’ माझ्या मित्राच्या नातेवाईक मुलीने कॉम्प्युटर सायन्स मध्ये बी.ई. केले आहे. परंतु मुलांचा सांभाळ करण्यासाठी तीने नोकरी अथवा संगणक क्षेत्रातील व्यवसाय केला नाही. तिचं वय आता ४६ वर्ष झाले आहे. आता तिची संगणक क्षेत्रातील व्यवसाय करायची इच्छा आहे. तरी ती कोणता व्यवसाय करू शकते व त्यासाठी सध्या कोणते कोर्सेस करणे आवश्यक आहे, याबद्दल मार्गदर्शन करावे.- आर.के.जुमळे, अकोला</p>
– संगणक क्षेत्रातील त्यांचा अनुभव व शिक्षण सध्या फारसे उपयोगी पडणार नाही. मात्र हार्डवेअर नेटवर्किंग क्षेत्रात त्यातील प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरु करणे शक्य आहे. खरं तर व्यवसाय करण्यासाठी आधीचे शिक्षण एवढाच विचार न करता एखादे नवीन कौशल्य शिकून त्यात व्यवसाय सुरु करता येऊ शकतो. शिकवण्याची आवड असेल तर सध्या पर्सनल ट्युटर ला खूप संधी आहेत. ‘पायथॉन’सारखी एखादी संगणक भाषा चांगली शिकून घेतलीत तर त्यात पर्सनल ट्युटर ची खूप गरज आहे.
’ सर नमस्कार, माझ्या मुलाने १२वी ची परीक्षा दिली आहे. त्याला दहावीत ८९ % मार्क होते. ११वी संपत आल्यावर इंजिनीअरिंग किंवा मेडिकल कोणत्याही शाखेत न जाता सायकॉलॉजी मध्ये त्याला पुढचे करिअर करायचे आहे असे ठरविले. त्यासाठी अजून कोणते पर्याय उपलब्ध आहेत याचे मार्गदर्शन करावे. मुलाचा रस संशोधन क्षेत्रात आहे असे आम्हास वाटते. फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही तर इतर पर्याय देखील सांगावेत.- शुभांगी भर्डे
सायकॉलॉजीमध्ये बारावीनंतर बीएससी आणि बीए असे दोन प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. ते अनेक महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. मात्र सायकॉलॉजीमध्ये स्वत:ची प्रॅक्टिस करण्यासाठी परवाना मिळवण्यासाठी क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये एम. फील पर्यंत शिकावे लागते आणि एम. फीलच्या जागा कमी असतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सायकॉलॉजी मध्ये पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला एमबीएसुद्धा करता येते, ज्यात एमबीए एच आर हे स्पेशलायझेशन त्याला सायकॉलॉजीशी जवळचे असेल. बारावी सायन्स नंतर जिऑलॉजी हे सुद्धा चांगले क्षेत्र आहे. पर्यावरण शास्त्रामध्ये तुलनेने नोकरीच्या संधी कमी आहेत. बारावीनंतर बीएससी किंवा बीए इकॉनॉमिक्स हाही चांगला पर्याय आहे, त्यात मास्टर्स केल्यानंतर त्याला चांगल्या करिअर संधी मिळू शकतात.
’ माझ्या मुलाने यावर्षी १० वी सीबीएसई बोर्डाची परीक्षा दिली आहे. त्याला आतापर्यंत ९० % गुण मिळत आलेले आहेत. त्याचे गणित आणि समाजशास्त्र हे विषय चांगले आहेत. त्याला भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र आवडतात पण तो वाणिज्य शाखा घ्यायची म्हणतो. कॉमर्समध्ये करिअरचे कुठले क्षेत्र भविष्याच्या दृष्टीने योग्य ठरतील ते कृपया सांगावे . – वंदना शिंदे, लातूर</p>
त्याला गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे तिन्ही विषय खरेच आवडत असतील आणि त्या तिन्ही विषयांचे दहावीपर्यंतचे सर्व कन्सेप्ट त्याला व्यवस्थित समजले असतील तर त्याला ११ वी व १२ वी सायन्स शाखा निवडीसाठी विचारा. कारण कॉमर्स शाखेतून बारावीनंतर उपलब्ध होणारी उत्तम करिअर बारावी सायन्सनंतरही उपलब्ध होतात. जसे की ५ वर्षांचा लॉ कोर्स, ३ वर्षांचा बीबीए / बीबीएम/ बीसीए कोर्स , ५ वर्षांचा इंटिग्रेटेड एम बी ए कोर्स , ३/४ वर्षांचा बीएससी इकॉनॉमिक्स कोर्स , ४ वर्षांचा डिझायनिंग कोर्स. अर्थात या प्रत्येक कोर्ससाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते आणि ती कॉमर्स आणि सायन्स या कोणत्याही शाखेतून बारावी पूर्ण करताना देता येते.
‘करिअर मंत्र’साठी आवाहन
करिअर निवड, शिक्षण, स्पर्धा परीक्षा, नोकरी किंवा कौशल्य विकासाबाबत काही शंका आहेत? मुलांचे शिक्षण व करिअरबाबत पालकांच्या मनातही धाकधुक असते. करिअरच्या निर्णायक टप्प्यावर योग्य सल्ला महत्त्वाचा ठरतो. शिक्षण, करिअर निवड किंवा बदलाबाबतचे आपले प्रश्न ‘करिअर मंत्र’ सदरासाठी आवर्जून पाठवा. आपल्या प्रश्नांना अनुभवी करिअर समुपदेशक मार्गदर्शनपर उत्तर देतील. प्रश्न अगदी थोडक्यात लिहावा. विद्यार्थ्यांचे दहावी, बारावी, पदवीचे गुण, आवडी, विषयकल अवश्य सांगावेत, जेणेकरून सल्ला देताना तज्ज्ञांना तो अधिक अचूक देता येईल. आपले प्रश्न careerloksatta@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावेत. मेलच्या सब्जेक्टमध्ये ‘करिअर मंत्र’ सदराचा उल्लेख अवश्य करावा. प्रश्नाखाली, नाव आणि शहर / गावाचे नाव लिहावे.
