही व ध्येयाचे शिखर बर्‍याचदा आपल्याला हुलकावणी देते. यासाठी करिअरविषयक विस्तृत विचार करून त्यातील वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात. आजूबाजूच्या सहकार्‍यांनी चोखंदळलेले मार्ग अभ्यासून स्वत:चा मार्ग निश्चित करावा लागतो.

चौथे सूत्र हे करिअरचा प्रवास दर्शवणारे आहे. एप्रिल महिन्यात प्रमोशनच्या यादीत आपले नाव दिसले की ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ अशी भावना म्हणजे करिअर साध्य होणे नाही. करियरप्राप्ती केवळ प्रमोशन अथवा नोकरी बदलाने थांबत नाही. करिअर ‘रिव्हर मॉडेल’सारखा आयुष्याला पुरून उरणारा प्रवास आहे. एका अर्थाने ती दीर्घ पल्ल्याची मॅरेथॉन आहे. या प्रवासात अनेक वळणे, थांबे, उंच चढण, निसरड्या वाटा, दमछाक करणारे खडबडीत रस्ते असतात. या सर्वांना हाताळून ही मॅरेथॉन धावण्यासाठी मानसिक व शारीरिक कणखरता निर्माण करावी लागते. नाहीतर स्पर्धेबाहेर फेकले जाण्याचा संभव असतो.

पाचवे सूत्र म्हणजे प्रत्येकाचे करिअर वेगवेगळे असते. प्रत्येकजण स्वत:च्या आवडीनिवडी, सामर्थ्य, जीवनाची उद्दिष्टे यांच्या अनुषंगाने करिअर निवडत असतो. करिअरचा प्रवास कायमच अनपेक्षित व आव्हानात्मक असतो. अशा वेळेस करिअरची ही पंचसूत्री जरूर जवळ बाळगावी.

chinchoresalil@gmail.com

(लेखक मनुष्यबळ क्षेत्रातील तज्ज्ञ असून या क्षेत्रात २५ वर्षे कार्यरत आहेत.)