– तेजस्विनी साठे

कोणताही कलाप्रकार आत्मसात करायचा असेल तर कठोर मेहेनतीला पर्याय नाहीच, पण योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जर विद्याथ्र्याचे शिक्षण झाले असेल तर त्याचा करिअर करण्याचा मार्ग हा अधिक सुकर होतो यात शंका नाही. यासाठी पालकांचा देखील मुलांप्रती मोठा सहभाग आणि पूर्ण पाठिंबा असणे महत्त्वाचे आहे. शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेताना शाळा आणि कॉलेजच्या परीक्षा आहेत, म्हणून नृत्यवर्गाला विराम घेऊन नुसता अभ्यास करणे आणि त्यासाठी क्लास बुडवणे हे योग्य नाही. विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांच्या पालकांनीही सातत्य चिकाटी आणि नृत्यगुरूंवर विश्वास ठेवला तरच एखादा नृत्याचा विद्याथ्र्यी हा त्यामध्ये पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जाऊन चांगल्या दर्जाचा कलाकार होऊ शकतो.

गुरूकडूनच साधना

गुरू-शिष्य परंपरेतून उगम झालेली ही कला आजही ती परंपरा मानते. शास्त्रीय नृत्यामध्ये परिपक्वता येण्यासाठी अथक परिश्रम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. विद्यार्थी लहान वयात नृत्यशिक्षण घेण्यास सुरुवात करतो म्हणजेच साधारण सात ते आठ वर्षांचे वय हे नृत्य शिकायला लागण्यासाठी योग्य वय आहे, असे मला वाटते. शास्त्रीय नृत्यात तंत्र आणि त्याचे शास्त्र याचा एकत्रित मिलाफ असतो आणि ते हळूहळूच या कोवळ्या वयापासूनच त्या विद्याथ्र्यावर संस्कारित होत असते. कोणतेही शास्त्रीय नृत्य हे केवळ बघून आत्मसात होत नाही अथवा यु ट्युबवर पाहून शिकता येत नाही, ते गुरूकडे जाऊनच शिकावे लागत. ही क्रिएटीव्ह आर्ट असल्याने गुरू बदलला की त्याची शिकवण्याची पद्धती बदलते आणि म्हणूनच गणित, भूमिती, शास्त्रासारख नृत्याचे पुस्तक नसते. त्या-त्या गुरूच्या सान्निध्यात राहूनच विद्यार्थी ते आत्मसात करून पुढे जात असतो. सर्वप्रथम तो विद्यार्थी असतो, मग शिक्षक होतो, मग गुरू होतो, मग अध्यापक होतो आणि मग त्यात पांडित्य येते.

रियाज आणि रियाजच…

या सगळ्यापर्यंत पोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रियाज आणि फक्त रियाजच. तो सुद्धा योग्य मार्गाने आणि जाणीवपूर्वक केलेला अभ्यासपूर्ण असा रियाज. रोज साधारण कमीत कमी दोन ते तीन तासांचा रियाज हा एक उत्तम कलाकार घडण्यासाठी आवश्यक आहेच, यात शंका नाही. तो रियाज करतानाच नृत्य ही सर्वसमावेशक कला असल्यामुळे नर्तकाला नृत्याबरोबरच गायन वादन आणि तालाचे ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचा अभ्यासही असणे आवश्यक आहे. नवीन संरचना तयार करताना याचा त्या नर्तकाला उपयोग होतो आणि त्याच्या प्रस्तुतीला एक परिपक्वता येते.

उपलब्ध संधी

आजकाल नृत्यात करिअर करणार्‍यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. डोळे उघडे ठेऊन सक्षमतेने त्याचा विचार नक्कीच करता येईल.

– विद्यार्थी दशेतून शिक्षक बनून त्याला मिळालेल्या ज्ञानातून तो नृत्यवर्ग सुरू करू शकतो.

– वेगवेगळ्या महोत्सवांमधून नृत्यप्रस्तुती करू शकतो.

– नृत्यामधून बॅचलर इन परफॉर्मिंग आर्ट्स आणि मास्टर्स इन परफॉर्मिंग आर्ट्स अशा पदवी मिळवू शकतो. पुणे विद्यापीठातले ललित कला केंद्र आणि भारती विद्यापीठामधून अशा पदवी घेण्याची सोय आहे. (अर्थातच ठरावीक टप्प्यापर्यंत विद्याथ्र्याचे शिक्षण या विषयात होणे आवश्यक आहे) पुण्याबाहेर देखील अनेक ठिकाणी यातून शिक्षणाच्या संधी आहेत.

– नेटची परीक्षा देऊन प्रोफेसर म्हणून या विषयांचा समावेश असलेल्या विद्यापीठात शिकवता येईल.

– अनेक वेगवेगळ्या ठिकाणी नृत्यसंस्थांमध्ये, चित्रपटात नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करू शकता.

– सांस्कृतिक संचालनालयाच्या काही परीक्षा उत्तीर्ण होऊन कला संचलनालयात नोकरी मिळवता येऊ शकते.

– योगा मेडिटेशन सेंटर प्रमाणेच नृत्यप्रयोगाचा प्रचार, प्रसार करू शकतो.

– शारीरिक आव्हाने असणार्‍या मुलांना किंवा वृद्ध माणसांना मूव्हमेंट थेरपीद्वारे हालचाल करण्यास सक्षम बनवू शकता. त्यासाठीचे सेंटर सुरू करू शकता.

– आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांततेसाठी नृत्यकला ही थेरपी म्हणून विकसित करता येऊ शकते.

– इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करून मॅनेजमेंट क्षेत्रात काम करता येऊ शकते.

– साऊंड आणि लाईट डिझाइनिंग हा कोणत्याही परफॉर्मिंग आर्ट्ससाठी अत्यंत आवश्यक भाग आहे. त्याचा कोर्स करून त्यात प्रावीण्य मिळवता येऊ शकते. नृत्याची माहिती असल्याने त्याचा खूप उपयोग यासाठी होऊ शकतो.

– कॉस्च्युम डिझाइनिंग करता येऊ शकते. नृत्यामधल्या नाट्यामध्ये कॅरेक्टरनुसार कॉश्च्युमचा विचार एक नर्तक किंवा नर्तिका अधिक चांगल्याप्रकारे करू शकते.

– नृत्यासाठी आवश्यक असणारी ज्वेलरी हेअर स्टाईलसाठी आवश्यक वस्तू, घुंगरू, गजरे, मेकअपसाठी लागणारे साहित्य यांचादेखील व्यवसाय म्हणून एखादी नर्तिका किंवा नर्तक विचार करू शकतो.

या सर्वातून आपण स्वत: मानसिक शांतता मिळवू शकतो आणि लोकांना देखील यासाठी उद्युक्त करून आपल्या सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करून ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचं महत्त्वाचं कार्य करू शकतो.

tejaswinisathe.kathak@gmail.com

(लेखिका कथक नृत्यांगना, कोरिओग्राफर आणि शिक्षिका आहेत.)