१) बारावीत ८०.९२ % आहेत. त्यानंतर मी बीएससी ॲग्रीकल्चरला प्रवेश घेतला होता, पण तब्येतीच्या कारणास्तव मला ते पूर्ण करता आल नाही. मी वायसीएमओयू मधून बी.ए. पूर्ण केले. माझे वय २४ वर्षे आहे. करिअरबद्दल मला चिंता वाटते. आणि मी २०२४ ला प्लेन बीएससी ला प्रवेश घेतला आहे आणि पहिले वर्ष मी ८.६८ सीजीपीएने पूर्ण केले आहे. आता मी दुसऱ्या वर्षाला आहे. मी एनएसएसमध्ये क्रियाशील राहिलो आहे.आणि मला एमपीएससी राज्यसेवा परीक्षा द्यायची आहे. मला खासगी क्षेत्रात काम करायचं नाही. मग मी एमपीएससीचा अभ्यास कशा पद्धतीने करावा आणि ‘प्लॅन बी’चा विचार करावा का? – ज्ञानेश्वर मुडे
— तुमचे वायसीएमओयू मधून पदवी शिक्षण पूर्ण झाले असल्याने तुम्ही स्पर्धा परीक्षा लगेचच देण्यासाठी पात्र आहात. स्पर्धा परीक्षाच द्यायची हा निर्णय पक्का असेल तर परत बीएससी करण्यात वेळ घालवण्यापेक्षा संपूर्ण वेळ स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासावर केंद्रीत करा. एमपीएससीच्या सर्व परीक्षांसाठी प्रयत्न करण्याबरोबरच ‘प्लॅन बी’ म्हणून बँकिंग, इन्शुरन्स, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे अशा स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास करा.
२) मी १० वर्षांपूर्वी बीडीएस आणि एमडीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. माझ्या दवाखान्यातून मला फारसे उत्पन्न मिळत नाही. मला महिन्याला फक्त साधारण ३० ते ४० हजार रुपये मिळतात. आजूबाजूला बरेच डेंटिस्ट असल्यामुळे माझे उत्पन्न वाढणे कठीण आहे. त्यामुळे मी करिअरचा दुसरा पर्याय शोधत आहे. मला काय करावे हे अजिबात सुचत नाही. मी १२ वी पर्यंत विज्ञान शाखेच्या सर्वच विषयांत चांगली होते. कृपया मला आता या टप्प्यावर येऊन करिअरचे कोणते इतर पर्याय उपलब्ध आहेत हे सुचवावे. – जयंती नाईक
— तुम्ही आता एका अशा टप्प्यावर आहात की जेथे एवढ्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी सोडून नवीन क्षेत्रात सुरुवात करणे कठीण आहे. स्पर्धा तर सर्वच क्षेत्रांत असणार आहे पण त्यावर मात करण्यासाठी उपाय शोधणे गरजेचे आहे. अनेक मोठी रुग्णालये येत आहेत, तिथे पार्टटाईम अटॅचमेंट स्वीकारून उर्वरित वेळेत स्वतःची प्रॅक्टीस चालू ठेवण्यासंबंधी विचार करा. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन प्रॅक्टीस करता येईल का याचाही विचार करा. डेंटल कॉलेजमध्ये पार्ट टाइम शिकवण्याचा प्रयत्न करा.
३) माझ्या बहिणीला दहावीला सीबीएसई बोर्डातून ९४% मिळाले होते. आता ती एका खासगी महाविद्यालयात कॉम्प्युटर इंजिनीअरिंग डिप्लोमातील तिसऱ्या वर्षात आहे. पहिली दोन्ही वर्षे साधारण ९२% मार्क तिला पडले आहेत. पुढे बीई किंवा बीटेक करण्यासाठी महाराष्ट्रातील किंवा देशभरातील चांगली महाविद्यालये सुचवावीत ही विनंती. इंजिनीअरिंग करून उत्तम करिअरचे मार्ग देखील सांगावेत. – रेवती शेळके
— तुमची बहीण डिप्लोमा इंजिनीअरिंग करुन थेट इंजिनीअरिंग पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश करणार आहे, या जागा खूप कमी असतात, म्हणजे एखाद्या इंजिनीअरिंग काॅलेजमध्ये बारावीनंतर प्रवेशासाठी जर शंभर जागा उपलब्ध असतील तर डिप्लोमा मधून थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी फक्त दहा जागा असतात. म्हणजेच डिप्लोमा च्या तिसऱ्या वर्षांत किमान ९५% मार्कांचे उद्दिष्ट ठेवावे लागते. काॅलेजची निवड करताना गेल्या वर्षीचे कट ऑफ, त्या काॅलेज मधील गेल्या तीन वर्षांचे कॅम्पस प्लेसमेंटचे रेकाॅर्ड आणि तेथे किमान तीन महिने इंटर्नशिपची संधी उपलब्ध होते का याचा अभ्यास करून काॅलेजची निवड करणे आवश्यक आहे. पदवीच्या तिन्ही वर्षात फर्स्ट क्लासने उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच कॅम्पस प्लेसमेंटसाठी उत्तम इंग्रजी कम्युनिकेशन स्कील आत्मसात करणे आवश्यक आहे.
६) बारावी वाणिज्य शाखेतून (२०१९) ७२ टक्के गुणांनी उत्तीर्ण केली. बीकॉमला प्रवेश घेतला आणि लॉकडाऊन झाल्याने कॉलेज नियमित झाले नाही. आता २०२५ मध्ये माझा एक विषय बॅकलॉग आहे. त्यामुळे मला मानसिक त्रास होतो. काय करू, काही नाही समजत नाही. पुढे काय करू, मार्गदर्शन करा. – अजय देशमुख
— काॅमर्सचे विषय अवघड वाटत असतील तर बॅकलाॅगचा विषय सोडवून डिग्री प्राप्त करून वेगळी वाट धरू शकता – जसे की तीन वर्षांचा लाॅ कोर्स किंवा दोन वर्षांचा मास कम्युनिकेशनचा कोर्स. बँकिंग, इन्शुरन्स, स्टाफ सिलेक्शन अशा स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही सुरू करू शकता , मुख्य म्हणजे या तिन्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी एकच लागते. याच तयारीवर एमबीए प्रवेश परीक्षाही देता येईल, ज्यामध्ये नंतर मार्केटिंग / डिजिटल मार्केटिंग/ सप्लाय चेन अशा वेगळ्या विषयांत एमबीए करता येईल.
