* नमस्कार, माझा मुलगा आता इयत्ता ९ वीमध्ये शिकत आहे. लहानपणापासून त्याला चित्रकलेची आवड आहे. त्याने एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत ए ग्रेड मिळवली आहे. यावर्षी तो इंटरमिजिएट परीक्षा देणार आहे. त्याला इयत्ता ८ वीमध्ये ६० टक्के गुण मिळाले आहेत. तसेच त्याला सायकलिंगची आवड असून तो विविध खासगी सायकलिंग स्पर्धांमध्ये भाग घेतो. आमचे आरक्षण राज्यात विशेष मागास प्रवर्ग व केंद्रात इतर मागासवर्गात येते. त्यामुळे आमची आर्थिक स्थिती पाहता त्याला आयटीआयमध्ये एखादा टेक्निकल कोर्स करून केंद्र सरकारच्या नेव्ही किंवा रेल्वे मध्ये नोकरीला लावण्याचा माझा विचार आहे. तसेच त्याची चित्रकलेची आवड पाहता त्यासोबतच त्याला आर्ट टिचर डिप्लोमा, कमर्शियल किंवा फाईन आर्टस क्षेत्रात शिक्षण घेऊन पुढे स्वत:चा पार्ट टाईम क्लास सुरू करावा असेही वाटते. कृपया मार्गदर्शन करावे. —योगेंद्र भोईनकर, मुंबई

— आयटीआयपेक्षा दहावीनंतर तीन वर्षांचा डिप्लोमा इंजिनीअरिंग केला, तर तो अधिक उपयोगी ठरू शकतो. त्यामुळे रेल्वे, डिफेन्स, कोस्ट गार्ड, महावितरण, परिवहन खाते, एसटी अशा विविध विभागांमध्ये संधी उपलब्ध होऊ शकतात. अर्थात, दहावीपर्यंत त्याला फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स हे विषय किती जमतात आणि आवडतात, यावर ते अवलंबून असते.अन्यथा, चित्रकलेमध्ये काही करायचे असेल, तर दहावीनंतर फाइन आर्ट्स डिप्लोमा, तसेच कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर फाइन आर्ट्सची पदवी घेणे शक्य आहे. यातून पुढे कमर्शियल आर्टिस्ट, जाहिरात क्षेत्र, चित्रकला शिक्षक, स्वत:चे चित्रकला क्लासेस अशा संधी उपलब्ध होतात. सध्या दहावीपर्यंत त्याला इंटरमिजिएट परीक्षा चांगल्या ग्रेडमध्ये उत्तीर्ण होण्याचे ध्येय ठेवू द्या. दहावी झाल्यानंतर त्याच्या त्या वेळच्या आवडीनुसार वरीलपैकी निर्णय घेता येईल.

* मी यावर्षी चार वर्षांचा बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केला. मला कृपया नर्सिंग क्षेत्रातील अधिक संधींबद्दलची माहिती द्यावी. —नीता देवकर, नबी मुंबई</p>

— बीएससी नर्सिंगनंतर तुम्हाला कोणत्याही लहान-मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करता येईल. एवढेच नाही, तर विविध महापालिकांसह शासकीय सेवेमधील संधीही उपलब्ध होऊ शकतात. दोन-तीन वर्षांचा कामाचा अनुभव घेतल्यानंतर संपूर्ण जगाची दारे तुमच्यासाठी उघडतात.

याशिवाय, हल्ली प्रोफेशनल नर्स म्हणून तुम्ही स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकता. मात्र, त्याआधी तुम्हाला दोन-तीन वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवणे आवश्यक आहे. तुम्ही नर्सिंगमधील मास्टर्स डिग्रीसुद्धा करू शकता. त्यानंतर तुम्हाला वरील सर्व संधींव्यतिरिक्त नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिकवण्याचे करिअरसुद्धा करता येईल.

‘करिअर मंत्र’साठी आवाहन

करिअर निवड, शिक्षण, स्पर्धा परीक्षा, नोकरी किंवा कौशल्य विकासाबाबत काही शंका आहेत? मुलांचे शिक्षण व करिअरबाबत पालकांच्या मनातही धाकधुक असते. करिअरच्या निर्णायक टप्प्यावर योग्य सल्ला महत्त्वाचा ठरतो. शिक्षण, करिअर निवड किंवा बदलाबाबतचे आपले प्रश्न ‘करिअर मंत्र’ सदरासाठी आवर्जून पाठवा. आपल्या प्रश्नांना अनुभवी करिअर समुपदेशक मार्गदर्शनपर उत्तर देतील. प्रश्न अगदी थोडक्यात लिहावा. विद्यार्थ्यांचे दहावी, बारावी, पदवीचे गुण, आवडी, विषयकल अवश्य सांगावेत, जेणेकरून सल्ला देताना तज्ज्ञांना तो अधिक  अचूक देता येईल. आपले प्रश्न    careerloksatta@gmail.com  या ई-मेल आयडीवर पाठवावेत. मेलच्या सब्जेक्टमध्ये ‘करिअर मंत्र’ सदराचा उल्लेख अवश्य करावा. प्रश्नाखाली, नाव आणि शहर / गावाचे नाव लिहावे.

careerloksatta@gmail.com
(लेखक बीई , एमबीए असून गेली २५ वर्षे करिअर मार्गदर्शन करत आहेत.)