१) सर, माझे वय ३८ वर्षे आहे. मी मराठी माध्यमातून डीएड. बीएड. केल आहे. २०२५ ची टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. पण मी गोंधळलेले आहे. या वयात आता स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आहे. मी सरळसेवा किंवा पुढे TAIT 2026 ची तयारी करू का? की खासगी नोकरी करू?

– प्रीताली गुरनुळे, चंद्रपूर</p>

– शिक्षक भरती पोर्टलवर नाव नोंदणी करा. शिक्षक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही जाण्याची तयारी ठेवा. शासनाकडून आता शिक्षकांची भरती सुरू झालेली आहे. फक्त मुलाखतीसाठी कॉल येतील. आपल्या विषयाची तयारी उत्तम करा. तसेच शैक्षणिक विषयांची म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मूल्यमापन पद्धती अध्यापन पद्धती व एसएस कोड आणि एमएपीएस रुल्स याचा नीट अभ्यास करा. मुलाखतीमध्ये यासंदर्भात प्रश्न विचारतात. कोणत्याही एका विषयाची उत्तम तयारी करा आणि त्या विषयावर मुलाखतीत प्रश्न विचारावेत असे स्पष्ट मुलाखतीच्या वेळेस सांगावे. आता शिक्षकांना आयटीसारखे उत्तम पगार आहेत. त्यामुळे आपण टीईटी आणि टेट या दोन्हीही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहात हा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. शिक्षकाची नोकरी अत्यंत उत्तम आहे, ती आपल्याला नक्की मिळेल.

२) माझे वय ४२ वर्ष असून मी शासकीय सेवेत नोकरी करत आहे. मला यूपीएससी परीक्षा द्यायची आहे तर त्यासाठी वयाची अट किती आहे

– महादेव कांबळे

– यूपीएससी ची वयाची अट सर्वसाधारण प्रवर्गासाठी २१ ते ३२ वर्षे आहे तर अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गासाठी २१ ते ३७ वर्षे आहे.

३) मला दहावीला ५३ टक्के गुण आहेत. बारावीला ४३ टक्के गुण आहेत. बीए समाजशास्त्र घेऊन ५० टक्के गुण आहेत. बारावी तिसर्‍या प्रयत्नात उत्तीर्ण केली होती. पुढे काय करू?

– महेश खतरे, यवतमाळ</p>

– तुम्ही एखादा स्कील एज्युकेशनचा कोर्स करावा असे वाटते. तो डिजिटल मार्केटिंग किंवा रिटेल मॅनेजमेंट किंवा हार्डवेअर/ नेटवर्किंगसारखा चालेल. मात्र त्यासाठी संस्थेची निवड काळजीपूर्वक करावी, म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्या संस्थेने तुम्हाला नोकरी मिळवून दिली पाहिजे, तसा त्यांचा गेल्या तीन वर्षांचा इतिहास असावा. राज्य आणि केंद्र सरकारच्या काही मोफत कौशल्य विकास योजना आहेत, त्यातील आवडीचा अभ्यासक्रम तुम्हाला निवडता येईल.

४) माझा नातू सध्या नववीत केंद्रीय विद्यालयात शिकतो. गणित या विषयात तो अगदीच कच्चा आहे. त्यामुळे भविष्यात तो सायन्स आणि कॉमर्स यातून बाद होतो. त्याला कला शाखेकडे जाऊ द्यावे का? त्याचीही तीच इच्छा आहे. (मात्र इतर कुठेही न चालणारे कला शाखेत जातात, असा एक समज आहे.) तर कला शाखेकडे प्रवेश घेऊन त्याला पुढे काय करता येईल ? त्याची शरीरयष्टी व उंची उत्तम आहे. त्यासाठी त्याला काय मार्गदर्शन करता येऊ शकते?

– संजय जाधव, धुळे</p>

– इतर कोठेही न चालणारे कला शाखेत जातात हा गैरसमज आहे. खरे तर कला शाखेतून ही बारावीनंतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसे की लॉ, बीबीए / बीबीएम, मास कम्युनिकेशन, हॉटेल मॅनेजमेंट / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट / कलिनरी आर्ट्स, व्होकेशनल कोर्सेस वगैरे. मात्र यासाठी प्रवेश परीक्षा असतात, ज्यामध्ये एक पेपर सामान्य गणिताचा असतो आणि एक पेपर रिझनिंग ॲबिलिटीचा असतो. त्यामुळे गणिताचा थोडा अभ्यास करावाच लागतो. त्याची शरीरयष्टी व उंची चांगली असेल तर पदवीनंतर त्याला आर्मी ऑफिसर, केंद्रीय पोलीस दलांमध्ये कमांडंट अशा संधी देखील मिळू शकतात, त्यासाठी प्रवेश परीक्षा असतात.