आशुतोष शिर्के,  रश्मी पटवर्धन 
कलेचं अंग आहे, पण तंत्रज्ञानही आकर्षित करते? इंजिनीअरिंग करायचे आहे, पण केवळ यंत्रे आणि गणितापुरते मर्यादित राहायचे नाही? संगणकशास्त्राबरोबरच मानवी वर्तन, सर्जनशीलता आणि समाज समजून घ्यायचा आहे? तर डिझाइन ही या सगळ्यांना जोडणारी तुमची नवी वाट ठरू शकते.

एखादी वस्तू सुंदर असावी, उपयोगी असावी आणि टिकाऊही असावी, या तीन अपेक्षांच्या मध्ये कधीकाळी कला, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाची वेगवेगळी क्षेत्रे होती. कलाकार सौंदर्याचा विचार करायचा, अभियंता कार्यक्षमतेचा आणि तंत्रज्ञ उत्पादनाचा. आज मात्र या सीमारेषा झपाट्याने पुसट होत आहेत. या तिन्हींच्या संगमावर एक नवे क्षेत्र उभे आहे – ‘रचना’ किंवा ‘डिझाइन’!

डिझाइन म्हणजे केवळ एखादी वस्तू आकर्षक दिसण्यासाठी तिचे रूप ठरवणे नव्हे. एखादी वस्तू, सेवा किंवा तंत्रज्ञान माणूस कसे वापरेल, त्याचा अनुभव काय असेल, त्याच्या गरजा आणि अडचणी कोणत्या असतील आणि त्याचे नवीन पद्धतीने निराकरण कसे करता येईल, याचा विचार म्हणजे ‘आधुनिक डिझाइन’.

जगातील आघाडीच्या डिझाइन संस्थांना अलीकडे प्राप्त होत चाललेलं महत्त्व हे या बदलाचे प्रतिबिंब आहे. काही उदाहरणांच्या सहाय्याने हे समजून घेऊ. लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ आर्टमधील ‘इंटेलिजंट मोबिलिटी’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम केवळ वाहनांच्या आकाराचा किंवा रचनेचा विचार करत नाही. हा अभ्यासक्रम, स्वयंचलित प्रणाली, तंत्रज्ञानातील बदल, माणूस-मशीन संबंध आणि भविष्यातील वाहतुकीच्या आव्हानांचा विचार करून विद्यार्थ्यांना व्यापक गतिशीलतेची नवी उत्तरे शोधायला शिकवतो.

नेदरलँड्समधील ‘डेल्फ्ट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी’ हे डिझाइन आणि अभियांत्रिकीच्या संगमाचे आणखी महत्त्वाचे उदाहरण आहे. तेथील इंडस्ट्रियल डिझाइन इंजिनीअरिंगमध्ये ‘इंटिग्रेटेड प्रॉडक्ट डिझाइन’, ‘डिझाइन फॉर इंटरॅक्शन’ आणि ‘स्ट्रॅटेजिक प्रॉडक्ट डिझाइन’ अशा विविध दिशांनी अभ्यास करता येतो. म्हणजे उत्पादन कसे तयार करायचे याबरोबरच ते माणसाच्या वापराशी, वर्तनाशी आणि व्यवसायाशी कसे जोडले जाईल, याचाही विचार होतो.

मिलानमधील ‘पॉलिटेक्निको दि मिलानो’ मध्ये ‘प्रॉडक्ट सर्व्हिस सिस्टिम डिझाइन’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. येथे उत्पादन, सेवा, संवाद, डिजिटल माध्यमे आणि अनुभव यांना एकत्रित करून नव्या आणि शाश्वत उपायांची निर्मिती शिकवली जाते. विद्यार्थ्यांना ‘मानवकेंद्री’ संशोधन, सहभागात्मक पद्धती, आणि माहितीच्या आधारे डिझाइन आणि उद्योजकतेचा परिचय करून दिला जातो.

फिनलंडमधील ‘आल्टो विद्यापीठ’ आणखी एक वेगळी वाट दाखवते. या विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ आर्ट्स, डिझाइन अँड आर्किटेक्चर’ मध्ये कला, डिझाइन, माध्यमे, वास्तुकला आणि तंत्रज्ञान यांचे परस्परसंबंध अभ्यासले जातात. त्यांचा ‘डिझाइन अँड मीडिया’ अभ्यासक्रम कला, माध्यमे आणि तंत्रज्ञान यांच्या आंतरशाखीय अभ्यासावर भर देतो.

चीनमध्येही डिझाइन शिक्षणाने पारंपरिक चौकट ओलांडली आहे. ‘चायना अकॅडमी ऑफ आर्ट’ मधील स्कूल ऑफ डिझाइन अँड इनोव्हेशन मधील अभ्यासक्रमांची एकूण रचनाच कला, तंत्रज्ञान आणि व्यवसाय यांच्या एकत्रित विचार करण्यावर आधारलेली आहे. ह्या विद्यापीठाचे ‘आर्ट अँड टेक्नॉलॉजी’ आणि ‘डिजिटल मीडिया आर्ट’सारखे अभ्यासक्रम पाहिल्यास ही विचारांची दिशा स्पष्टपणे जाणवते.

ऑस्ट्रेलियातील ‘आरएमआयटी’ मध्ये औद्योगिक डिझाइनचा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. त्यात उत्पादनाबरोबर सेवा आणि अनुभव यांचाही मानवकेंद्री दृष्टिकोनातून विचार केला जातो. या शिक्षणातून उत्पादन आणि उत्पादनक्षेत्र, सल्लागार संस्था, सेवा, मनोरंजन, शिक्षण आणि संशोधन अशा विविध क्षेत्रांत नव्या करिअर-संधी उपलब्ध होतात.

म्हणूनच आज डिझाइनचे जग केवळ ‘चित्र काढणे’ किंवा ‘वस्तूचे रूप ठरवणे’ इतके उरलेले नाही असे म्हणावेसे वाटते. औद्योगिक डिझाइन, उत्पादन डिझाइन, अनुभव आणि संवाद डिझाइन, युजर एक्स्पिरियन्स डिझाइन, सर्व्हिस डिझाइन, सिस्टिम डिझाइन, मोबिलिटी डिझाइन, कम्प्युटेशनल डिझाइन, कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, सस्टेनेबल डिझाइन आणि सोशल इनोव्हेशन अशा अनेक दिशा त्यातून विकसित होत आहेत.

या बदलाकडे भारतीय विद्यार्थ्यांनीही नव्या नजरेने पाहण्याची गरज आहे. कदाचित भविष्यात ‘तुम्ही कला शिकलात की अभियांत्रिकी?’ असा प्रश्न राहणार नाही. प्रश्न असेल, या दोन्हींच्या संगमातून तुम्ही काय नवे निर्माण करू शकता? याच भविष्यातील प्रश्नाला आकार देणारे शिक्षण म्हणजे अर्थातच डिझाइन!

गाड्यांच्या स्केचपासून ट्रान्सपोर्टेशन डिझाइनच्या जगात

नाशिकचा गणेश पटवर्धन लहानपणापासूनच गाड्यांकडे आकर्षित होत असे. रस्त्यावर एखादी नवी गाडी दिसली की तिचे बारकाईने निरीक्षण करायचे आणि घरी गेल्यावर तिचे हुबेहूब स्केच काढायचे, हा त्याचा छंद. पुढे कार मॅगझिन्समधून भारतात क्वचितच दिसणाऱ्या गाड्यांची छायाचित्रे आणि त्यांची डिझाइन्स पाहून तो त्यांचीही चित्रे काढू लागला. हळूहळू केवळ पाहिलेल्या गाड्यांची चित्रे काढण्यापासून स्वतःच्या कल्पनेतून गाड्यांची डिझाइन्स तयार करण्यापर्यंत त्याचा प्रवास झाला.

दहावीनंतर डिझाइनमधील ही आवड त्याने गांभीर्याने जोपासण्यास सुरुवात केली. दोन वर्षांच्या फाउंडेशन कोर्सला प्रवेश घेतानाच बारावी पूर्ण करण्यासाठी त्याने कॉमर्स शाखेतून अकरावी-बारावीचे शिक्षण घेतले. बारावीनंतर प्रवेश परीक्षा देऊन गणेशने पुण्यातील विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमधील चार वर्षांच्या ‘बॅचलर इन प्रॉडक्ट डिझाइन’ अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवला.

अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात सिंगापूरच्या ‘नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये’ तीन महिन्यांची संशोधन इंटर्नशिप करण्याची संधी गणेशला मिळाली. स्वयंचलित टॅक्सीच्या रचनेशी संबंधित संशोधनावर काम करताना मोशन ग्राफिक्स आणि वाहनाच्या अंतर्गत रचनेवरही काम करण्याची संधी त्याला मिळाली. या अनुभवाने ऑटोमोबाइल डिझाइनकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक केला.

पदवी घेतल्यानंतर गणेशने पुण्यातील सिट्रिन इंजिनिअरिंगमध्ये दोन वर्षे काम केले. नामांकित कंपन्यांसाठी बस आणि ट्रकच्या डिझाइनवर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव त्याला येथे मिळाला. नोकरी करत असतानाच पुढील शिक्षणासाठी अमेरिका, जर्मनी आणि इटलीमधील विविध अभ्यासक्रमांचा त्याने शोध घेतला. अखेर इटलीतील ‘इस्तितुतो युरोपेओ दि डिझाइन’ (IED)चा ट्रान्सपोर्टेशन डिझाइनमधील अभ्यासक्रम त्याला विशेष योग्य वाटला. पोर्टफोलिओच्या आधारे गणेशला ट्यूशन फीमध्ये ५० टक्के शिष्यवृत्तीही मिळाली.

रस्त्यावर दिसणाऱ्या गाड्यांची स्केचेस काढण्याच्या बालपणीच्या छंदापासून सुरू झालेला गणेश पटवर्धनचा प्रवास आता आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रान्सपोर्टेशन डिझाइन च्या उच्च-शिक्षणापर्यंत पोहोचला आहे. भविष्यातील वाहनांच्या डिझाइनच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्याचे त्याचे ध्येय आहे.