– आशुतोष शिर्के, रश्मी पटवर्धन
साउंड इंजिनियरिंग म्हणजे ध्वनीची निर्मिती, त्यावरील प्रक्रिया आणि सादरीकरण यांचे शास्त्रशुद्ध व सर्जनशील व्यवस्थापन. चित्रपट, मालिका, संगीत कार्यक्रम, स्टुडिओ रेकॉर्डिंग, रेडिओ, पॉडकास्ट, गेमिंग आणि थेट कार्यक्रमांमध्ये दर्जेदार ध्वनी पोहोचवण्याची जबाबदारी साउंड इंजिनीअरची असते. मायक्रोफोनची निवड, रेकॉर्डिंग, मिक्सिंग, एडिटिंग आणि साउंड डिझाइन या सर्व टप्प्यांवर तो काम करतो. तांत्रिक ज्ञानासोबतच संगीताची जाण, संवेदनशीलता आणि सर्जनशील दृष्टी या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे साउंड इंजिनीअरिंग ही विज्ञान आणि कलेचा संगम असलेली व्यावसायिक शाखा आहे.साउंड इंजिनीअरिंग, ध्वनीमुद्रण आणि म्युझिक प्रॉडक्शन ही क्षेत्रे आज जागतिक पातळीवर वेगाने विस्तारत आहेत. चित्रपट, वेबमालिका, ओटीटी, लाइव्ह म्युझिक, गेमिंग आणि पॉडकास्टिंग यांच्या वाढत्या प्रभावामुळे प्रशिक्षित ध्वनीतज्ज्ञांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यामुळे या क्षेत्रात सखोल आणि दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याकडे अनेक विद्यार्थ्यांचा कल वाढताना दिसतो.
या क्षेत्रातील आघाडीच्या संस्थांमध्ये अमेरिकेतील बर्कली कॉलेज ऑफ म्युझिक हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. संगीत, ऑडिओ प्रॉडक्शन आणि साउंड इंजिनीअरिंगमधील व्यावसायिक अभ्यासक्रम, अत्याधुनिक स्टुडिओ सुविधा आणि उद्योगातील दिग्गजांशी थेट संपर्क ही या संस्थेची जमेची बाजू आहे. त्याचप्रमाणे फुल सैल युनिव्हर्सिटी (अमेरिका) ही संस्था ऑडिओ इंजिनीअरिंग आणि एंटरटेनमेंट टेक्नॉलॉजीसाठी विशेष ओळखली जाते. मात्र अमेरिकेतील शिक्षण तुलनेने खर्चिक ठरू शकते.ब्रिटनमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सरी हे ‘टोनमायस्टर’ आणि साउंड रेकॉर्डिंग अभ्यासक्रमांसाठी जागतिक स्तरावर मान्यता पावलेले विद्यापीठ आहे. तसेच एसएई इन्स्टिट्यूट ही संस्था युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीसह अनेक देशांत कार्यरत असून ऑडिओ प्रॉडक्शन आणि साउंड डिझाइनमध्ये व्यावहारिक प्रशिक्षण देते.
ऑस्ट्रेलियातील आरएमआयटी युनिव्हर्सिटी आणि जेएमसी अकॅडमी या संस्था सर्जनशील माध्यमांतील अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध आहेत. येथे तांत्रिक शिक्षणासोबत उद्योगाभिमुख प्रकल्पांवर भर दिला जातो.युरोपमध्ये स्पेनमधील बर्कली कॉलेज ऑफ म्युझिक, व्हॅलेन्सिया हे अमेरिकेपेक्षा तुलनेने किफायतशीर पर्याय मानले जाते. जर्मनी आणि नेदरलँड्समधील काही सार्वजनिक विद्यापीठे कमी शुल्कात ध्वनीविषयक अभ्यासक्रम देतात; मात्र प्रवेश प्रक्रिया स्पर्धात्मक असते.
आशियामध्ये मलेशियातील इंटरनॅशनल कॉलेज ऑफ म्युझिक (बर्कली संलग्न) हे आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या पर्यायांपैकी एक आहे. तसेच सिंगापूरमध्येही मीडिया आणि ऑडिओ तंत्रज्ञानाशी संबंधित विशेष डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.अभ्यासक्रम निवडताना केवळ संस्थेची कीर्ती नव्हे, तर स्टुडिओ सुविधा, उद्योगसंपर्क, इंटर्नशिपच्या संधी, अभ्यासक्रमातील तांत्रिक व सैद्धांतिक समतोल आणि एकूण खर्च यांचा विचार करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती, अर्धवेळ कामाच्या संधी आणि अभ्यासानंतरच्या रोजगारपर्यायांची माहिती घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य संस्थेची निवड केल्यास ध्वनीच्या या सर्जनशील आणि वैज्ञानिक विश्वात जागतिक स्तरावर काम करण्याची दारे खुली होऊ शकतात.
प्रशिक्षित साउंड इंजिनीअर खालील प्रमुख भूमिका विविध माध्यमांमध्ये पार पाडू शकतो :
रेकॉर्डिंग इंजिनीअर – स्टुडिओमध्ये ध्वनीमुद्रण, मायक्रोफोनची मांडणी आणि रेकॉर्डिंगची जबाबदारी.
मिक्सिंग व मास्टरिंग इंजिनीअर – संगीत, संवाद आणि ध्वनी संतुलित करून अंतिम दर्जा देणे.
साउंड डिझायनर – चित्रपट, वेबमालिका, गेम्ससाठी नव्या ध्वनींची निर्मिती.
लाइव्ह साउंड इंजिनीअर – संगीत मैफिली, नाट्यप्रयोग व थेट कार्यक्रमांचा ध्वनी सांभाळणे.
पॉडकास्ट व रेडिओ प्रोड्युसर – ध्वनिमुद्रण, संपादन आणि कार्यक्रम निर्मिती.
गेम व इंटरॲक्टिव्ह ऑडिओ इंजिनीअर – व्हिडिओ गेम्स, व्हीआर/एआरसाठी ध्वनी डिझाइन.
स्टुडिओ / तांत्रिक संचालक – स्टुडिओ संचालन, उपकरणे व तांत्रिक पथकाचे व्यवस्थापन.
ही विविधता साउंड इंजिनीअरिंगला एक सर्जनशील आणि जागतिक संधी असलेले क्षेत्र बनवते.
संगीतामागील कलाकार : साउंड इंजिनियर साहस
लहानपणी गिटार हातात घेऊन रॉकस्टार होण्याचं स्वप्न अनेक मुलं पाहतात. साहस सरिता बाला यानेही ते स्वप्न पाहिलं. शालेय जीवनातच त्याची संगीताची ओढ ओळखून आई-वडिलांनी गिटारचे धडे सुरू केले. मात्र कालांतराने गिटार वादनापेक्षा संगीतामागची तांत्रिक आणि सर्जनशील बाजू—साउंड इंजिनियरिंग—त्याला अधिक आकर्षित करू लागली.कला-संगीताची गाढ आवड असलेल्या आईवडिलांनी साहसच्या या वेगळ्या निवडीला मनापासून पाठिंबा दिला. बारावीनंतर मुंबईत साउंड रेकॉर्डिस्टचा एक खासगी सर्टिफिकेट कोर्स करण्याचा निर्णय त्याने घेतला. कोर्सला औपचारिक मान्यता नसली तरी प्रत्यक्ष कामाचा मोलाचा अनुभव त्यातून मिळाला. याच दरम्यान ‘एमटीव्ही अनप्लग्ड’सारख्या प्रतिष्ठित कार्यक्रमात सहाय्यक म्हणून काम करताना ए.आर. रहमान यांसारख्या दिग्गजांची कामाची शिस्त, तयारी आणि दृष्टी त्याला जवळून अनुभवता आली.
हा अनुभव रोमांचक असला तरी आपलं ज्ञान अपुरं असल्याची जाणीव साहसला झाली. या क्षेत्रात खोलवर जाण्याची गरज ओळखून त्याने पुढील शिक्षणाचा शोध सुरू केला. जवळपास वर्षभर आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांची माहिती घेतल्यानंतर, कौलालंपूर येथील बर्कली संलग्न ‘इंटरनॅशनल कॉलेज ऑफ म्युझिक’मधील दीड वर्षांचा ‘सर्टिफिकेट इन ऑडिओ प्रॉडक्शन’ अभ्यासक्रम त्याने निवडला.या अभ्यासक्रमातून डिजिटल ऑडिओ, लाइव्ह साउंड, ऑडिओ प्रॉडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, साउंड डिझाइन तसेच संगीताचा इतिहास आणि सैद्धांतिक अभ्यासाची भक्कम बैठक मिळाली. उद्योगातील व्यावसायिकांशी सातत्याने संवाद साधण्यामुळे त्याचा दृष्टिकोन अधिक परिपक्व झाला असून, आज तो भारतातील विविध लाइव्ह म्युझिक इव्हेंट्समध्ये आत्मविश्वासाने साउंड व्यवस्थापन सांभाळत आहे.
शिक्षणातील संस्कृतीचा फरक
भारतात अलीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी प्रशिक्षकांसह अनेक साउंड इंजिनीअरिंग संस्था उभ्या राहत आहेत. देशातील सशक्त आणि सतत विस्तारत जाणारा संगीतउद्योग विद्यार्थ्यांना विविध व्यावहारिक संधी उपलब्ध करून देतो. तरीही परदेशी विद्यापीठांची खरी ताकद त्यांच्या शिक्षणसंस्कृतीत दडलेली आहे. येथे शिक्षण केवळ उपकरणे हाताळण्यापुरते मर्यादित न राहता, मुक्त प्रयोग, विचारमंथनात्मक चर्चासत्रे, सहकार्यात्मक प्रकल्प आणि वैयक्तिक अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या प्रक्रियेतून पुढे जाते. सर्जनशीलतेला केंद्रस्थानी ठेवणारे हे वातावरण विद्यार्थ्यांना ध्वनीकलेचा सखोल आणि विचारपूर्वक शोध घ्यायला प्रवृत्त करते. परिणामी साउंड इंजिनियरिंग हे केवळ तांत्रिक कौशल्य न राहता, ध्वनीची जाण, सौंदर्यदृष्टी आणि कलात्मक कारागिरी विकसित करणारी एक समग्र आणि संवेदनशील कला म्हणून आकार घेते.

