एखाद्या चित्रपट, मालिका, शॉर्ट फिल्म, जाहिरात या मधील कथेच्या गरजे नुसार लागणारे नैपथ्य मांडणे म्हणजे कला दिग्दर्शन होय. कित्येक वेळा तयार लोकेशन वर काही थोडेफार बदल करून सुद्धा काम होते तर काही वेळा गरजेनुसार आपला सेट उभा करावा लागतो. कलादिग्दर्शन करताना त्यात अनेक बाबीकडे लक्ष्य द्यावे लागते सेट चे बांधकाम करणे, त्यातील लागणारी प्रॉपर्टी जमा करणे अथवा बनविणे, भिंतींचे टेक्स्चर, सेट ची रंगसंगती, फ्लोरिंग, दरवाजे आणि खिडक्या ची पद्धत, खिडक्यांचे पडदे, सेट वरचे फर्नीचर अशा अनेक बाबी चा विचार करावा लागतो.

अनेक मुलांना शाळेपासून कलेची आवड असते आणि आर्ट डायरेक्शन चे आकर्षण असते परंतु याचे रीतसर शिक्षण घेऊनच त्यांनी या कडे यावे असे मला वाटते. आज बारावीनंतर किंवा ग्रेजुएशन नंतर याचे शिक्षण घेण्यासाठी अनेक इंस्टिट्यूट आहेत. यामधे फिल्म आणि टेलीविज़न इंस्टिट्यूट ( पुणे ), व्हिसलिंग वुड या सारख्या काही इंस्टिट्यूट मधे याचे शिक्षण घेता येते.

शिक्षण घेऊन झाल्यानंतर चार पाच वर्ष कोणा अनुभवी कलादिग्दर्शकाकडे सहाय्यक म्हणून काम करावे म्हणजे त्यातील बारकावे लक्षात येतील ज्याचा अनुभव पुढील आयुष्यात कामाला येईल. सेट वर काम करताना खूप गोष्टींचे ज्ञान असणे जरुरी आहे जसे आपण लावत असलेल्या सेटचा काळ कोणता आहे, त्या काळातील बारकावे, वापरलेले साहित्य, आता मिळत असलेल्या साहित्याचा उपयोग करून त्याकाळातील देखावा कसा उभा करू शकतो याचे ज्ञान, भिंतींवरील टेक्स्चर, रंगसंगती या सर्व गोष्टीची कल्पना असणे गरजेचे आहे. तसेच आता बाजारात मिळत असलेली वेगवेगळी माध्यमे, लाकूड, प्लाईवुड, फायबर, स्पंज, थर्माकोल अशा अनेक गोष्टींची माहिती आसने जरूरी आहे.

जसं आता सेट साठी लागणारे साहित्य बद्दल आपण माहिती घेतली तसेच आर्ट डायरेक्टर म्हणून काम करतानाची एक प्रोसेस आहे त्याची माहिती घेऊ. एखाद्या प्रोजेक्ट साठी आर्ट डायरेक्टर म्हणून आपली निवड झाली की त्या प्रोजेक्ट ची स्क्रिप्ट वाचणे आणि त्यातील आर्टच्या गरजेनुसार आपल्या नोट्स काढणे हे पहिले काम असते आणि त्यानंतर दिग्दर्शक आणि छायाचित्रकार यांच्या सोबत चर्चा करून आपण आपल्या सेटचा लुक आणि फील ठरवू शकतो म्हणजे त्यातील लागणारे एकूण सेट, त्याचा प्रत्येक सीन नुसार करावे लागणारे बदल, त्या प्रोजेक्ट च्या काळानुसार लागणारी माहिती, त्याचे पुरावे, फोटोज, रेफरन्स इत्यादी गोष्टी जमा करून त्या दिग्दर्शकाकडून पास करून घेणे हे महत्वाचे आहे.

हे करताना त्यातील किती सेट आपण उपलब्ध लोकेशन वर करणार आहोत त्याची रेकी करणे गरजेचे असते ज्यामुळे त्या लोकेशन ची माहिती, त्याची सगळी माप, त्यामध्ये आपल्या गरजेनुसार करावे लागणारे बदल हे सुद्धा ठरवावे लागते. आणि जे लोकेशन आपण सेट बांधून करणार आहोत त्याचे प्लान, एलिवेशन, रेफरेंस फोटोज, वापरणार साहित्य, याची सर्व माहिती एकत्र करणे गरजेचे असते. कलादिग्दर्शन करताना कलादिग्दर्शकाबरोबर खूप मोठी टीम लागते या मधे सहाय्यक कलादिग्दर्शक, प्रॉप मास्टर, सेट ड्रेसर, ऑनसेट सेटड्रेसर, ऑनसेट कलादिग्दर्शक, ऑनसेट प्रॉप मास्टर याच बरोबर ऑटोकॉड आर्टिस्ट, ग्राफ़िक आर्टिस्ट, शिल्पकार, इलस्ट्रेटर, साइनबोर्ड आर्टिस्ट इत्यादी मुख्य टीम बरोबरच कारपेंटर, पेंटर, टायपिस्ट, पॉलिश वाला, वेल्डर, मोल्डर, इलेक्ट्रीशियन आणि हेल्पर्स इत्यादी टीमची मदत होते.

आजकालच्या काळात खूप साऱ्या चित्रपट, मालिका, जाहिराती, ओटीटी वर खूप शॉर्ट फिल्म आणि मालिका तयार होत असतात आणि त्यासाठी खूप कलादिग्दर्शकाना काम करायची संधी उपलब्ध आहेत. जेवढ्या संधी उपलब्ध आहेत तेवढीच त्यांच्या मधे व्यावसायिक स्पर्धा सुद्धा आहेत. त्यामुळे प्रत्येक जण त्यात सातत्याने उभा राहण्यासाठी खूप व्यावसायिक तडजोडी करत आहेत, आणि ज्या प्रमाणे व्यावसायिक तडजोड करतात त्याप्रमाणे कामामध्ये सुद्धा तडजोडी करतात.

कलादिग्दर्शन करण्यासाठी उत्सुक आसणाऱ्यांनी जर वरील सर्व गोष्टी सांभाळण्याचे कसब नसेल आणि कलादिग्दर्शन क्षेत्रात यायचे असेल तर वर नमूद केलेल्या मुख्य विभागामध्ये स्वतंत्र काम करू शकतात. जसे की प्रॉप मास्टर, ऑन सेट प्रॉप मास्टर, सेट ड्रेसर, ऑनसेट सेट ड्रेसर, ग्राफिक आर्टिस्ट, ऑटो कॅड आर्टिस्ट इत्यादी.

मी स्वतः सर ज. जी. कलामहाविद्यालय मधून अप्लाइड आर्ट शाखेतून फोटोग्राफी विषयात पदवी घेतली आणि त्या नंतर मी कलादिग्दर्शन करायला सुरुवात केली. सुरुवातीला मराठी मालिका साठी काम करता करता काही काळाने जाहिरातींसाठी कलादिग्दर्शन करायला सुरुवात केली. जाहिरातीसाठी काम करताना माझी स्वतःची एक टीम बनवली ज्यामध्ये वर नमूद केलेले सर्व कारीगर आहेत त्या सगळ्यांना घेऊन २००० साली माझी स्वतःची “ डी ३ द आर्ट टीम “ या नावाने कंपनी चालू केली, जाहिराती बरोबर काम करताना इंटरनेशनल फिल्म साठी काम करायची संधी मिळाली आणि आज गेली २५ वर्ष मी माझ्या त्याच टीम सोबत जाहिराती आणि इंटरनेशनल फिल्म साठी कलादिग्दर्शनाचे काम करीत आहोत.

लेखक…
दिलीप महादेव मोरे. ( कलादिग्दर्शक )
dilipmore007@gmail.com
http://www.d3theartteam.com