सलील चिंचोरे
आजच्या लेखात करिअरमध्ये पुढे जाण्यास प्रवृत्त करणार्या गोष्टींचा आपण परामर्श घेणार आहोत. अवघड कामे स्वीकारणे, आपल्या क्षमता दाखवणे, काम करताना योग्य व्यक्तींशी संबंध जोडणे तसेच इतरांकडून सातत्याने फीडबॅक घेणे या करिअर मार्गावरच्या शिड्या आहेत…
आपण सगळ्यांनी सापशिडीचा खेळ खेळलेला आहे. सापशिडीच्या पटावर योग्य जागेवर गेल्यास शिडी मिळते; अचानक आपण कित्येक स्थाने ओलांडून पुढे सरकतो. याउलट काही ठिकाणी साप मध्ये आल्यास आपण घसरगुंडीसारखे खाली येऊन आदळतो. करिअरचा प्रवाससुद्धा अनेक अर्थांनी सापशिडीच्या खेळासारखा असतो. त्यात काही गोष्टी विचारपूर्वक केल्यास प्रगतीसाठी शिडी मिळून आपण करिअरमध्ये वेगाने पुढे जातो. याउलट काही गोष्टी टाळल्या नाहीत तर करिअरमध्ये धक्का बसून नुकसान पोहोचू शकते. खेळात आपल्या नशिबी शिडी किंवा साप येईल हे सोंगट्यांवर अवलंबून असते. याउलट करिअरमधील साप-शिडी आपल्या विचार व वर्तनावर अवलंबून असते.
आजच्या लेखात करिअरमध्ये पुढे जाण्यास प्रवृत्त करणार्या गोष्टींचा आपण परामर्श घेणार आहोत. एक मार्ग म्हणजे अवघड समस्या निवडा. करिअरवाढ महत्त्वाच्या, संदिग्ध, गैरसोयीच्या आणि इतर लोक टाळतात अशा समस्यांची जबाबदारी घेतल्याने होते. अवघड कामांमुळे स्वत:ची क्षमता वाढते आणि वरिष्ठांच्या नजरेत आपण एक जबाबदार टीम मेंबर म्हणून लक्षात राहतो. एक फायनान्स मॅनेजर तिच्या कामापलीकडे जाऊन व्यवसायविभागाच्या खर्चकपात कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यासाठी स्वेच्छेने पुढे येते. यामुळे तिला ऑपरेशन्स, खरेदी विभाग आणि सीईओ यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते.
पुढचा मार्ग म्हणजे जे लोक केवळ बढतीची वाट पाहणार्यांपेक्षा आधीच आवश्यक क्षमता दाखवत आहेत त्यांना करिअरच्या संधी लवकर मिळतात. तुमची कंपनी कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे हे ओळखा आणि ती कौशल्ये अनिवार्य होण्यापूर्वीच आत्मसात करण्यास सुरुवात करा. एका एचआर मॅनेजरला आढळले की एआयमुळे भरती आणि कर्मचारी सेवांमध्ये परिवर्तन घडवत आहे. कंपनीने एआय पद तयार करण्याची वाट पाहण्याऐवजी ती एआय ॲप्लिकेशन्स शिकते, चॅटबॉटची चाचणी घेते, ऑटोमेशनचा वापर करून प्रक्रियेची पुनर्रचना करते.
अजून एक मार्ग म्हणजे काम करताना योग्य व्यक्तींशी संबंध जोडणे व जोपासना करणे. करिअर केवळ तुमच्या ज्ञानावरच घडत नाही. तुमचे काम कोणाला माहीत आहे, तुमच्या निर्णयावर कोण विश्वास ठेवतो आणि तुमच्यासाठी शिफारस करण्यास कोण तयार आहे यावरही ते अवलंबून असते. ‘‘आपल्याला फक्त आपल्या कामाशी मतलब आहे. बाकी कोणाशी मी बोलत नाही’’ अशी वृत्ती बाळगून चालत नाही. म्हणून केवळ तुमच्या बॉससोबतच नव्हे तर विविध विभाग आणि स्तरांवर संबंध निर्माण करा.
काम करत असताना आपल्या कामाचा, वर्तनाचा इतरांवर काय परिणाम होत आहे याबद्दल आपण अनभिज्ञ असतो. कामगिरी सुधारायची असेल इतरांकडून सातत्याने फीडबॅक घेणे आवश्यक असते. या फीडबॅकसाठी बॉसकडून होणार्या वार्षिक मूल्यांकनाची वाट पाहू नका. तुमच्या विश्वासातील लोकांना विचारा ‘‘जर मला पुढच्या स्तरावर काम करायचे असेल तर मी कोणती एक गोष्ट सुरू करावी, थांबवावी किंवा सुरू ठेवावी?’’ त्यानुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणा.
एका तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्यवस्थापकाला सांगितले जाते की ती आपल्या टीमला विकसित करण्याऐवजी स्वत:च समस्या सोडवते. हा फीडबॅक मिळाल्यावर ती जाणीवपूर्वक मोठे निर्णय इतरांना सोपवू लागते आणि निर्देश देण्याऐवजी मार्गदर्शन करू लागते. सहा महिन्यांनंतर तिची टीम अधिक स्वतंत्रपणे काम करू लागते. याशिवाय करिअर पुढे नेण्याचे अजूनही अनेक मार्ग आहेत. जसे- पूर्णपणे आत्मविश्वास नाही अशा परिस्थितीचा सामना करणे, स्वत:चा उत्तराधिकारी घडवणे, प्रमोशनच्या मागे न धावता योग्य अनुभव कमावणे, करिअर पुढे नेण्यासाठी मेंटर व स्पॉन्सर शोधणे इत्यादी. करिअरला धक्का देणार्या सापासारख्या गोष्टी पुढच्या लेखात बघूया.
chinchoresalil@gmail.com
(लेखक मनुष्यबळ क्षेत्रातील तज्ज्ञ असून या क्षेत्रात २५ वर्षे कार्यरत आहेत.)
