१) माझ्या मुलाला रेल्वेची आवड आहे. तो सध्या आठवीत आहे, मार्च २०२६ मध्ये तो आठवीची परीक्षा देईल. त्याला गणित विषयाची व विज्ञानाची देखील थोडी आवड आहे. तो सेमी इंग्लिश, माध्यमातून शिक्षण घेत आहे. त्याचे आतापर्यंतचे मार्क किमान ७० ते ८० टक्के दरम्यान आहेत. तरी कृपया त्याला रेल्वेमध्ये जाण्यासाठी कोणते क्षेत्र योग्य राहील याची माहिती देऊन मार्गदर्शन करावे, ही नम्र विनंती. – डॉ. वीरेंद्र देशमुख.

  • — रेल्वे ही भारतातला सर्वात मोठी रिक्रूटर आहे. आयटीआय, इंजिनीअरिंग – डिप्लोमा किंवा पदवी, कोणत्याही शाखेचा पदवीधर अशा सर्वांना रेल्वेमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे. आपल्या मुलाला रेल्वेची आवड आहे म्हणजे रेल्वे प्रवास आवडतो की तो रेल्वे फॅनिंग करतो की त्याला रेल्वेच्या इंजिन / सिग्नलिंग यंत्रणा / रूळ / डबे / मालवाहतूक/ प्रवासी वाहतूक यापैकी कशाची आवड आहे हे स्पष्ट होत नाही, पण तो काहीही शिकला तरी त्याला रेल्वेत नोकरीची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे दहावी होईपर्यंत त्याला नक्की काय काय आवडते याचे निरीक्षण करुन त्यानुसार दहावीनंतरची शाखा निवड करता येईल.

२) मी सध्या बीएससी बॉटनीच्या शेवटच्या सत्रात आहे. माझे वय २३ वर्षे आहे. मला दहावीत (इंग्रजी माध्यम) ८० टक्के गुण होते आणि बारावी सीबीएसई बोर्डात ६१ टक्के गुण होते. मी मुक्त विद्यापीठातून बीए आर्ट्स पूर्ण केले आहे. माझे इंग्रजी आणि इतिहास हे विशेष विषय होते. निसर्गाबद्दल शिकणे हा माझा छंद आहे. मला एमपीएससी वन विभागाची परीक्षा द्यायची आहे. पदवी पूर्ण झाल्यानंतर मी काय करावे? – तुषार पावरा, नंदुरबार.

  • — आपण बाॅटनी या विषयातून पदवी प्राप्त करत असल्याने एमपीएससी वन विभागाची परीक्षा देण्यासाठी पात्र आहात. या परीक्षेत पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत तसेच वैद्यकीय तपासणी हे चार टप्पे असतात. आता तुम्ही पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांसाठी तातडीने तयारी सुरू करणे आवश्यक आहे. विशेषतः सामान्य ज्ञान, चालू घडामोडी या विषयांच्या अभ्यासासाठी खूप वाचन करावे लागेल. शक्य त्या तयारीवर येईल त्या परीक्षेला सामोरे जा जेणेकरून तुम्हाला परीक्षेचा आवाका आणि तुमच्या तयारीतल्या त्रुटी लक्षात येतील, त्या दुरुस्त करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी गेला तरी चालेल, जेणेकरून पुढच्या वेळी तुम्ही थोडे ताणरहित व्हाल.