१) मला दहावीला ८६.८०% होते. मी सर परशुरामभाऊ महाविद्यालय मधून सायन्स पीसीएमसी ग्रुप मधून बारावी करत आहे. तसेच एनसीसीच्या दुसऱ्या वर्षाला आहे. कृपया पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करावे.
– गायत्री पाटील, पुणे</strong>
तुम्ही १२ वी पीसीएमबी मधून करत आहात , त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राची पी सी एम सीईटी मध्ये उत्तम गुण मिळवलेत तर तुम्हाला इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रीकल्चर या क्षेत्रांमध्ये प्रवेशाची संधी आहे. याशिवाय तुम्हाला संशोधन क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर आयसर प्रवेश परीक्षा देऊन आयसरच्या सर्व संस्थांमध्ये तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस मध्ये प्रवेश मिळू शकतो, नेस्ट नावाची परीक्षा दिली तर ‘नायसर’मध्ये संशोधनासाठी प्रवेश मिळू शकतो. बारावीनंतर बायो टेक्नॉलॉजी मध्येही संशोधन संधी आहेत मात्र त्याकरीता तुम्हाला पी एच डी पर्यंत शिक्षणाची तयारी ठेवावी लागेल.
तुमची चित्रकला चांगली असेल तर नाटा नावाची परीक्षा देऊन तुम्हाला आर्किटेक्चर मध्ये प्रवेश मिळू शकतो. तुम्ही एनसीसी करत आहात म्हणजे तुम्हाला संरक्षण क्षेत्रात करीअर करण्यात रस असेल तर कोणत्याही पदवीनंतर तुम्हाला सीडीएस किंवा ॲफकॅट नावाची परीक्षा देऊन आर्मी / एअरफोर्स मध्ये अधिकारी बनण्याची संधी मिळू शकते. तुम्ही पदवी करता करता एनसीसी सुरु ठेऊन त्याची सी सर्टिफिकेशन ची परीक्षा बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालात तर तुम्हाला एन सी सी स्पेशल एन्ट्री स्कीम मधून कोणतीही लेखी परीक्षा न देता फक्त एसएसबी इंटरव्ह्यू देऊन आर्मी किंवा एअरफोर्स मध्ये अधिकारी बनण्याची संधी मिळेल.
