माझे बीएससी नर्सिंग नागपूरच्या निमशासकीय महाविद्यालयात पूर्ण झाले. सध्या मी पुण्यात हॉस्पिटलला जॉब करत आहे. माझी आवड वाचन, लेखन आहे. मला आता जॉब करत पीजी पूर्ण करायचे आहे. मी एमबीएसाठी कोणते क्षेत्र निवडावे की एमएससी नर्सिंग करावे याबद्दल मार्गदर्शन करावे.- पुनम दर्वे, सोनेगाव, चंद्रपूर
’आपल्याला एमबीए करायचे असेल तर आपल्या क्षेत्राशी संबंधित एमबीए शाखेतून म्हणजे हॉस्पिटल मॅनेजमेंटमधून एमबीए करणे फायद्याचे ठरेल. अर्थात त्याकरीता आपणास एमबीए प्रवेश परीक्षांची खूप तयारी करावी लागेल आणि जॉब सोडून दोन वर्षांचे एमबीए करावे लागेल जे बर्या पैकी खर्चिक असेल. एम एस सी नर्सिंग करण्यापेक्षा आपण परदेशात नर्सिंग नोकरीसाठी आवश्यक सीजीएफ एन एस , टोफेल यासारख्या परीक्षांची तयारी करुन त्यात उत्तम यश मिळण्यासाठी प्रयत्न केलेत तर परदेशात नर्सिंग नोकरीसाठी जाणे शक्य होईल. परदेशांत नर्सिंग साठी उत्तम संधी, पगार आणि प्रतिष्ठा मिळते हे लक्षात घेऊन प्रयत्न करा.
’माझे वय २४ वर्षे असून सध्या मी एमपीएससीचा अभ्यास करत आहे. ग्रॅज्युएशन २०२३ साली झूलॉजी मधून केले. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश न घेता मी एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. वडील नसल्यामुळे घरच्या जबाबदार्या माझ्यावर आहेत. त्यामुळे एमपीएससीवर वेळ खर्च करू नकोस, एमबीए कर असा सल्ला बरेच जण देत आहेत. मी नक्की काय करावे. कृपया मार्गदर्शन करावे.- ऋतुजा चव्हाण, पुणे</p>
’एमपीएससी परीक्षांमध्ये प्रचंड संख्येने विद्यार्थी सहभागी होत असतात त्यामानाने उपलब्ध पदांची संख्या तुटपुंजी असते हे लक्षात घेता यशाची शक्यता कमी असते हे लक्षात ठेवा. त्यामुळे एमबीएचा विचारही करावा. एमपीएससी ची तयारी करतानाच एमबीए प्रवेश परीक्षेची बहुतांश तयारी आपोआप होईल कारण एमपीएससी प्रिलीमला अभ्यास करावे लागणारे विषय आणि एमबीए प्रवेश परीक्षांचे विषय जवळपास सारखेच आहेत जसे की इंग्रजी, रिझनिंग ॲबिलिटी , सामान्य ज्ञान आणि सामान्य गणित हे विषय आहेत. एमबीए प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळाले तर एमबीए च्या प्रतिथयश संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो. मात्र एमबीए शिक्षणाची फी खूप जास्त असते हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे येते वर्षभर एमपीएससी बरोबरच एमबीए प्रवेश परीक्षांची तयारी करा आणि दोन्हीपैकी कोठे चांगले यश मिळेल त्यावर पुढील वाटचाल ठरवा.
’मी सध्या यूपीएससी सीएसई परीक्षेची पूर्णवेळ तयारी करत आहे. यावर्षी माझा दुसरा प्रयत्न असणार आहे. (माझे वय २८ वर्षे आहे आणि मी खुल्या प्रवर्गात मोडते.) मी राज्यशास्त्र विषयात बीए केले आहे. मला कामाचा कोणताही अनुभव नाही आणि माझ्याकडे कोणताही प्लान बी तयार नाही. मला आंतरराष्ट्रीय संबंध, हवामान बदल, दहशतवाद, सीमावाद या विषयांमध्ये रुची आहे. मला आयएफएसमध्ये रुजू व्हायचे आहे परंतु ते शक्य न झाल्यास पर्यायी करिअर मार्ग सांगावेत. यूपीएससीचा अभ्यास करता करता या विषयातले शिक्षण घेणे किंवा कामाचा अनुभव घेणे शक्य आहे का? असल्यास ते कोणते हे सांगावे. – धनश्री ढोमसे, बदलापूर
’यूपीएससी प्रिलीम मध्ये तुम्हाला सीसॅट पेपर द्यावा लागतो ज्यात इंग्रजी, रिझनिंग ?बिलिटी आणि सामान्य गणित हे विषय आहेत , याशिवाय सामान्य ज्ञानाचाही पेपर असतो. याच अभ्यासक्रमावर आधारित अनेक इतर स्पर्धा परीक्षा आहेत , जसे की बँकिंगसाठी आयबीपीएस, केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनची पदवीधर भरती परीक्षा, कंबाईंड डिफेन्स स्व्हिहसेस परीक्षा वगैरे. आपण ‘प्लान बी’ म्हणून याचा विचार नक्की करू शकता, तेही कोणतीही खास वेगळी तयारी न करता. याशिवाय ‘प्लान बी’ म्हणून आपण पदवीनंतरच्या तीन वर्षांच्या कायदा पदवीचा पर्यायही विचारात घेऊ शकता.
‘करिअर मंत्र’साठी आवाहन
करिअर निवड, शिक्षण, स्पर्धा परीक्षा, नोकरी किंवा कौशल्य विकासाबाबत काही शंका आहेत? मुलांचे शिक्षण व करिअरबाबत पालकांच्या मनातही धाकधुक असते. करिअरच्या निर्णायक टप्प्यावर योग्य सल्ला महत्त्वाचा ठरतो. शिक्षण, करिअर निवड किंवा बदलाबाबतचे आपले प्रश्न ‘करिअर मंत्र’ सदरासाठी आवर्जून पाठवा. आपल्या प्रश्नांना अनुभवी करिअर समुपदेशक मार्गदर्शनपर उत्तर देतील. प्रश्न अगदी थोडक्यात लिहावा. विद्यार्थ्यांचे दहावी, बारावी, पदवीचे गुण, आवडी, विषयकल अवश्य सांगावेत, जेणेकरून सल्ला देताना तज्ज्ञांना तो अधिक अचूक देता येईल. आपले प्रश्न careerloksatta@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावेत. मेलच्या सब्जेक्टमध्ये ‘करिअर मंत्र’ सदराचा उल्लेख अवश्य करावा. प्रश्नाखाली, नाव आणि शहर / गावाचे नाव लिहावे.
careerloksatta@gmail.com
(लेखक बीई , एमबीए असून गेली २५ वर्षे करिअर मार्गदर्शन करत आहेत.)
