बारावी कला शाखेतून मला ७० टके गुण मिळाले. आता मी कला शाखेत प्रथम वर्षात शिकत आहे मी कला शाखेतून पदवी प्राप्त करत आहे. मी पुढे कोणत्या क्षेत्रात करिअर करू शकतो? – ओम वर्पे, पुणे.

  • कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केल्यानंतर एमबीए, लाॅ, मास कम्युनिकेशन या क्षेत्रात पुढील शिक्षण घेऊन करिअर करणे शक्य असते. अर्थात यासाठी या क्षेत्रांच्या प्रवेश परीक्षांमध्ये चांगले यश मिळवण्यासाठी आत्तापासून प्रयत्न करावे लागतील. याशिवाय यूपीएससी, एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग, संरक्षण क्षेत्र यामध्ये ही करिअर करणे शक्य आहे मात्र त्यासाठी आवश्यक स्पर्धा परीक्षांसाठी कसून तयारी आत्तापासून सुरू करणे इष्ट ठरेल.

माझ्या मुलीला दहावीला ९० आणि बारावीत ७५ टक्के गुण होते. पण तिला इंजिनीअरिंग न करता यूपीएससी करायची आहे. तिने ‘प्लान बी’ साठी काय करावे, जेणे करून तिचा यूपीएससीचादेखील अभ्यास होईल? – शिवाली डोंबले.

  • यूपीएससी करण्यासाठी पदवी शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. पण ते करता करता तीन वर्षे यूपीएससीच्या अभ्यासाला पुरेसा वेळ देता येण्यासाठी मुक्त विद्यापीठातून आर्ट्स मध्ये पदवी शिक्षण घेण्याच्या पर्यायाचा जरूर विचार करावा. बीबीए पदवी शिक्षण हाही एक पर्याय असू शकतो. प्लान बी म्हणून यूपीएससी प्रिलीमच्या अभ्यासावर देता येणाऱ्या इतर स्पर्धा परीक्षा म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा, बँकिंग सेवा परीक्षा यासाठीही तयारी करावी, आणि समजा या कोणत्याही प्रयत्नांना यश आले नाही तर नंतर याच तयारीच्या आधारे एमबीए, लाॅ यासारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा देऊन तो मार्ग निवडणे शक्य होईल.