मधुगंधा कुलकर्णी
लेखन ही अत्यंत स्वतःची स्वतंत्रपणे करता येण्यासारखी कला आहे. बाकी कोणत्याही कलेसाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावे लागते. लेखन ही कला जर तुम्हाला परमेश्वराने दिली असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि ती जर तुम्ही वापरली नाही तर तुम्ही कमनशिबी आहात.
लेखक होणे ही निसर्गाची कृपा आहे. तुमच्या मेंदूमध्ये निसर्गाने ती चिप बसवलेली असते. त्यामुळे तुमच्या डोळ्यांवर एक वेगळा चष्मा लागतो आणि सामान्य माणसांसाठी घडणाऱ्या घटनांमध्ये तुम्हाला एक नाविन्य आणि एक वेगळ्या पद्धतीचे रंजन दिसते. ते मांडण्याची कला तुम्हाला निसर्गाने दिलेली असते. मला निसर्गाने हा गुण दिला यासाठी मी नेहमी कृतज्ञ असेन आणि लेखन करता येते म्हणूनच मी निर्माती होऊ शकले, असे मला वाटते.
भावना आणि कौशल्यांचा ताळमेळ
आपल्याला किशोरवयातच कळते की आपला हात लिहिता आहे की नाही. वयाच्या १५-१६ व्या वर्षी जेव्हा संप्रेरकांमुळे (हार्मोन्स) बदल होत असतात तेव्हाच ती लिहिण्याची किंवा कोणत्याही कलेची ऊर्मी उसळून येते. मग तुम्ही कविता करता, कथा, नाटक, एकांकिका लिहिता आणि त्यातून तुम्हाला कळते. अर्थात तुम्ही जे लिहिता ते दर्जेदार आहे की नाही याचे मार्गदर्शन करण्यासाठी कोणीतरी हवे असते. माझ्या सुदैवाने माझ्या आयुष्यात महाविद्यालयात खूप चांगले शिक्षक होते. तज्ज्ञ मंडळी होती, ज्यांनी मार्गदर्शन केले. काही चुका होतात, भावनेचा ओघ असतो. भावना आणि कौशल्य यांचा तारतम्याने विचार करून तो समतोल साधावा लागतो.
आपण कमी पडतोय का, आपल्याला येत नाही का असा न्यूनगंडही या वयात येतो. पण तुमची अभिनयाची, लेखनाची आत्मिक ऊर्मी असेल तर ती ऊर्मी तुम्हाला धरून ठेवते, तुम्हाला पुढे नेत राहते. तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडते. कदाचित सुरुवातीला अपयश येईल, पण तुम्हा हाडाचे लेखक असाल तर सुरुवातीला तुम्ही सर्व चाचपडून पाहावे लागतात. मग नेमका कशात आनंद मिळतो आणि काय येते याचा अंदाज घेऊन जसजसे तुम्ही वाढत जाता तसा या सर्वाचा लसावि काढावा लागतो.
धडपड, सातत्याची जोड
मी स्वत: विज्ञान शाखेची विद्यार्थीनी आहे. मला सुरुवातीला असे वाटले होते की आपण विज्ञान शाखा घेऊन चुकलो की काय? कला शाखेत प्रवेश घेतला असता तर साहित्य, लेखन, नाट्य, चित्रपट या सर्वांचा जवळून अभ्यास करता आला असता. पण नंतर समज आल्यावर कळलं की नाही, शाखा कोणतीही असली तरी फरक पडत नाही. मला शास्त्राची तरी ओळख झाली, अन्यथा भौतिक, जीव, रसायनातील काही कळलं नसतं. बीए करून जे ज्ञान मला मिळाले असते किंवा व्यासंग वाढला असता तो मी विज्ञान शाखेत शिकूनही वाढलाच. पण ज्यांचा कलेकडे कल आहे, त्यांना कला शाखा निवडावी, हे स्वाभाविक आहे. पण शाखेपेक्षाही तुम्ही तुमच्या आवडत्या विषयात किती रस घेताय, सक्रिय सहभाग घेताय, ते महत्त्वाचे असते. मी एम.ए. नाट्यशास्त्र केले. पण लहान गावांतून आलेल्या मुलांना ही संधी अनेकदा मिळत नाही. पण तुमचा कल असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयात काम करत राहता. त्यासाठी सातत्य हवे. धडपड या क्षेत्रात थोडी जास्त असेल. तुम्हाला तुमचे काम सिद्ध करावे लागते, त्यातून कामे मिळत जातात. टॅलेंट असायलाच पाहिजे, पण त्या टॅलेंटला धडपड आणि सातत्याची जोड हवी. त्याशिवाय तुम्ही स्वतःसाठी कामांच्या संधी निर्माण करू शकणार नाही.
शिक्षण नव्हे… व्यासंग
शिक्षण घेऊन लेखन करता येत नाही. वाचनाची गोडी असावी लागते, वाढवावी लागते. तुम्हाला जागतिक साहित्य काय आहे, इब्सेन, शेक्सपिअर कोण आहे, हेच मला माहीत नाही आणि मला लेखक व्हायचे आहे. तेंडुलकरांची नाटके मला माहीत नाही, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर मला माहीत नाहीत आणि मला साहित्यिक व्हायचे, कथा, नाटके लिहायचीत, असे होत नाही. मग जे करता, ते लेखन उथळ होते. व्यासंगाशिवाय अमूक गोष्ट किंवा साहित्य आधी कोणीतरी लिहून ठेवले आहे, हे कळणार नाही तर टॅलेंटशिवाय लिहिताच येणार नाही. तुम्ही एम.ए. नाट्यशास्त्र करून नट व्हाल याची हमी नसते. मुळात ते तुमच्यात असावे लागते. डॉक्टर, इंजिनीअर शिकून होता येते, पण लेखक नाही.
तुम्ही लेखक असाल तर जगात काय सुरू आहे. मला जे सुचले आहे ते याआधी कोणी करून ठेवले आहे का, किंवा आता साहित्यात, नाटकात, चित्रपटात कोणती चळवळ सुरू आहे, या सगळ्याचा व्यासंग असायला हवा. एकदा तो आला की तुम्हाला पुढचा मार्ग सापडत जातो.
संधींची विपुलता
तुम्ही लिहिते असाल तर सिने-नाट्य, डिजिटल क्षेत्रात संधींची कमतरता नाही. डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे तुमचा काँटेंट तुम्ही स्वतःच तयार करू शकता. त्यातून तुमचे कौशल्य लोकांना दिसते. टीव्ही, ओटीटी, नाटक, सिनेमे, पुस्तके असे वेगवेगळे प्रकार तुम्ही हाताळू शकता. तुम्हाला कोणत्या प्रकारचे लेखन करायचे आहे, किती व्यावसायिक प्रकारचे लेखन करायचे आहे, हे एकदा ठरवले की मार्ग सापडू लागतात. सिनेक्षेत्रात चांगल्या लेखकांची वानवा आहे. तुम्ही चांगले लिहीत असाल तर लोक तुमच्यासाठी पायघड्या घालतील. तुमचा आदर करतील. चांगल्या लिखाणाचा अर्थात तुम्हाला चांगला मोबदलाही मिळतो.
आव्हाने काय?
कधीकधी क्रिएटिव्ह, व्यावसायिक आव्हाने असतात. कधीकधी मनस्ताप होतो. कधीकधी टीमबरोबर जुळवून घेणे अवघड जाते. पण ही सर्व आव्हाने कोणत्याही क्षेत्रात असू शकतात. एआयचे आव्हान मला अजिबात वाटत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता सर्जनशीलतेची जागा घेऊ शकणार नाही. एआयकडे डेटा खूप आहे, पण त्याला सुचू शकत नाही. सर्जनशील लेखकांची नेहमी गरज होती आणि पुढेही राहणार आहे.
लेखन ही अत्यंत स्वतःची स्वतंत्रपणे करता येण्यासारखी कला आहे. बाकी कोणत्याही कलेसाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावे लागते. लेखन ही कला जर तुम्हाला परमेश्वराने दिली असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि ती जर तुम्ही वापरली नाही तर तुम्ही कमनशिबी आहात. आताचे वातावरण लेखकांसाठी खरेच पोषक आहे, दर्जेदार लिखाण करणाऱ्या नव्या लेखकांची गरज आहे. तेव्हा तुमच्यात टॅलेंट असेल, तर लिहिते व्हा!
(लेखिका अभिनेत्री, निर्मात्या, लेखिका आहेत.)
