’ नमस्कार, माझी मुलगी मुंबई विद्यापीठातून BBA LAW हा ५ वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स करत असून ती यावर्षी चौथ्या वर्षाला आहे. तिचा आतापर्यंतचा सीजीपीए ६ आहे. तिला केंद्र आणि राज्य सरकारमध्ये तसेच रेल्वेत नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि या सर्वांसाठी कोणत्या विविध प्रवेश परीक्षा द्यावा लागतात, याची कृपया माहिती द्यावी. तसेच आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मधील संधी आणी त्यासाठीच्या प्रवेश परीक्षा याबद्दलदेखील माहिती द्यावी. अजून काही पर्याय असतील तर त्याबद्दलदेखील माहिती द्यावी. – अल्पना एम.
-भारतीय नौदलात आणि भूदलात वकिलांसाठी विशेष भरती योजना असते. लेखी परीक्षा नसते मात्र स्व्हिहस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू द्यावा लागतो. रेल्वे मध्ये सुद्धा वकिलांना संधी आहे, मात्र त्यासाठी तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेसकट विविध सरकारी बॅंकांमध्ये तसेच सेबीमध्येही वकिलांना संधी मिळते. सीबीआय, एनआयए, आयबीसह विविध केंद्रीय आस्थापनांमध्ये तसेच कायदा मंत्रालयापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सर्व ठिकाणी वकिलांना संधी मिळते, मात्र त्यासाठी थोडा अनुभव मिळवणे आवश्यक आहे. याशिवाय सर्वच पदवीधरांसाठी यूपीएससी, एमपीएससी, आयबीपीएस, रेल्वे , स्टाफ सिलेक्शन कमिशन या परीक्षांद्वारे उपलब्ध संधी वकिलांनाही उपलब्ध आहेत. याशिवाय जेएफएमसी परीक्षेच्या माध्यमातून न्यायाधीश व्हायची पण संधी मिळू शकते.
’ दोन महिन्यांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात ‘भारत-युरोपीय संघातील राजकीय संबंध’ या विषयावर माझी पीएचडी पूर्ण झाली आहे. आता पोस्ट-डॉक्टरल संशोधनासाठी भारतातील तसेच परदेशी विशेषत: युरोपीय देशांतील विद्यापीठांची निवड, प्रवेशप्रक्रिया, फेलोशिप आणि अर्जाची रणनीती याबाबत मार्गदर्शन हवे आहे. मला पाच वर्षांचा मुंबईतील विद्यापीठ-महाविद्यालयीन अध्यापनाचा अनुभव असून, ३ यूजीसी केअर, २५ पियर रिव्ह्यूड रिसर्च पेपर आणि १ पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुढील वाटचालीसाठी कोणती दिशा योग्य ठरेल?- डॉ. प्रदीप जानकर, मुंबई
-तुम्हाला पोस्ट डॉक्टरल परदेशात करायचे असेल तर त्यामागे नक्की काय उद्देश आहे हे महत्त्वाचे आहे. कारण सध्याची अस्थिर ‘जिओ पॉलिटिकल’ परिस्थिती बघता तुम्हाला नंतर तिथेच काम करायचे आहे की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परत यायचेय यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. तिथेच काम करायचं असेल तर ज्या देशात नंतर अशी शक्यता जास्त आहे आणि व्हिसा सकट अन्य प्रश्न येणार नाहीत तो देश महत्त्वाचा ठरेल, तिथल्या कोणकोणत्या विद्यापीठात संधी उपलब्ध आहेत याचा अभ्यास करुन मगच अंतिम निर्णय घ्यावा लागेल. भारतातच पोस्ट डॉक्टरल करायचे असेल तरी ते करण्यामागचा हेतू स्पष्ट होणे आवश्यक आहे, म्हणजे मग कोठे करावे हे ठरवणे सोपे पडेल.
‘करिअर मंत्र’साठी आवाहन
करिअर निवड, शिक्षण, स्पर्धा परीक्षा, नोकरी किंवा कौशल्य विकासाबाबत काही शंका आहेत? मुलांचे शिक्षण व करिअरबाबत पालकांच्या मनातही धाकधुक असते. करिअरच्या निर्णायक टप्प्यावर योग्य सल्ला महत्त्वाचा ठरतो. शिक्षण, करिअर निवड किंवा बदलाबाबतचे आपले प्रश्न ‘करिअर मंत्र’ सदरासाठी आवर्जून पाठवा. आपल्या प्रश्नांना अनुभवी करिअर समुपदेशक मार्गदर्शनपर उत्तर देतील. प्रश्न अगदी थोडक्यात लिहावा. विद्यार्थ्यांचे दहावी, बारावी, पदवीचे गुण, आवडी, विषयकल अवश्य सांगावेत, जेणेकरून सल्ला देताना तज्ज्ञांना तो अधिक अचूक देता येईल. आपले प्रश्न careerloksatta@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावेत. मेलच्या सब्जेक्टमध्ये ‘करिअर मंत्र’ सदराचा उल्लेख अवश्य करावा. प्रश्नाखाली, नाव आणि शहर / गावाचे नाव लिहावे.
