गौरव काईंगडे

मातीची भांडी तयार करण्याची परंपरा भारतात हजारो वर्षांपासून आहे. मात्र आज हीच परंपरा आधुनिक स्टुडिओ पॉटरीच्या माध्यमातून नव्या पिढीसाठी सर्जनशील करिअरचे दालन उघडत आहे. एकेकाळी पारंपरिक व्यवसाय म्हणून ओळखली जाणारी पॉटरी आज उद्योजकता, डिझाइन आणि अनुभवाधारित अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनली आहे. अनेक तरुण-तरुणी कॉर्पोरेट जॉब सोडून पॉटरी क्षेत्रामध्ये येत आहेत.

स्टुडिओ पॉटरी ही कलाकाराच्या कल्पकतेतून, सौंदर्यदृष्टीतून आणि प्रयोगशीलतेतून विकसित झालेली आधुनिक कलाशाखा आहे. येथे प्रत्येक कलाकृती ही केवळ वापरासाठी बनविलेली वस्तू नसून ती कलाकाराच्या विचारांची आणि सर्जनशीलतेची अभिव्यक्ती असते. ही सर्जनशीलता डिझाइन, हस्तकौशल्य, वैयक्तिक अभिव्यक्ती आणि उद्योजकता यांचा संगम असलेली कलाशाखा आहे. त्यामुळे एकाच आकाराच्या शेकडो वस्तू तयार करण्यापेक्षा प्रत्येक वस्तूला स्वतंत्र ओळख असते. या क्षेत्रात कलाकाराला पारंपरिक चौकटींपलीकडे जाऊन विविध प्रकारच्या माती, पोत, आकार, रंगछटा, ग्लेझ प्रयोग आणि फायरिंग तंत्रांवर प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य असते.

बाजारपेठेतील मागणी

बाजारपेठेत पर्यावरणपूर्वक उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत आहे. आधुनिक घरांच्या सजावटीमध्ये हॅन्डमेड होमडेकोर प्रॉडक्ट्स, दैनंदिन वापरातील किचनवेअर्स, होम गार्डनिंग प्रॉडक्ट्स यांना बाजारपेठेत मोठी लोकप्रियता मिळत आहे. रिसॉर्ट्स, हॉटेल्स, कॅफे तसेच उच्च दर्जाच्या निवासी प्रकल्पांमध्ये हस्तनिर्मित पॉटरीला मानाचे स्थान मिळत आहे. इतकेच नव्हे तर मातीचे दागिने वापरण्याची क्रेझ महिलांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परदेशांतील भारतीय ऑनलाइन खरेदीच्या निमित्ताने का होईना पण भारतीय कारागिरांशी आपसूक जोडले जातात.

डिजिटल बाजारपेठ

सोशल मीडियाच्या माध्यमातून पॉटरी कलाकारांसाठी एक नवी डिजिटल बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. ही बाजारपेठ फक्त उत्पादन खरेदी-विक्रीपूर्ती मर्यादित न राहता आज कोणत्याही माध्यमात काम करणार्‍या कलाकारांना स्वतंत्र प्रेक्षकवर्ग उपलब्ध झाला आहे. आपल्या कामातील तांत्रिक गोष्टी प्रेक्षकवर्गाशी शेअर करून आपली कारागिरी जगभरातील लोकांपर्यंत पोचवू शकतो. व्हील थ्रोइंग, भट्टीतील फायरिंग, क्ले तयार करण्याची प्रक्रिया, ग्लेझ प्रयोग यांसारख्या विषयांचे सविस्तर मार्गदर्शक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करुन त्यातून नियमित पॅसिव्ह इनकम मिळवू शकतो. आजचा पॉटर हा केवळ कारागीर न राहता तो कंटेंट क्रिएटर, प्रशिक्षक आणि ब्रँड ओनर म्हणूनही ओळख निर्माण करू शकतो. स्थानिक बाजारपेठेसोबतच सोशल मीडिया आणि इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा ताळमेळ साधुन आज कारागिराला बाजारपेठेतील कोणत्याही मध्यस्थांवर अवलंबून न राहता स्वत:चे ब्रॅण्डिंग घेऊन बाजारपेठेत ताठ मानेने वावरता येते.

प्रक्रियेचे भावनिक मूल्य

आजचा ग्राहक केवळ तयार वस्तू खरेदी करू इच्छित नाही, तर स्वत:च्या हातांनी काहीतरी घडवण्याचा अनुभव शोधत आहे. त्यामुळे कपल ॲक्टिव्हिटी, वाढदिवस, फ्रेंड्स मीटअप्ससाठी पॉटरी फन ॲक्टिव्हिटीज लोकप्रिय होत आहेत. सोशल मीडियामुळे या ट्रेंडला अधिक चालना मिळाली असून, यामध्ये तयार उत्पादनापेक्षा प्रक्रियेचे मूल्य जास्त आहे. स्वत: बनवलेला कॉफी मग किंवा पॉट भावनिक मूल्य निर्माण करतो. पॉटरी व्हीलवर क्ले फिरताना स्लो मोशन व्हिडिओज हा आजचा ट्रेंडी सोशल मीडिया कन्टेन्ट बनला आहे. अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये क्ले आर्ट आणि क्राफ्ट वर्कशॉप आयोजित केले जातात. कॉर्पोरेट क्षेत्रातही पॉटरी वर्कशॉप्सचा वापर कर्मचार्‍यांमधील ताणतणाव कमी करण्यासाठी मेंटल हेल्थ थेरपी म्हणून केला जात आहे. या कंपन्या अशा कार्यशाळांसाठी पॉटर्सना आकर्षक मानधन देण्यासही तयार असतात. मोठ्या शहरांमध्ये तर पॉटरी क्लासेसना भरपूर लोकप्रियता मिळत आहे.

भारतातील पॉटर्स मार्केट

भारतात भोपाळ, मुंबई, लखनऊ, दिल्ली तसेच इतर अनेक शहरांमध्ये नियमितपणे पॉटर्स मार्केट आयोजित केले जातात. या बाजारांमध्ये टेराकोटा, स्टोनवेअर, पोर्सेलीन माध्यमांमध्ये काम करणारे समकालीन पॉटरी कलाकार आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन आणि विक्री करतात. आज भारतातील पॉटर्स मार्केट हे समकालीन पॉटरी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक तसेच व्यावसायिक चळवळ बनले आहे.

शिक्षण आणि व्यवसायासाठी शासकीय पाठबळ

  • भारत सरकारच्यावतीने खादीग्रामोद्योग, स्किल इंडिया तसेच विकास आयुक्त (हस्तशिल्प) मार्फत या कामाचे मोफत प्रशिक्षण.
  • हस्तशिल्प विभागाकडून तर कारागिरांची कला लोकांसमोर आणण्यासाठी संपूर्ण भारतभर हस्तकला प्रदर्शने आयोजित करून यामध्ये सहभागी होण्यासाठी कारागिरांना मोफत संधी दिली जाते. इतकेच नव्हे तर आपली उत्पादने एक्स्पोर्ट करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन दिले जाते.
  • स्टुडिओ पॉटरी अगदी चार ते पाच लाख इतक्या क्षुल्लक गुंतवणुकीमध्ये सुरू करता येणारा व्यवसाय असुन मुद्रा लोन, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम येाजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम येाजना, ग्रामीण रोजगार निर्मिती योजना यासारख्या अनेक अनुदान असणार्‍या कर्ज योजना उपलब्ध आहेत.
  • पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत कौशल्य प्रशिक्षण, टूलकिट खरेदीसाठी रु.१५,०००/- चे ई-व्हाऊचर, विद्यावेतन, तसेच अगदी किरकोळ व्याजदरात कर्ज उपलब्ध आहे.

terracotta.journey@gmail.com
(लेखक १२ वर्षांपासून पॉटरी क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या केंद्रीय वस्रोद्योग मंत्रालयाच्या विकास आयुक्त (हस्तकला) कार्यालयाच्या पॅनेलवर डिझायनर म्हणून कार्यरत आहेत.)