विपुल हळदणकर
भारतीय संस्कृतीमध्ये कलेला केवळ मनोरंजनाचे साधन मानले गेले नाही, तर ती अंतिम सत्याकडे नेणारी आणि अमूर्त दैवत्वाला मूर्तिमंत रूप देणारी एक प्रगल्भ साधना मानली गेली आहे. ‘अमूर्ताला मूर्तात आणणे’ आणि निष्प्राण दगडाला भावपूर्ण बनवणे, हीच भारतीय मूर्तिकलेची खरी ओळख आहे. यातील करिअर संधी जाणून घेऊ…
एका बाजूला हाताने घडवलेला अप्रतिम कलात्मक आकार आणि दुसर्या बाजूला त्या आकारामागील गूढ, आध्यात्मिक व नक्षीदार निकष म्हणजेच मूर्तिकला आणि मूर्तिशास्त्र यांचा सुंदर मिलाफ होय.
मूर्तिकला म्हणजे केवळ शिल्पकाराची वैयक्तिक कल्पकता नव्हे, तर तिला शास्त्राची भक्कम जोड असते. देवतांची रूपे, त्यांची शक्ती आणि त्यांचे कार्य कसे दर्शवावे, याचे अचूक नियम सांगणारे शास्त्र म्हणजेच मूर्तिशास्त्र (प्रतिमाविज्ञान). मानसार, मयमतम्, विष्णुधर्मोत्तर पुराण आणि शिल्परत्न या ग्रंथांमध्ये या संदर्भातील सविस्तर नियम दिले आहेत.
तालमान पद्धती-मूर्तीचे अवयव योग्य प्रमाणात असण्यासाठी चेहर्याच्या लांबीला ह्य्एक तालह्ण मानून नवताल (९ पट) किंवा दशताल (१० पट) प्रमाणावर आधारित मूर्ती घडवल्या जातात. यासोबतच आसने व भंगी हा देखील एक प्रकार आपल्याला दिसतो .समस्थानक (स्थैर्य), त्रिभंग (सौंदर्य व गतिशीलता), आणि आलिढ (योद्ध्याची मुद्रा) यांसारख्या भंग्यांमधून मूर्तीचा स्वभाव व्यक्त होतो.
हस्तमुद्रा व आयुधे पाहता ,अभय आणि वरद यांसारख्या मुद्रा भक्तांना धीर व आशीर्वाद देतात, तर विष्णूचे चक्र किंवा शंकराचा त्रिशूल ही केवळ शस्त्रे नसून विश्वातील गूढ शक्तींची रूपके आहेत.
प्राचीन शिक्षणपद्धती
प्राचीन भारतात मूर्तिकला आणि मूर्तिशास्त्राचे शिक्षण हे केवळ पुस्तकी शिक्षण नाही तर ते गुरू-शिष्य परंपरेतून आणि प्रात्यक्षिकांवर आधारित दिले जाते. शिल्पकाराला केवळ हाताचे कौशल्य पुरेसे नसून त्याला भूमिती, गणित, वेद, आणि ग्रंथांमधील ध्यान-श्लोकांचे परिपूर्ण ज्ञान असणे अनिवार्य आहे .
आधुनिक काळातील प्रासंगिकता
आजच्या आधुनिक युगातही डिझाइन, वास्तुकला आणि ललित कलेच्या क्षेत्रात भारतीय मूर्तिकलेचे सिद्धांत अत्यंत मार्गदर्शक ठरतात. आपल्या प्राचीन शिल्पकलेचा आणि शिक्षणाचा हा वारसा जपणे आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपल्या संस्कृतीच्या संवर्धनासाठी अत्यंत गरजेचे आहे.
भारतीय मूर्तिकला, मूर्तिशास्त्र (आयसोनोग्राफी) आणि शिल्पकलेचे उच्च शिक्षण घेण्यासाठी भारतात आणि महाराष्ट्रात अनेक प्रतिष्ठित शासकीय तसेच निमशासकीय संस्था उपलब्ध आहेत. पूर्वीची ह्य्गुरु-शिष्य परंपराह्ण आजच्या काळात औपचारिक शिक्षण संस्था, कला महाविद्यालये आणि पारंपारिक शिल्पशाळा यांच्या स्वरूपात कार्यरत आहे.
पारंपारिक मंदिर शिल्पकला आणि मूर्तिशास्त्राचे प्रशिक्षण
जर तुम्हाला मंदिरे, ऐतिहासिक दगडी मूर्ती, आणि प्राचीन मूर्तिशास्त्राचे प्रत्यक्ष ज्ञान हवे असेल, तर यासाठी स्वतंत्र पारंपारिक शाळा आहेत:
महाबलीपुरम शिल्पकला शाळा, के.पी.जे.प्रभू आर्ट बंगळुरू(गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड स्कल्प्चर)
ही भारतातील अत्यंत महत्त्वाची आणि एकमेव शासकीय संस्था आहे, जिथे प्राचीन दक्षिण भारतीय मंदिर स्थापत्य, पल्लव व चोल शैलीतील पाषाण कोरीवकाम, आणि कांस्य मूर्ती ओतण्याचे तंत्र थेट पारंपरिक शिल्पगुरूंमार्फत शिकवले जाते.
देशातील विविध शिल्प गुरुकुले आणि स्टुडिओ
दक्षिण भारतात (विशेषत: तामिळनाडूतील स्वाममलई) आणि महाराष्ट्रात आजही अनेक पारंपरिक शिल्पकार घराणी आहेत, जी तरुण कलाकारांना आपल्या कार्यशाळेत प्रत्यक्ष प्रशिक्षण देतात.
प्रवेश प्रक्रिया आणि पात्रता
पदवी अभ्यासक्रम (बीएफए – स्कल्प्चर) :
पात्रता : १२ वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा, कला शाखेला प्राधान्य). काही महाविद्यालयांसाठी प्रवेशपूर्व कला पात्रता परीक्षा (आर्ट ॲप्टिट्यूड टेस्ट / सीईटी) उत्तीर्ण करावी लागते.
* कौशल्याची चाचणी : प्रवेशासाठी रेखाटन आणि मातीकाम यांची परीक्षा घेतली जाते.
पदव्युत्तर अभ्यासक्रम (एमएफए) :
संबंधित विषयात बीएफए पूर्ण केलेले विद्यार्थी शिल्पकलेच्या विशिष्ट विभागात (उदा.स्टोन, मेटल, वूड का्र्हिहंग) विशेष प्राविण्य मिळवू शकतात.
भारतीय मूर्तिशास्त्राचे पुनरुज्जीवन
भारतीय मूर्तिकला आणि मूर्तिशास्त्र ही केवळ भूतकाळातील वैभवशाली संस्कृतीची किंवा वस्तुसंग्रहालयात ठेवण्याची गोष्ट नाही. ज्या पद्धतीने, ज्या शिस्तीने आणि ज्या भावपूर्णतेने हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वज शिल्पकारांनी दगड-धातूंमध्ये प्राण फुंकले, तीच कला आजच्या आधुनिक काळातही तशीच जिवंत ठेवता येऊ शकते आणि आजही तितक्याच श्रेष्ठ दर्जाची निर्मिती शक्य आहे.
परंतु, ही प्राचीन परंपरा आजच्या काळात हुबेहूब आणि तितक्याच समर्थपणे आत्मसात करण्यासाठी एकाच गोष्टीची नितांत गरज आहे ती म्हणजे अतुलनीय आणि कठोर रियाज (सततचा सराव व साधना).
भारतीय मूर्तिकला ही कालबाह्य झालेली विद्या नसून ती एक अमर साधना आहे. आजच्या २१व्या शतकातही आपण हजार वर्षांपूर्वीसारखी भव्य, भावपूर्ण आणि जिवंत शिल्पे नक्कीच निर्माण करू शकतो. त्यासाठी गरज आहे ती फक्त – प्राचीन शास्त्रांवर अढळ श्रद्धा, हातांचे अखंड कौशल्य आणि दिवसातील तासनतास समर्पित करणारा ‘कठोर सराव’.
vipulhaldankar111@gmail.com
(लेखक चित्रकार, शिल्पकार, मूर्ती संवर्धक आहेत.)
