आशुतोष शिर्के, रश्मी पटवर्धन
एकविसावे शतक हे केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेचे किंवा संगणक-शास्त्राचे नाही. ते जीवशास्त्राचेही शतक ठरत आहे. मानवी जीनोमचा अभ्यास, कर्करोगावरील संशोधन, वैयक्तिक प्रेसिशन मेडिसिन, कृत्रिम अवयव, जैवतंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण, अन्न-सुरक्षा, संसर्गजन्य रोगांचे नियंत्रण आणि दीर्घायुष्यावरील संशोधन या सर्व संशोधनांच्या केंद्रस्थानी जीवशास्त्र उभे आहे. त्यामुळे आजचा जीवशास्त्राचा विद्यार्थी केवळ जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता, गणित आणि डेटा सायन्स यांचाही तितकाच विद्यार्थी आहे.
जगातील अग्रगण्य विद्यापीठांनी जीवशास्त्राच्या अभ्यासक्रमांची मांडणी आणि रचना पूर्णपणे नव्याने केलेली दिसते. अमेरिकेतील अनेक विद्यापीठांमध्ये बायो-इनफॉरमॅटिक्स, कम्प्युटेशनल बायोलॉजी, सिस्टिम्स बायोलॉजी सिंथेटिक बायोलॉजी, जीनॉमिक्स, न्युरोसायन्, बायो-मेडिकल-इंजिनीअरिंग, आणि बायो-स्टॅटिस्टिक्स यांसारख्या ज्ञान-शाखा झपाट्याने विकसित होत आहेत. हे बदल केवळ अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये घडत आहेत असे नाही. ब्रिटनमध्ये जनुकशास्त्र, जैवतंत्रज्ञान आणि सार्वजनिक आरोग्य संशोधनाला मोठे महत्त्व दिले जात आहे. स्वित्झर्लंड आणि जर्मनी जैवतंत्रज्ञान व जैवअभियांत्रिकीमध्ये जागतिक नेतृत्व करत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये कर्करोग संशोधन, समुद्री जीवशास्त्र आणि प्रतिकारशक्तीविज्ञान (Immunology) या क्षेत्रांत उल्लेखनीय काम सुरू आहे. चीनने तर गेल्या दशकात जीनोमिक्स, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जैवसंशोधन आणि जैवतंत्रज्ञानामध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करून संशोधनाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढवला आहे.
भारतातील अनेक विद्यार्थी मात्र अजूनही जीवशास्त्र म्हणजे डॉक्टर, दंतवैद्य, फिजिओथेरपिस्ट किंवा फार्मासिस्ट एवढ्याच चौकटीत विचार करतात. महत्त्वाचे संशोधन करणार्या परदेशी विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी जायचे असेल तर आपल्या विद्यार्थ्यांनी आपली तयारीची पद्धत बदलण्याची गरज आहे. जीवशास्त्राबरोबरच गणित, स्टॅटिस्टिक्स, डेटा विश्लेषण, संशोधन पद्धती हे विषय अभ्यासणे हे आज महत्त्वाचे झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेची प्राथमिक समज आणि प्रोग्रॅमिंग कौशल्य ह्या गोष्टी विकसित करणे हे सुद्धा आवश्यक आहे. ह्या तयारीने आज जागतिक दर्जाच्या संशोधनाची दारे तुमच्यासाठी उघडू शकतात.
जीवशास्त्र हे मानवी आरोग्य, पर्यावरण, शेती, औषधनिर्मिती आणि तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देणारे व्यापक ज्ञानविश्व आहे. आपण अजूनही जीवशास्त्राला जुन्या चौकटीत पाहणार आहोत, की या नव्या जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहायला सुरुवात करणार आहोत?
कर्करोग संशोधनाची दिशा : अवनी नेवरेकर
शाळेत शिकत असतानाच जीवशास्त्र हा अवनी नेवरेकर हिचा आवडता विषय होता. सजीवांचे जग, मानवी शरीराची रचना आणि रोगांवरील संशोधन यांविषयीची तिची उत्सुकता तिला विज्ञान शाखेकडे घेऊन गेली. बारावीनंतर अवनीने मुंबईतील के. सी. महाविद्यालयातून जीवशास्त्र विषयात बी.एस्सी. पूर्ण केले. त्यानंतर सोमय्या विद्याविहार विद्यापीठातून जैवतंत्रज्ञान विषयात एम.एस्सी. संपादन केले. याच काळात तिने बायोइन्फॉर्मेटिक्सचा डिप्लोमाही पूर्ण केला. जीवशास्त्र आणि संगणकशास्त्र यांचा संगम असलेल्या या शाखेने तिच्यासाठी संशोधनाची नवी दारे खुली केली. स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी तिने पायथन प्रोग्रॅमिंग, बायो- स्टॅटिस्टिक्स, कॅन्सर बायोलॉजी यांसारख्या विषयांमधील ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमही पूर्ण केले.
एम.एस्सी.दरम्यान केलेले संशोधन, शैक्षणिक गुणवत्ता आणि बायोइन्फॉर्मेटिक्समधील कौशल्य यांच्या जोरावर तिने अमेरिकेतील अनेक विद्यापीठांमध्ये अर्ज केले. त्यापैकी जॉर्ज मेसन विद्यापिठामाध्ये “बायो-इंफॉरमॅटिक्स अॅंड कम्युटेशनल बायोलॉजी” या विषयातील पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी तिची निवड झाली. सध्या ती स्तनाच्या कर्करोगाशी संबंधित अत्याधुनिक संशोधनात कार्यरत आहे.
पीएच.डी.च्या तिसऱ्या वर्षापासून तिची त्याच विद्यापीठात ग़्रॅजुएट टीचिंग असिस्टंट म्हणून नियुक्ती झाली. या भूमिकेत ती बायोस्टॅटिस्टिक्स विषय शिकवते, ‘रिव्यु क्लासेस’ घेते आणि विद्यार्थ्यांना सांख्यिकी तसेच डेटा विश्लेषणाच्या संकल्पना समजावून सांगते. या नियुक्तीमुळे तिला शिक्षण शुल्कात मोठी सवलत तसेच मासिक स्टायपेंड मिळत आहे.
स्तनाच्या कर्करोगावरील संशोधनाशी संबंधित अवनीचे शोधनिबंध आणि संशोधन पोस्टर्स तिने अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर केले आहेत. या परिषदांमधून जगभरातील संशोधकांशी संवाद साधण्याची आणि संशोधनाची देवाणघेवाण करण्याची संधी तिला मिळाली.
अवनीच्या मते, परदेशातील विद्यापीठांमध्ये संशोधनासाठी आवश्यक प्रयोगशाळा, अत्याधुनिक उपकरणे, संगणकीय सुविधा आणि तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन सहज उपलब्ध असते. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना प्रत्यक्ष संशोधनात उतरवण्याची आणि जागतिक दर्जाचे संशोधन करण्याची संधी मिळते. पीएच.डी. पूर्ण झाल्यानंतर जैवतंत्रज्ञान किंवा औषधनिर्माण क्षेत्रातील संशोधन क्षेत्रामध्ये संशोधक म्हणून काम करण्याची तिची इच्छा आहे.

