साहेबराव धनवटे
विमाननिर्मिती आणि देखभाल (एअरक्राफ्ट मेंटनन्स) क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आयटीआयमधील ‘एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर’ हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त आणि रोजगाराभिमुख आहे.

महाराष्ट्रात या ट्रेडची सुरुवात नागपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झाली असून, सध्या नाशिक व पुणे येथील शासकीय आयटीआयमध्येही हा अभ्यासक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे. विमान उद्योगासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम मनुष्यबळ तयार करणे हा या कोर्सचा मुख्य उद्देश आहे.

अभ्यासक्रमाची रचना

हा कोर्स दोन वर्षांचा (सुमारे २४०० तास) असून, एनएसक्यूएफ स्तर ४ (NSQF Level-4) अंतर्गत येतो. अभ्यासक्रम दोन भागांत विभागलेला आहे.

या अभ्यासक्रमात सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक (Trade Theory Practical), तसेच रोजगारक्षम कौशल्य (Employability Skills) शिकवले जाते. त्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना विमानाच्या संरचना आणि यंत्रणांशी संबंधित प्रत्यक्ष कौशल्ये शिकवली जातात. त्यात

एरोनॉटिकल फिटर काम म्हणजे मेटल व कॉम्पोझिट पार्ट्स तयार करणे, रिव्हेटिंग, शीटमेटल काम. एरोनॉटिकल पायपिंगमध्ये हायड्रॉलिक, न्यूमॅटिक, फ्युएल आणि ऑक्सिजन सिस्टीममधील पाइप फिटिंगचे काम. एरोनॉटिकल इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये वायर हार्नेस तयार करणे, कनेक्टर फिटिंग, बेसिक इलेक्ट्रिकल टेस्टिंगची कामे. मेंटेनन्स कौशल्यात गंजरोधक प्रक्रिया, तपासणी, उपकरणे दुरुस्ती या कामाचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना विमानातील विविध प्रणाली जसे की, हायड्रॉलिक, न्यूमॅटिक, फ्युएल, फ्लाइट कंट्रोल यांची मूलभूत माहिती दिली जाते.

करिअरच्या संधी

हा कोर्स पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र (NTC) मिळते, जे देश-विदेशात मान्यताप्राप्त आहे. त्यामुळे हा ट्रेड अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. त्यामध्ये एरोनॉटिकल स्ट्रक्चर फिटर, एअरक्राफ्ट मेंटेनन्स टेक्निशियन, एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या डिफेन्स व एरोस्पेस क्षेत्र, MRO (Maintenance, Repair & Overhaul) कंपन्या यांच्यामध्ये अनुभवानुसार वार्षिक वेतन ४ ते १२ लाखांपर्यंत जाऊ शकते.

का निवडावा हा ट्रेड?

आजच्या काळात एव्हिएशन क्षेत्र वेगाने वाढत आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि संरक्षण उत्पादनातील वाढत्या संधींमुळे कुशल तांत्रिक कामगारांची जगभर मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर हा ट्रेड विद्यार्थ्यांना कमी कालावधीत उच्च कौशल्ये देऊन थेट रोजगाराच्या दिशेने नेणारा पर्याय ठरतो.

पूर्वी अशा प्रकारचा अभ्यासक्रम फक्त इंजिनिअरिंग मध्ये होता. डिप्लोमा किंवा आयटीआयच्या स्तरावर हा अभ्यास नव्हता. त्यामुळे तो अभ्यास खर्चिक होता. पारंपरिक इंजिनिअरिंगच्या तुलनेत अत्यल्प खर्चात (अवघ्या दोन अडीच हजार रुपयांमध्ये) आणि कमी कालावधीत एव्हिएशन क्षेत्रात प्रवेश मिळवायचा असेल, तर एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर हा आयटीआय अभ्यासक्रम अत्यंत प्रभावी ठरतो.

कौशल्य, अचूकता आणि तांत्रिक आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स म्हणजे करिअरची उंच भरारी घेण्याची सुवर्णसंधी आहे. या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी अद्याप राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजना उपलब्ध नाही. केंद्र आणि राज्य सरकारने ही तातडीने उपलब्ध करून दिल्यास या प्रशिक्षणार्थ्यांना आणखी उज्वल भविष्याची संधी निर्माण होईल.

  • साहेबराव धनवटे, शिल्प निदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोखाडा.