डॉ. श्रीराम गीत
मी सध्या सिव्हिल इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षांत आहे मला १० वी ला ७७.२०% आहेत आणि डिप्लोमा (सिव्हिल) ला मला ८९% आहेत. चालू शैक्षणिक वर्षांतही चांगले गुण आहेत. मला यूपीएससी द्यायची आहे, पण इंग्रजीची अडचण आहे. सध्या माझी सरळसेवेची तयारी चालू आहे, तर मी यूपीएससी अभियांत्रिकी सेवाची तयारी करू की नागरी सेवेची? त्यासाठी दिल्लीला जाण्याची गरज आहे का? आर्थिक परिस्थिती तशी बरी आहे. कृपया मार्गदर्शन करा. – सागर शिवाजी काकडे
ज्या ज्या परीक्षा तुला द्याव्याशा वाटतात त्या प्रत्येकाच्या अभ्यासाची नीट माहिती तू इंजीनियरिंगची पदवी घेऊन पास झाल्यानंतर घ्यायला सुरुवात कर. आता त्याचा विचारसुद्धा नको. तुझ्या पदवीचे मार्क आयुष्यभर तुझी सोबत करणार आहेत. एवढेच नव्हे तर एखादी नोकरी मिळण्याकरिताही त्याचाच फायदा होणार आहे. घरची परिस्थिती जरी बरी असली तरी परीक्षेच्या अभ्यासाचा एकूण आवाका समजून घेण्यापर्यंत दोन वर्षे लागतात. एखादी मिळेल ती नोकरी घेतली तर जास्त मानसिक बळ मिळते. अनेकदा घरचे प्रोत्साहन देतात, पण तीन वर्षांनी हाती काहीच लागले नाही तर विसंवाद सुरू होतो. त्यावेळी नोकरी पण मिळणे अशक्य असते. इंग्रजी हळूहळू सुधारते. ती काळजी नको, पण मोठय़ाने वाचून सुधारते.