पूजा निलेश
फक्त सुंदर अक्षर लिहिणं म्हणजे सुलेखन नाही. अक्षराचा आकार, त्याची रेषा, जाडी-बारीकपणा, अक्षरांमधली जागा, शब्दाची लय आणि संपूर्ण रचनेचा विचार करून अक्षराला सुंदर रूप देणं म्हणजे सुलेखन.
स्वतःच्या शैलीचा शोध
सुलेखन शिकताना सुरुवातीला आपण दुसऱ्याची पद्धत पाहून लिहितो. त्याच अक्षराची नक्कल करतो. पण हळूहळू हाताला आत्मविश्वास येतो आणि प्रयोग सुरू होतात.
कुठे अक्षर थोडं मोठं करावं? कुठे रेषा वाढवावी? कुठे मोकळी जागा ठेवावी? कुठे थांबावं? रंगाचा वापर कसा करावा? अक्षर आणि चित्र यांचा संबंध कसा साधावा?
या प्रश्नांची उत्तरं शोधताना कलाकाराची स्वतःची शैली तयार होते. आणि जेव्हा एखाद्याचं काम नाव न सांगताही ओळखता येतं, तेव्हा कलाकाराने आपली अक्षरभाषा तयार केली आहे असं म्हणता येईल.
कुठे शिकाल?
आज जगभर सुलेखन शिकण्यासाठी अनेक संस्था, अभ्यासक्रम आणि कार्यशाळा उपलब्ध आहेत. काही ठिकाणी सुलेखन हे स्वतंत्र कला म्हणून शिकवलं जातं, तर काही ठिकाणी त्याचा संबंध डिझाइन, टायपोग्राफी, इलस्ट्रेशन आणि फाइन आर्टशी जोडला जातो. भारतातही सुलेखनाच्या शिक्षणाला हळूहळू स्वतंत्र ओळख मिळत आहे.
अच्युत पालवं स्कूल ऑफ कॅलिग्राफी ही भारतातील सुलेखन शिक्षणाच्या क्षेत्रातील महत्त्वाची संस्था आहे. येथे विविध पातळ्यांवर सुलेखन शिकवलं जातं. तसंच भारतातील काही कला आणि डिझाईन संस्थांमध्येही कॅलिग्राफीचे स्वतंत्र अभ्यासक्रम किंवा कार्यशाळा घेतल्या जातात.
परदेशात पाहिलं तर सुलेखनाचं शिक्षण आणखी व्यवस्थित पद्धतीने विकसित झालेलं दिसतं. लंडनमधील सिटी लिटसारख्या संस्थांमध्ये बिगिनर पासून ऍडव्हान्स स्तरापर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कॉपरप्लेट, गॉथिक, मॉडर्न कॅलिग्राफी, ब्रश लेटरिंग, इल्युमिनेटेड लेटरिंग अशा अनेक शैली शिकवल्या जातात.
अमेरिकेतील सोसायटी ऑफ स्क्राइब्ससारख्या संस्था सुलेखनाच्या अभ्यासाबरोबर कार्यशाळा, प्रदर्शन आदि विविध उपक्रम घेतात. ब्रिटनमधील सोसायटी ऑफ स्क्राइब्स अँड इल्युमिनेटर्स ही पारंपरिक सुलेखन आणि इल्युमिनेशनच्या अभ्यासासाठी ओळखली जाते. आपल्याकडे तर लिपींचा इतका मोठा वारसा आहे. देवनागरी, मोडी, शारदा, गुरुमुखी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा अनेक लिपींचं स्वतंत्र सौंदर्य आहे. या लिपींचा अभ्यास, त्यांचं सुलेखन आणि त्यांचा आधुनिक डिझाइनमध्ये वापर यावर अजून खूप काम होऊ शकतं.
एआयच्या काळात सुलेखनाचं काय?
आज कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे काही सेकंदांत सुंदर अक्षररचना तयार होऊ शकते. त्यामुळे सुलेखन कलाकारांचं भविष्य काय, असा प्रश्न अनेकांना पडतो.
पण कला फक्त सुंदर परिणामाचं नाव नाही. त्या परिणामापर्यंत पोहोचण्याचा प्रवासही तितकाच महत्त्वाचा असतो. एका कलाकाराने ब्रश हातात घेऊन केलेली रेषा, तिच्यात आलेला थोडासा फरक, एखाद्या अक्षरात अचानक सापडलेली सुंदर लय व हालचाल हे सगळं त्या कामाला वेगळं बनवतं. तंत्रज्ञान आपल्याला मदत करू शकतं. नवीन माध्यमं देऊ शकतं. पण स्वतःची नजर, स्वतःचा हात आणि स्वतःची शैली कलाकारालाच तयार करावी लागते.
सुलेखनातून करिअर
सुलेखनाच्या माध्यमातून अनेक प्रकारची कामं करता येतात. स्वतंत्र कॅलिग्राफर म्हणून काम करण्यापासून ते लोगो, ब्रँडिंग, लग्नपत्रिका, निमंत्रणपत्रिका, नावफलक, पुस्तकांची मुखपृष्ठं, जाहिराती, पॅकेजिंग आणि भिंतीवरील लेखनापर्यंत अनेक संधी आहेत.
वेडिंग आणि इव्हेंट कॅलिग्राफी हा देखील एक चांगला पर्याय आहे. लग्नपत्रिका, एन्व्हलप, स्वागतफलक अशा कामांना हाताने केलेल्या अक्षरांची खास मागणी असते.
वॉल कॅलिग्राफी आणि म्युरल्सचं क्षेत्रही वाढत आहे. कॅफे, रेस्टॉरंट, हॉटेल, शाळा, कार्यालये आणि घरांच्या भिंतींवर सुंदर अक्षरांत संदेश, कविता किंवा नावं लिहिण्याची कामं मिळू शकतात.
चित्रपट, मालिका आणि जाहिरातींसाठी टायटल डिझाइन आणि खास अक्षररचना करण्याची संधीही आहे.
आज डिजिटल कॅलिग्राफी आणि लेटरिंग मुळे कलाकाराचं काम कागदापुरतं मर्यादित राहत नाही. टॅबलेट आणि स्टायलसच्या मदतीने केलेलं काम पुढे लोगो, पोस्टर, पॅकेजिंग किंवा समाज माध्यमांमध्ये वापरता येतं.
कस्टम नेम आर्ट हा देखील एक सुंदर पर्याय आहे. नावफलक, भेटवस्तू, घरासाठी अक्षरकलाकृती, लग्न किंवा वाढदिवसासाठी खास नावं अशा अनेक गोष्टी करता येतात.
आणि अर्थातच कॅलिग्राफी शिक्षक म्हणूनही करिअर करता येतं. शाळा, कला संस्था, कार्यशाळा, ऑनलाइन शिकवणी किंवा स्वतःचे अभ्यासक्रम यांच्या माध्यमातून सुलेखन शिकवता येतं.
ज्यांना इतिहास आणि जुन्या लिपींची आवड आहे, त्यांच्यासाठी भारतीय लिपींचा अभ्यास, दस्तावेजीकरण आणि त्यावर आधुनिक प्रयोग करण्याचंही मोठं क्षेत्र आहे.
आज सोशल मीडियामुळे कलाकाराला स्वतःचं काम लोकांपर्यंत पोहोचवणंही सोपं झालं आहे. आपल्या कामाचे फोटो, प्रोसेस व्हिडीओ, ट्युटोरिअल्स, कार्यशाळा यांच्या माध्यमातून स्वतःची ओळख तयार करता येते.
अक्षरं जिवंत ठेवण्याची जबाबदारी
अक्षरं बदलत राहतात. माध्यमं बदलतात. लिहिण्याच्या पद्धती बदलतात. पण माणसाला व्यक्त होण्याची गरज कायम राहते. आज आपण मोबाईलवर टाइप करतो, उद्या कदाचित आणखी वेगळ्या पद्धतीने संवाद साधू. तरीही हाताने उमटवलेल्या अक्षराचं आकर्षण संपणार नाही.
कारण त्या अक्षरात फक्त शब्द नसतात. त्यात माणसाचा हात असतो, त्याची नजर असते, त्याचा अनुभव असतो आणि त्याची भावना असते.
अक्षरं लिहिली जातात… पण काही अक्षरं मनात कायमची कोरली जातात.
