लेखक – किरण सबनीस : डिझाइन क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणतीही शाखा अडथळा ठरत नाही. मात्र, प्रत्येक शाखेचे फायदे आणि मर्यादा आहेत त्यांचा विचार करणे गरजेचे आहे. डिझाइन क्षेत्राची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दैनिक वेळापत्रक व्यवस्थित करणे, वेळेचे नियोजन करणे, नवनवीन प्रयोग करत राहणे आणि शैक्षणिक अभ्यासाबरोबर डिझाइन कौशल्ये व मानसिकता विकसित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आजच्या आधुनिक युगात डिझाइन क्षेत्र हे अनेक ज्ञानक्षेत्रांचा योग्य समन्वय साधत आहे. कोणतीही नवीन वस्तू किंवा सेवा डिझाइन करत असताना डिझाइनर्सना तीन पैलूंचा सखोल विचार करायला लागतो – वापरकर्त्याच्या गरजा, अपेक्षा, तांत्रिक उपलब्धता व शक्यता आणि व्यावसायिक व्यवहार्यता. याचाच अर्थ असा की डिझाइन क्षेत्राचा विज्ञान, कला आणि वाणिज्य या तीनही शाखांशी परस्परपूरक संबंध आहे.

त्याचप्रमाणे डिझाइन संस्थांमध्ये घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांसाठी १० वी नंतर कोणत्याही विशिष्ठ शाखेची अट नाही. डिझाइन क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी या तिन्ही शाखांपैकी कोणतीही शाखा निवडता येते. भारतातील बहुतेक सर्व नामवंत डिझाइन संस्था उदाहरणार्थ, राष्ट्रीय अभिकल्प संस्थान (एन.आय.डी,), भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आय.आय.टी.), राष्ट्रीय फॅशन प्रौद्योगिकी संस्थान (एन.आय.एफ.टी.) आणि इतर डिझाइन शिक्षण संस्था विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना डिझाइनच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना समान संधी देतात.

त्यामुळे डिझाइन क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसमोर ११वी आणि १२वी च्या शिक्षणाच्या शाखेची निवड करण्याचे आव्हान किंवा प्रसंगी मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. अधिक खोलात गेल्यास संभ्रमाची खालील कारणे असल्याचे जाणवते.

(१) सर्वसाधारणपणे डिझाइन क्षेत्र केवळ चित्रकला, सौंदर्यशास्त्र, रंगसंगती या विषयांशी निगडीत आहे असे अनेक विद्यार्थी व पालकांना वाटते. परंतु प्रत्यक्षात डिझाइन हा विषय संशोधन, उत्पादन, विपणन, तंत्रज्ञान,आदी विविध क्षेत्रांशी सुद्धा निगडित आहे. त्यामुळे केवळ कला शाखा पुरेशी नसून इतर शाखांचीही आवश्यकता भासते.

(२) आपल्या मुलांना डिझाइन क्षेत्रात भविष्य आहे का याची चिंता पालकांना असते. त्यामुळे त्यांना इतर शाखांमध्येही डिझाइनच्या संधी शोधायच्या असतात.

(३) काही विद्यार्थ्याना डिझाइन आणि आर्किटेक्चर या दोन्ही पैकी नेमके कोणते करिअर निवडावे हे निश्चित करायला वेळ हवा असतो. आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेसाठी (नाटा) विज्ञान शाखा अनिवार्य आहे, परंतु डिझाइन पदवी अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेचे विद्यार्थी पात्र होऊ शकतात.

विद्यार्थ्याना आणि पालकांना विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखांमुळे, डिझाइन शिक्षणाच्या तयारीसाठी आणि भविष्यातील करियरसाठी होणाऱ्या फायद्यांचा आणि मर्यादांचा विचार करणे महत्त्वाचे ठरणार आहे. (सोबत दाखवलेला तक्ता पहावा) १० वी नंतर उपलब्ध शाखा आणि डिझाइन प्रवेश परीक्षा यांच्यामधील साधर्म्य: शाखा डिझाइन क्षेत्राशी साधर्म्य उपयुक्तता मर्यादा

विज्ञान (सायन्स)

तंत्रज्ञान, शास्त्रीय दृष्टिकोण, अभियांत्रिकी ज्ञान वाढते आणि जटिलता हाताळता येऊ शकते तार्किक (लॉजिकल) दृष्टिकोण, त्रिमीतीय व अभिक्षेत्रीय निरीक्षण कौशल्यांचा विकास. डिझाइन प्रवेश परीक्षांमधील भाग ‘ए’ तुलनेने सोपा जाऊ शकतो. जटिल अभ्यासक्रम, कॉलेज , प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल्स) याकरिता जास्त वेळ द्यावा लागतो. अवांतर वाचन, डिझाइन कौर्सेस करायला वेळ अपुरा पडतो.

कला (आर्ट्स)

सौंदर्यशास्त्र, रंग, आकार आणि स्वरूपाची समज, नवीन भाषांची व संस्कृतींची ओळख कल्पनाशक्ती, दृश्य संवाद आणि अभिव्यक्ती कौशल्यांचा विकास. मुक्त विचार करायची सवय. प्रवेश परीक्षांची तयारी करायला व स्वत:ला अन्वेषण करायला अधिक वेळ उपलब्ध. शास्त्रीय दृष्टिकोन किंवा तांत्रिक गोष्टीकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होऊ शकते. डिझाइन आणि तंत्रज्ञानातले घडणारे बदल व कृत्रिम बुद्धिमता (एआय) यापासून अंतर वाढू शकते.

वाणिज्य (कॉमर्स)

व्यवसाय, ट्रेंडस, अर्थशास्त्र आणि मार्केटिंग ज्ञान बाजारपेठेचा आकलन, ग्राहकांची गरज ओळखणे आणि व्यवसायिक दृष्टीकोन यांचा विकास.
कला शाखे प्रमाणे प्रवेश परीक्षांची तयारी करायला व स्वत:ला अन्वेषण करायला अधिक वेळ उपलब्ध. डिझाइनशी थेट साधर्म्य कमी (पदवीच्या शेवटच्या टप्प्यात अधिक उपयुक्तता). काही उपक्रमात किंवा प्रकल्पात सुरवातीपासून ‘आर्थिक नफा तोट्याचा’ विचार सर्जनशीलतेला बांध घालू शकतो.
१० वी नंतरच्या शाखा आणि डिझाइनच्या भविष्यातील करिअर यांच्यातील परस्पर संबंध: विद्यार्थ्याना जर डिझाइन मध्ये कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, याची काही प्रमाणात जरी स्पष्टता असली तरी त्याचा उपयोग त्यांना शाखा निवडताना होऊ शकतो.

विज्ञान शाखा: डिझाइन क्षेत्रातील प्रोडक्ट डिझाइन, वाहन डिझाइन, यूजर एक्सपिरियन्स डिझाइन, अंतर्गत सजावट आणि गेम डिझाइन यांसारख्या क्षेत्रांसाठी विज्ञान शाखेचा आधार मजबूत असतो. कारण या क्षेत्रात तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि विश्लेषणात्मक कौशल्ये आवश्यक असतात.

कला शाखा: डिझाइन क्षेत्रातील ग्राफिक डिझाइन, फॅशन डिझाइन, अॅनिमेशन, एक्झिबिशन डिझाइन यांसारख्या क्षेत्रांसाठी उपयुक्त ठरते. कारण या शाखेत सौंदर्यशास्त्राचा अभ्यास केला जातो आणि कल्पनाशक्ती मुक्त वापर करणे गरजेचे असते.

वाणिज्य शाखा: डिझाइन क्षेत्रातील ब्रँड डिझाइन, डिझाइन मॅनेजमेंट, सिस्टम आणि सर्विस डिझाइन आणि रिटेल एक्सपिरियंस डिझाइन यांसारख्या क्षेत्रांसाठी वाणिज्य शाखेचा उपयोग होतो. कारण या शाखेत बाजारपेठेचे ज्ञान, बदलणारे ट्रेंडस आणि ग्राहकांची गरज समजण्यावर भर दिला जातो.

काही संस्थामध्ये नवीन शिक्षण प्रणालीच्याआधारे विद्यार्थ्याना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. त्यामुळे विज्ञान, कला आणि वाणिज्य अशी विभागणीच केली जात नाही. हा डिझाइन शिक्षणाच्या दृष्टीने एक सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे.

(लेखक भारतीय प्रौद्यगिकी संस्थान (IIT) बॉम्बे मधून डिझाइनमध्ये पदव्युत्तर असून त्यांना कॉर्पोरेट व शिक्षण क्षेत्रात २८ वर्षाहून अधिक अनुभव आहे.)

kiran.sabnis123@gmail.com