सलील चिंचोरे
कंपनीत काम करताना मला एक प्रश्न कायम विचारला जातो, “सर, मला अमुक तमुक कोर्स करायचा आहे. तो केल्याने काही फायदा होईल का?” त्यांनी त्या कोर्सबद्दल मित्रांकडून ऐकलेले असते किंवा कुठेतरी वाचलेले असते. काहीजण ऑनलाइन कोर्सेसचा कॅटलॉग वाचून त्यातील आकर्षक मथळ्यांना भुलतात. एका अभ्यासानुसार 2026 मध्ये भारतीय कर्मचारी कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे ऑनलाइन कोर्स प्रामुख्याने शोधताना दिसतात. याशिवाय संभाषण कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, तणावाचे व्यवस्थापन, सेल्समधील सॉफ्ट स्किल्स, नेतृत्व व व्यवस्थापनाविषयीचे कोर्सेस याही कोर्सेसच्या शोधात असतात.
पण कोर्सेसचा कॅटलॉग बघून स्वतःच्या विकासाची दिशा ठरवणे म्हणजे गाडीला बैलाला जुंपण्यासारखे आहे. बऱ्याचदा अशा कोर्सेससाठी पैसा व वेळ खर्च करूनही त्याचे फलित मनासारखे मिळाले नाही अशी खंत कर्मचारी व्यक्त करतात. नोकरी करताना घ्यायचे शिक्षण हे पदवीपर्यंतच्या शिक्षणापेक्षा वेगळे असते. नोकरी करताना शिक्षणातून मिळणाऱ्या डिग्रीचे महत्त्व कमी व करिअरसाठी होणारा फायदा बघायचा असतो. त्यासाठी मूलतः दोन प्रश्न प्रामुख्याने विचारात घेतले पाहिजेत १) कर्मचाऱ्यांनी कोर्सेसची निवड कशी करावी? आणि २) त्यातून जास्तीत जास्त फायदा कसा मिळवावा?
कोर्सेसची निवड करताना त्यामागील करिअरचा हेतू स्पष्ट हवा. प्रमोशन, रोलमध्ये बदल, विषयात प्रावीण्य यापैकी मी काय साधू इच्छितो? का मला कंपनीतील पुढच्या स्तरासाठी तयारी करायची आहे? याचा विचार झाल्यावर पुढच्या दोन-तीन वर्षात काय करावे लागेल याचा तपशील मांडा. कोणती स्किल्स वाढवावे लागतील? उदाहरणार्थ, कंपनीची बॅलन्सशीट समजून घेणे, प्रॉडक्ट मार्केटिंग वगैरे.
दुसऱ्या कॅटेगरीत भविष्यासाठी स्वतःला तयार करण्यासाठीचे कोर्सेस- कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल मार्केटिंग वगैरे. तिसऱ्या कॅटेगरीत स्वतःची नेतृत्व क्षमता वाढवणारे कोर्सेस- निर्णय घेण्याची क्षमता, मोठ्या टीमचे नेतृत्व, बिझनेस स्ट्रॅटेजी इत्यादी. आता यातून तुमच्या कंपनीच्या प्लॅनला पूरक कोर्सेस निवडा. तुमची कंपनी सध्या कुठल्या स्किल्सला महत्त्व देते? कुठल्या क्षेत्रांमध्ये तुमची कंपनी गुंतवणूक करत आहे- व्यवसायाचा विस्तार, ESG, डिजिटल? अशा तऱ्हेने तुमचे कोर्सेस कंपनीच्या प्राधान्यक्रमात बसत असतील तर तुम्हाला कंपनी तुम्हाला त्या कोर्ससाठी स्पॉन्सर करायची शक्यता वाढते. तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांमध्ये तुमचा अर्ज निवडला जाण्याची जाऊ शकतो.
मॅनेजमेंट कोर्सेस वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. काही कोर्सेस एक-दोन आठवड्यांचे, काही कित्येक महिने चालणारे तर काही ऑनलाइन कोर्सेस तुमच्या सवडीनुसार पूर्ण करता येतात. तुमच्या नोकरीतून वेळ काढून तुम्ही कोणते कोर्सेस करू शकता याची पडताळणी करा. नोकरीतील कामे, कौटुंबिक जबाबदाऱ्या याचा विचार करा. कोर्सचा फायदा किती होणार याचा विचार करताना कोर्समुळे होऊ शकणारी संभाव्य पगारवाढ, नवीन रोल्स मिळण्याची शक्यता, कोर्सच्या ब्रँडमुळे (उदा. हार्वर्ड बिझनेस स्कूल) तुमच्या उमेदवारी मूल्यात होऊ शकणारी वाढ यासर्वांचा विचार करा. ज्यांनी हे कोर्सेस पूर्ण केले आहेत त्यांच्याकडून अभिप्राय घ्या.
कोर्समधून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी कोर्स सुरू होण्याआधी त्यातून तुमचे स्वतःचे दोन-तीन टारगेट नक्की करा. तुमच्या मॅनेजरबरोबर त्याची चर्चा करा. कोर्समधून मिळणाऱ्या ज्ञानाचा वापर करून कंपनीमधील समस्यांचा अभ्यास करा. तुमच्या कोर्समुळे कंपनीच्या कामगिरी सुधारणा होत असेल तर अतिशय उत्तम! अशा कोर्सेसमुळे कंपनी बाहेरील क्षेत्रातील तुमच्या सम-व्यावसायिकांचे नेटवर्क वाढते. त्यांच्याबरोबर चर्चा करून तुमची क्षमता वाढवा. एकदा कोर्स पूर्ण करून भागत नाही. कोर्स मटेरियल महिन्या-दोन महिन्यातून एकदा पुन्हा वाचा. ज्ञान टिकवून ठेवण्याचा चांगला मार्ग म्हणजे दुसऱ्यांना शिकवणे. तुम्ही कोर्समध्ये शिकलेल्या संकल्पनांवर कंपनीमधील सहकार्यांना प्रेझेंटेशन करा.
सापशिडीच्या खेळाप्रमाणे करिअरमध्ये पुढे जाताना स्वतःला सतत अपग्रेड करून करिअरची शिडी आत्मविश्वासाने चढत राहा!
